Gionee S11 ready with four cameras coming soon | लवकरच येणार चार कॅमेर्‍यांनी सज्ज जिओनी एस११

जिओनी कंपनी येत्या काही दिवसांमध्ये भारतीय बाजारपेठेत चार कॅमेर्‍यांनी सज्ज असणारा जिओनी एस११ हा स्मार्टफोन सादर करणार आहे.

जिओनी एस११ हे मॉडेल अलीकडेच चीनमध्ये लाँच करण्यात आले होते. आता भारतीय ग्राहकांसाठी ते उपलब्ध करण्यात येणार आहे. जानेवारी महिन्याच्या उत्तरार्धात २० हजार रूपयांच्या आतील मूल्यात याला उपलब्ध करण्यात येणार आहे. या मॉडेलमध्ये पुढील आणि मागील बाजूस प्रत्येकी दोन कॅमेरे असतील. हीच या स्मार्टफोनची खासियत मानली जात आहे. याच्या पुढील बाजूस १६ व ८ मेगापिक्सल्सचे दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. तर याच्या मागील बाजूस १६ व ५ मेगापिक्सल्सचे कॅमेरे असतील. अर्थात या दोन्ही बाजूच्या कॅमेर्‍यांमधून अतिशय उत्तम दर्जाच्या प्रतिमा काढता येतील.

जिओनी एस११ या स्मार्टफोनमध्ये ५.९९ इंच आकारमानाचा आणि एचडी प्लस म्हणजेच २१६० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा व १८:९ अस्पेक्ट रेशो असणारा डिस्प्ले दिलेला आहे. यात मीडियाटेकचा हेलिओ पी २३ प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम ४ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. जिओनी एस११ मॉडेलमध्ये ३,४१० मिलीअँपिअरची बॅटरी दिलेली आहे. हे मॉडेल अँड्रॉइडच्या नोगट आवृत्तीवर चालणारे असून यावर कंपनीचा अमिगो ५.० हा युजर इंटरफेस असेल. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तर यात अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत.