वेळेचं व्यवस्थापन ही एक कला ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 02:25 PM2019-03-13T14:25:41+5:302019-03-13T14:26:03+5:30

प्रत्येक व्यक्ती आनंदी आणि संतुलित आयुष्य जगण्यासाठी धडपड करीत असते. हे करीत असताना त्याला अनेक प्रकारच्या तणावाला सामोरे जावे ...

Time management is an art! | वेळेचं व्यवस्थापन ही एक कला ! 

वेळेचं व्यवस्थापन ही एक कला ! 

googlenewsNext

प्रत्येक व्यक्ती आनंदी आणि संतुलित आयुष्य जगण्यासाठी धडपड करीत असते. हे करीत असताना त्याला अनेक प्रकारच्या तणावाला सामोरे जावे लागते. सामान्यत: हे तणाव शारीरिक, मानसिक आणि भावनिक प्रकारचे असू शकतात. जर आपण आपल्या वेळेचे नीट व्यवस्थापन केल्यास बºयाच अंशी हे सर्व तणाव कमी होतात.

माझे आयुष्य आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी मी माझ्या आयुष्याचे ध्येय ठरविले आहे आणि वेळेचे व्यवस्थापन उत्तम प्रकारे करतो. वेळेचे विभाजन विशिष्ट क्रियाकलाप करून त्याचे नीट आयोजन आणि नियोजन करण्याच्या प्रक्रियेला वेळेचे व्यवस्थापन म्हणतात. मी दोन नियमांचे काटेकोरपणे पालन करतो.  या दोन नियमानुसार मी प्रत्येक गोष्टींचे नियोजन व्यवस्थित करून ते अमलात आणतो. यात सर्वात महत्त्वाचे वेळेचे नियोजन असून, त्याने आयुष्यातील अनेक गोष्टींवर मात करता येते. 

मी माझ्या कॉलेजच्या जीवनापासून वेळेचे व्यवस्थापन करीत आलो आहे. याने माझे आयुष्य आनंदी आणि शांततेने जगतोय. मी वेळेच्या व्यवस्थापनाचा चांगला अनुयायी आहे. १९९५ पासून माझी अस्थिरोगतज्ज्ञ म्हणून प्रॅक्टिस चालू केली तेव्हापासून माझ्या वेळेचे विभाजन पुढीलप्रमाणे करतो. मी माझा ६० टक्के वेळ माझ्या व्यवसायासाठी, २० टक्के वेळ कुटुंबासाठी, १० टक्के वेळ माझ्या छंदासाठी आणि १० टक्के वेळ मी काही संस्थांमध्ये काम करण्यासाठी देतो. वेळेचे व्यवस्थापन नीट केल्यास अनेक फायदे होतात. प्रामुख्याने तुम्ही जास्त कार्यक्षम व यशस्वी होता, तुम्हाला अधिक मोकळा वेळ मिळतो, काम टाळणे कमी होते, पुनरावलोकन करण्यास प्रोत्साहन देते, तुमच्या चिंता कमी होतात आणि ताण कमी झाल्याने निरोगी राहता. 

वेळेचे व्यवस्थापन करताना कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायचे हे ठरविले पाहिजे. त्याचा क्रम पुढीलप्रमाणे असावा, प्रथम जे काम तातडीचे आणि अत्यंत महत्त्वाचे त्याला, दुसरा जे काम महत्त्वाचे पण लवकर करण्यासारखे आहे ते आणि शेवटी ज्या गोष्टी फार महत्त्वाच्या नाहीत त्यासाठी एका वेळेची अंतिम मुदत ठरवून पूर्ण करायचे. वेळेचे व्यवस्थापन करण्यासाठी अनेक साधने वापरतो. यामध्ये नोट पॅड, वर्षाचे कॅलेंडर, वर्षाचे नियोजक, क्लिक ट्रे, गुंतवणूक नियोजक, स्मरणपत्र सॉफ्टवेअर यांचा समावेश आहे. मी माझी आणि माझ्या व्यवसायाची सर्व कागदपत्रे अत्यंत काळजीपूर्वक माझ्या संगणक आणि काही माहिती मोबाईलमध्ये ठेवतो. 

मी वेळेचा अभ्यास केल्यानंतर एका निष्कर्षावर आलो आहे, तो म्हणजे आपण जर ७० वर्षे आयुष्य जगलो तर आपण खरं आयुष्य फक्त ७ वर्षेच जगतो. याचे कारण आपण दररोज ७ तास झोपतो, बालपणात आणि शालेय जीवनात काही कळत नाही, कॉलेजमध्ये कळते पण निर्णय घेण्याचा अभाव व पैसे नसतात, वयाच्या ६० नंतर अनेक गोष्टींचे अडथळे या सर्वांची बेरीज केली तर आपण खरं आयुष्य फक्त ७ वर्षेच जगतो. या ७ वर्षांचे व्यवस्थित व्यवस्थापन हे आयुष्याच्या यशाची गुरुकिल्ली आहे. मी व्यवसायात आणि इतर संस्थांमध्ये सांघिक काम करण्याच्या पद्धतीचा उपयोग करतो. जर विकेंद्रीकरण करून कामाचे विभाजन व्यवस्थित केल्यास तुमचा बराच वेळ वाचतो आणि तुम्हाला उत्तम यश मिळते. 

वरील सर्व गोष्टींचे पुनरावलोकन केल्यास वेळेचे व्यवस्थापन ही एक कला असून, त्यासाठी आपल्या आयुष्याचे ध्येय ठरविणे, वेळेचे विभाजन करणे, महत्त्वाच्या गोष्टींना प्राधान्य देणे, स्वत:ला आयोजित करा, वेळ वाया जाणाºया गोष्टींना नाही म्हणायला शिकले पाहिजे, रिकामा वेळ कामी लावणे, हातातील महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, स्वत:साठी वेळ काढणे आणि यश मिळाल्यानंतर तो साजरा करणे या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
- डॉ. व्यंकटेश मेतन
(लेखक अस्थिरोगतज्ज्ञ आहेत)

Web Title: Time management is an art!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.