शाओमी कंपनीने एका महिन्यात विकले एक कोटी स्मार्टफोन !

By शेखर पाटील | Published: October 3, 2017 08:35 PM2017-10-03T20:35:31+5:302017-10-03T20:37:10+5:30

शाओमी कंपनीने सप्टेबर महिन्यात एक कोटींपेक्षा जास्त स्मार्टफोन विकल्याची घोषणा करण्यात आली असून हा अतिशय महत्वाचा टप्पा मानला जात आहे.

Shawmy company sold one million smartphones a month! | शाओमी कंपनीने एका महिन्यात विकले एक कोटी स्मार्टफोन !

शाओमी कंपनीने एका महिन्यात विकले एक कोटी स्मार्टफोन !

Next

शाओमी कंपनीचे सीईओ लेई जून आणि भारतीय अध्यक्ष मनुकुमार जैन यांनी ट्विट करून  या विक्रमाची माहिती दिली. यानुसार शाओमी कंपनीने सप्टेबर २०१७ या महिन्यात एक कोटींपेक्षा जास्त स्मार्टफोन मॉडेल्सची विक्री केली. शाओमी कंपनीला ऑगस्ट महिन्यातच भारतात तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. या कालखंडात कंपनीने भारतात अडीच कोटी स्मार्टफोन मॉडेल्सची विक्री केल्याचे आधीच घोषीत करण्यात आले होते. यानंतर अवघ्या एका महिन्यात एक कोटीच्या खपाचा आकडा गाठून शाओमीने अन्य कंपन्यांना धोक्याचा इशारा दिला आहे. विशेष बाब म्हणजे चीनच्या पाठोपाठ शाओमीने भारतातही आपला पाया मजबूत केला असून या एक कोटी स्मार्टफोनच्या विक्रीतही याचे प्रतिबिंब उमटले आहे.

शाओमी कंपनीच्या रेडमी नोट ४, रेडमी ४ आणि रेडमी ४ ए या मॉडेल्सला ग्राहकांचा अतिशय उत्तम असा प्रतिसाद लाभला आहे. याशिवाय गुगलच्या अँड्रॉइड वन या प्रकल्पाच्या अंतर्गत अलीकडेच लाँच करण्यात आलेल्या शाओमी मीए १ या अँड्रॉइडच्या नोगट आवृत्तीवर चालणार्‍या मॉडेललाही ग्राहकांची पसंती मिळाली आहे. शाओमी कंपनीच्या या यशात अत्यंत किफायतशीर मूल्यात उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश असणार्‍या मॉडेल्सचा मोलाचा वाटा आहे. यातच या कंपनीने अलीकडे आपल्या विक्रीतंत्रात केलेला बदलदेखील कारणीभूत ठरल्याचे मानले जात आहे. शाओमी कंपनीने प्रारंभी फक्त ऑनलाईन विक्रीवरच भर दिला होता. अलीकडेच मात्र शाओमीने ऑफलाईन विक्रेत्यांचे जाळे मजबूत केले आहे. याशिवाय शाओमी कंपनीचे एक्सक्लुझिव्ह शोरूम असणार्‍या मी होम या शॉपीजचा विस्तारदेखील भारताच्या विविध शहरांमध्ये करण्यात आला आहे. यामुळे शाओमी कंपनीच्या विक्रीवर अनुकुल परिणाम झाल्याचे अभ्यासकांचे मत आहे. येत्या कालखंडात शाओमी अजून काही फ्लॅगशीप मॉडेल्स लाँच करणार असल्याने या कंपनीची घोडदौड कायम राहण्याची शक्यता आहे.

Web Title: Shawmy company sold one million smartphones a month!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mobileमोबाइल