आयफोनची बॅटरी तपासायला गेला अन् मोठा स्फोट झाला!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2018 11:05 AM2018-01-24T11:05:52+5:302018-01-24T11:39:29+5:30

आयफोनची बॅटरी खरी आहे की खोटी हे तपासण्यासाठी एका तरुणाने ती चावून पाहिली आणि पुढच्याच मिनिटाला त्या बॅटरीचा मोठा स्फोट झाला. चीनमधील सेकंड हँड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या बाजारात ही घटना घडली.

iPhone battery explodes in man's mouth when he BITES to check if it's real | आयफोनची बॅटरी तपासायला गेला अन् मोठा स्फोट झाला!

आयफोनची बॅटरी तपासायला गेला अन् मोठा स्फोट झाला!

googlenewsNext

बीजिंगः आयफोनची बॅटरी खरी आहे की खोटी हे तपासण्यासाठी एका तरुणाने ती चावून पाहिली आणि पुढच्याच सेकंदाला त्या बॅटरीचा मोठा स्फोट झाला. चीनमधील सेकंड हँड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या बाजारात ही घटना घडली. सुदैवानं त्यात कुणीही गंभीर जखमी झालेलं नाही. 

आयफोनमधील लिथियम बॅटरी ही सहजपणे काढता येत नाही. अगदी तंत्रज्ञांनाही ती सावधपणे काढावी लागते. पण, नॅनजिंग सिटीमधल्या सेकंड हँड मार्केटमध्ये एका तरुणानं ही बॅटरी नुसती काढलीच नाही, तर ती खरी आहे की खोटी हे तपासण्यासाठी चावलीही. सोनं खरं आहे की खोटं, हे तपासण्यासाठी चीनमध्ये ते दाताने दाबून पाहण्याची पद्धत आहे. तोच फंडा या तरुणानं बॅटरी तपासण्यासाठी वापरला. त्याचा हा उपद्व्याप त्याच्या जिवावर बेतू शकला असता. कारण, दाताने दाबली गेलेली बॅटरी क्षणार्धात फुटली आणि एकच भडका उडाला. त्याने जर ती लगेच तोंडातून बाहेर काढली नसती, तर हा स्फोट त्याच्या तोंडातच होऊ शकला असता. 

दरम्यान, बॅटरीच्या स्फोटाचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. बॅटरी खूप जुनी असल्यानं ती फुटली असावी, असा अंदाज आहे. पण ती खरी होती की बनावट, हे कळू शकलेलं नाही.

अॅपल कंपनीच्या आयफोनची ख्याती जगभर आहे. भारतात सध्या जशी चिनी कंपन्यांच्या मोबाइलची चलती आहे, तशी चीनमधील तरुणाई आयफोनच्या प्रेमात बुडालीय. त्यामुळे नवा आयफोन आला की तिथे रांगा लागतात. जे नवा आयफोन घेऊ शकत नाहीत, ते सेकंड हँड आयफोनच्या शोधात असतात. स्वाभाविकच, वापरलेला आयफोन खरेदी करताना सगळ्या गोष्टी तपासून घेणं गरजेचं आहे. पण, तो तपासतानाही योग्य खबरदारी घेणं गरेजचं आहे, हेच या घटनेतून स्पष्ट होतं. 

Web Title: iPhone battery explodes in man's mouth when he BITES to check if it's real

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Apple Incअॅपल