..आता इतर संघांनी पाकिस्तानात खेळावे

 • First Published :19-June-2017 : 23:58:36

 • लंडन : चॅम्पियन्स चषक पटकाविल्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद हा अत्यंत भावुक झाला. चॅम्पियन बनल्यानंतरचा जल्लोष अजूनही थांबलेला नाही. हा चषक किती महत्त्वाचा आहे, हे सांगत त्याने इतर संघांना पाकिस्तानात खेळण्याचे आवाहनही केले.

  २००९ मध्ये श्रीलंका संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर क्रिकेट खेळणाऱ्या अन्य संघांनी पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. आता पाकिस्तानात संघ यावेत, अशी आशा आहे. विजयानंतर सरफराज म्हणाला, श्रेय खेळाडूंनाच जाते. या ऐतिहासिक क्षणाला पाकिस्तानचे क्रिकेट चाहते बरीच वर्षे स्मरणात ठेवतील.

  आम्ही येथे आठव्या क्रमांकाचा संघ म्हणून आलो होतो आणि चॅम्पियन बनलोय. आशा आहे, की आता पाकिस्तानात इतर संघ खेळतील. संघातील प्रत्येकासाठी हा क्षण अविस्मरणीय आहे. त्याचे वर्णन करणे सध्यातरी कठीण आहे. फखर झमान सारखा खेळाडू पहिलीच स्पर्धा खेळला. पाकिस्तान संघ मोठ्या संघर्षातून पुढे जात आहे. संघ घरचे सामने दुबईत खेळत आहे. इतर संघांप्रमाणे घरच्या परिस्थितीचा फायदा आम्हाला मिळत नाही. अशा परिस्थितीतून आम्ही चॅम्पियन्स चषकावर नाव कोरले. 

  निश्चितच, आमच्यासाठी ही गौरवाची बाब आहे. आता इतर संघांनी पाकिस्तानात खेळावे, असे मी आवाहन करतो.

  पाकिस्तानात विजयाचा जल्लोष

  लंडनच्या ओव्हल मैदानावर भारताचा पराभव केल्यानंतर पाकिस्तानात जल्लोष केला जात आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ यांनी संघाला शुभेच्छा दिल्या. राष्ट्रपती ममनून हुसेन, सेनाप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा आणि पाकिस्तानचे प्रधान न्यायाधीश मिलन साकिब यांनी संघावर स्तुतिसुमने उधळली.

  पंतप्रधानांनी आपल्या व्हिडिओ संदेशात म्हटले की, पाकिस्तानचा संघ फायनलमध्ये छान खेळला. विजय मिळवत आमचा सन्मान केला. चॅम्पियन झाल्याबद्दल संघाला शुभेच्छा.माजी कर्णधार मिस्बाह उल हक म्हणाला, हा विजय युवा आणि कम अनुभवी आणि नव्या कर्णधाराच्या योगदानामुळे मिळाला. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, युवा खेळाडूंच्या एकजुटीमुळे हा विजय मिळाला.

  पाकिस्तानात रविवारी रात्री रस्ते जाम झाले होते. युवा मुले आणि मुली पाकिस्तान संघाच्या जर्सीसह जल्लोष करीत होते. काही लोकांनी पेढे वाटले. काहींनी तर हवेत फायरिंग करीत विजयाचा आनंद साजरा केला. या आनंदोत्सवात कराची येथे सहा जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे.

  दिग्गजांकडून कौतुक पाक संघ ‘सुपर पॉवर’पेक्षा सरस

  कराची : विद्यमान पाकिस्तानी संघात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बलाढ्य संघ बनण्याची क्षमता आहे, असे मत वर्ल्डकप विजेता कर्णधार इम्रान खान याने व्यक्त केले. तथापि, देशातील युवा प्रतिभावान खेळाडूंना घडवण्यासाठी प्रणालीची उणीव असल्याचे त्याने मान्य केले. इम्रानने पाकिस्तानला १९९२ साली वर्ल्डकपमध्ये विजेतेपद मिळवून दिले होते. तो म्हणाला, ‘‘आमचा संघ तेव्हा विश्व क्रिकेटमध्ये सुपर पॉवर होता; परंतु या संघात ‘सुपर पॉवर’पेक्षा आणखी सरस करण्याची क्षमता आहे. त्यांनी भारताकडून पहिल्या सामन्यात झालेल्या दारुण पराभवानंतर शानदार पुनरागमन केले. त्यांचे आभार.’’ तथापि, एवढ्या मोठ्या जनसंख्या असणारा देश असतानाही अन्य खेळात होणारी पीछेहाट होत असल्याचे दु:ख त्याने व्यक्त केले.

  पाक वर्ल्डकपमध्ये अव्वल तीन दावेदारांत

  लंडन : चॅम्पियन्स ट्रॉफीतील शानदार विजयानंतर पाकिस्तान २0१९ च्या एकदिवसीय वर्ल्डकप विजेतेपदाचा प्रबळ दावेदार बनला आहे, असे माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने म्हटले. तो म्हणाला, ‘‘हा एक असा विजय आहे जो की, पाकिस्तानी चाहते प्रदीर्घ काळ स्मरणात ठेवतील. पाकिस्तानने जबरदस्त पुनरागमन केले आणि कोणतीही आशा नसल्यानंतरही चॅम्पियन बनले. संघाने ज्याप्रकारे सामना जिंकला तो खूपच प्रभावी होता. प्रबळ दावेदार भारताला हरवणे सुखद आश्चर्य आहे. आता पाकिस्तानकडे असा संघ आहे जो की, इंग्लंडमध्ये २0१९ च्या वर्ल्ड कपपर्यंत अव्वल तीन संघांपर्यंत प्रगती करू शकतो.’’

  पाकिस्तानने योग्यवेळी खेळ उंचावला : हसी

  लंडन : दुबळा मानला जाणाऱ्या पाकिस्तानी संघाने योग्यवेळी आपला खेळ उंचावला आणि भारताविरुद्ध फायनलमध्ये सर्वोत्तम क्रिकेट खेळून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, असे आॅस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मायकल हसीने म्हटले आहे. त्याने आपल्या स्तंभात लिहिले की, ‘‘फायनलआधी पाकिस्तानी संघाला कमजोर मानले जात होते. स्पर्धेच्या खराब सुरुवातीनंतर अधिकांश तज्ज्ञांनी त्याला जिंकण्याची संधी असल्याचे मानले नव्हते; परंतु ओव्हलमध्ये त्यांनी आपला सर्वोत्तम खेळ केला.’’

  तर आॅस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी केली असती

  नवी दिल्ली : मुर्दाड खेळपट्टीवर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊन विराट कोहलीने काही चूक केले नाही; परंतु आॅस्ट्रेलियाचा माजी फलंदाज अ‍ॅडम गिलख्रिस्टने चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलसारख्या मोठ्या लढतीत प्रथम फलंदाजी करण्याचा योग्य पर्याय असतो, असे सांगितले. मोठ्या फायलनमध्ये आॅस्ट्रेलियाचा आधीचा संघ असता तर त्यांनी प्रथम फलंदाजी करणे पसंत केल असते. मोठी धावसंख्या रचून प्रतिस्पर्ध्यावर दबाव टाकण्याकडे आॅस्ट्रेलियाचा कल असता. तथापि, भारताने जास्त सामने ही लक्ष्याचा पाठलाग करून जिंकले आहेत. त्यामुळे विराटच्या निर्णयावर तुम्ही टीका करू शकत नाही. फखरचा उडालेला झेल नोबॉल चेंडूवर उडाला नसता तर वेगळे चित्र असते, असे गिलख्रिस्ट म्हणाला.महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS