सोलापूर क्राईम ; गर्भवती महिलेचा खून केल्याप्रकरणी पतीस जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 04:48 PM2018-11-30T16:48:57+5:302018-11-30T16:50:45+5:30

सोलापूर : लग्नात सासºयाने म्हणावा तसा मानपान केला नाही, माहेरून एक लाख रुपये घेऊन ये असे म्हणून पत्नीचा दोरीने ...

Solapur crime; Husband's life imprisonment for murder of pregnant woman | सोलापूर क्राईम ; गर्भवती महिलेचा खून केल्याप्रकरणी पतीस जन्मठेप

सोलापूर क्राईम ; गर्भवती महिलेचा खून केल्याप्रकरणी पतीस जन्मठेप

Next
ठळक मुद्देपन्नास हजार नुकसान भरपाईचे आदेश, सासरा मात्र निर्दोष...पती मिथून सुभाष राठोड , सासू तानुबाई सुभाष राठोड अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे

सोलापूर : लग्नात सासºयाने म्हणावा तसा मानपान केला नाही, माहेरून एक लाख रुपये घेऊन ये असे म्हणून पत्नीचा दोरीने गळा आवळून खून केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.व्ही. सावंत-वाघोले यांनी पतीस जन्मठेप तर सासूला दोन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. 

पती मिथून सुभाष राठोड (वय २५), सासू तानुबाई सुभाष राठोड (वय ४५ रा. कामती खुर्द लमाण तांडा, ता. मोहोळ) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. खटल्याची पार्श्वभूमी अशी की, प्रियंका हिचे लग्न आरोपी मिथून सुभाष राठोड याच्यासोबत ८ मे २0१४  रोजी झाले होते. लग्नामध्ये सासू तानुबाई हिने एक तोळे सोन्याची मागणी केली होती. गावातील लोकांनी मध्यस्थी करून अर्ध्या तोळ्याची अंगठी दिली होती.

नागपंचमीच्या सणाला प्रियंका ही आली असता तिचा पती मिथून याने तिला घरी नेले व मारहाण केली आणि पुन्हा सासरवाडीत आणून सोडले. मिथून याने ऊस तोडणाºया टोळीला एक लाख रुपये द्यायचे आहेत ते माहेरून घेऊन ये असा तगादा लावला होता. दिवाळीच्या सणात प्रियंका हिला आणण्यासाठी तिचे वडील गेले असता त्यांच्यासमोरच मिथून याने तिला मारहाण केली होती. या भांडणात गावातील अनेक प्रतिष्ठित लोकांनी मिथून याची समजूत काढली होती. 

प्रियंका ही गर्भवती होती. सर्व काही ठिक होईल असे सांगून तिच्या माहेरचे लोक निघून गेले. त्यानंतर  २२ डिसेंबर २0१४ रोजी प्रियंकाच्या वडिलांना सायंकाळी ५.३0 वाजता मिथून याने फोन केला व सांगितले की तुमच्या मुलीने फाशी घेऊन आत्महत्या केली आहे. प्रियंकाचे वडील व इतर नातेवाईक कामती खुर्द लमाणतांडा येथे गेले असता तिच्या गळ्यावर दोरीने आवळल्याचे व्रण दिसून आले. त्यावरून प्रियंका हिने आत्महत्या केली नसून तिचा खून झाला असल्याची फिर्याद कामती पोलीस ठाण्यात दिली होती.

सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. प्रदीपसिंग राजपूत यांनी साक्षीदारांच्या जबाबातील सुसंगतपणा तसेच घटनेच्यावेळी प्रियंका ही आरोपीच्या घरी होती व ती कशी मयत झाली याचा विश्वासार्ह खुलासा आरोपींनी दिला नाही. डॉक्टरांच्या म्हणण्यावरून प्रियांका हिने आत्महत्या केली नसून तिचा खून झाला आहे असा युक्तिवाद केला. हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने पती मिथून सुभाष राठोड याला जन्मठेप तर सासू तानुबाई हिला दोन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. या खटल्यात सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. प्रदीपसिंग राजपूत, मूळ फिर्यादी विलास चव्हाणतर्फे अ‍ॅड. विनोद सूर्यवंशी यांनी तर आरोपीतर्फे अ‍ॅड. धनंजय माने यांनी काम पाहिले. 

पन्नास हजार नुकसान भरपाईचे आदेश, सासरा मात्र निर्दोष...
च्खटल्यात मिथून सुभाष राठोड यास खुनाच्या आरोपाखाली जन्मठेप व ७ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १ वर्षाचा कारावासाची शिक्षा. पुरावा नष्ट केल्याप्रकरणी ७ वर्षांचा कारावास व ३ हजारांच्या दंडाची शिक्षा. दंड न भरल्यास ६ महिन्याच्या कारावासाची शिक्षा, छळ केल्याप्रकरणी मिथून व सासू तानुबाई राठोड हिस २ वर्षे सक्तमजुरी व १ हजाराचा दंड, दंड न भरल्यास १५ दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली व नुकसानभरपाई म्हणून ५0 हजार रुपये फिर्यादीस देण्याचा आदेश दिला. या प्रकरणात सासरा सुभाष केशव राठोड याला निर्दोष सोडण्यात आले. 

Web Title: Solapur crime; Husband's life imprisonment for murder of pregnant woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.