कोण म्हणतं इंटरनेट फक्त त्रासच देतं? एका 'मीम'मुळे अख्तरभाई पोहोचला जगभर!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 06:25 AM2024-04-19T06:25:18+5:302024-04-19T06:28:26+5:30

मीम हा प्रकार गेल्या काही वर्षांत प्रचंड लोकप्रिय झाला आहे.

Who says the internet is only trouble muhammad sarim akhtar reached the whole world | कोण म्हणतं इंटरनेट फक्त त्रासच देतं? एका 'मीम'मुळे अख्तरभाई पोहोचला जगभर!

कोण म्हणतं इंटरनेट फक्त त्रासच देतं? एका 'मीम'मुळे अख्तरभाई पोहोचला जगभर!

मीम हा प्रकार गेल्या काही वर्षांत प्रचंड लोकप्रिय झाला आहे. इंटरनेटवर लोक सतत मीम्स बनवून टाकत असतात आणि अनेकजण आवडीने ती मीम्स बघतही असतात.  मीम हे काही प्रमाणात कार्टूनसारखंच असतं. एखादं चित्र आणि त्याच्याशी संबंधित एखादं वाक्य यातून विनोदनिर्मिती करणं हेच या दोन्हींत केलं जातं; मात्र मीम बनवण्यासाठी स्वतः चित्र किंवा व्यंगचित्र काढायची गरज नसते. एखादा तयार फोटो घेऊन त्याचंही मीम बनवता येतं. 

त्यामुळे इंटरनेटवर लोकांनी पोस्ट केलेले काही फोटो असं मीम बनविण्यासाठी प्रचंड प्रमाणात वापरले जातात. असा तुफान व्हायरल झालेला आणि मीमसाठी वापरला गेलेला फोटो म्हणजे चेहऱ्यावर विलक्षण अपेक्षाभंग दिसणारा निळं बिनबाह्यांचं जॅकेट घातलेला एक माणूस.

हा माणूस कोण आहे आणि हा फोटो कोणी, कधी आणि कुठे काढला, याबद्दल काहीही माहिती नसताना जगभरात हा चेहेरा मीम बनवताना अपेक्षाभंग दाखवायला वापरला गेला. आणि ते एका अर्थी योग्यही आहे. कारण हा फोटो ज्या माणसाचा आहे, तो माणूस त्याक्षणी पराकोटीचा अपेक्षाभंगच अनुभवत होता. या माणसाचं नाव आहे मोहम्मद सरीम अख्तर. हा माणूस खरं म्हणजे एक सर्वसामान्य पाकिस्तानी क्रिकेट फॅन आहे. २०१९ च्या क्रिकेट वर्ल्डकपच्या वेळी तो पाकिस्तानविरुद्ध ऑस्ट्रेलिया अशी मॅच स्टेडियममध्ये बघायला तिकीट काढून गेला होता. त्या मॅचच्या दरम्यान असिफ अलीने अत्यंत मोक्याच्या क्षणी एक झेल सोडला. तो झेल सोडतेवेळी एक कॅमेरा मोहम्मद सरीम अख्तर यांच्यावर होता. आणि त्या कॅमेऱ्यात मोहम्मद यांची अत्यंत अपेक्षाभंग झालेली भावमुद्रा टिपली गेली आणि त्यानंतर गेली जवळजवळ ५ वर्षे हा चेहेरा ‘अपेक्षाभंगाचा चेहेरा’ म्हणून शेकडो मीम्समध्ये वापरला गेला; पण या चेहेऱ्याचं नाव काय हे मात्र कोणालाही माहिती नव्हतं.

नुकतंच या मीमला हाँगकाँगमधील पहिल्या मीम संग्रहालयात स्थान मिळालं आणि तिथून मोहम्मद यांचं नाव उजेडात आलं. मोहम्मद यांनी या समावेशाबद्दल ट्विट करून आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिलंय, “माझ्या नावाचा हाँगकाँग मीम संग्रहायलायत समावेश करण्यात आला आहे. युहू...!” हे त्यांनी पोस्ट केल्यानंतर त्या पोस्टला पाच लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. तर शेकडो लोकांनी त्यावर कॉमेंट्स केल्या आहेत. या कॉमेंट करणाऱ्या अनेक लोकांनी मजेशीर कॉमेंट्स केल्या आहेत.

यातील एका नेटकऱ्याने लिहिलं, “म्हणजे??? हा माणूस खरा आहे???” त्यावर दुसऱ्याने उत्तर दिलं, “अर्थात! तुला काय तो कार्टून कॅरॅक्टर वाटला होता की काय?” दुसऱ्या एकाने म्हटलं आहे, “तू आता मोनालिसासारखा झाला आहेस. येणाऱ्या कित्येक पिढ्यांना तुझा चेहेरा नक्की माहिती असेल.” तर तिसऱ्या एका नेटकऱ्याने म्हटलं आहे, “तुझ्या चेहेऱ्याचा समावेश तर इमोजीमध्ये देखील करायला हवा.” एकूणच आपल्याला मीम्समधून जवळजवळ रोजच दिसणाऱ्या या चेहेऱ्याची ओळख जेव्हा समोर आली तेव्हा नेटकऱ्यांनी त्याला छान प्रतिसाद देऊन त्याचं अभिनंदन केलं.

अख्तर म्हणतात, “माझं नाव जेव्हा लोकांना समजलं तेव्हा मला फेसबुकवर अक्षरशः हजारो फ्रेंड रिक्वेस्ट्स आल्या. माझा फोनही दिवसरात्र सतत वाजत होता. कारण हे मीम फक्त क्रिकेट खेळणाऱ्यांमध्येच प्रसिद्ध झालं असं नाही, तर जगभरातल्या अनेक देशांमध्ये माझ्या चेहेऱ्याची मीम्स प्रसिद्ध झाली. या देशांमध्ये युगांडा, बोट्स्वाना, मलेशिया आणि इंडोनेशिया यांसारखे देशही आहेत. या देशांमध्ये क्रिकेटचं अजिबात प्रस्थ नाही; मात्र तरीही एखादा निर्णय आवडला नसेल किंवा अपेक्षाभंग दाखवायचा असेल तर हे मीम त्याही देशातले लोक वापरतात. कारण त्यांना असं वाटतं की, आपल्याला नेमकं हेच म्हणायचं होतं.” 

हे मीम व्हायरल झाल्याच्या दुसऱ्या वाढदिवसाला क्रिकेट फॅन्स आणि अधिकृत क्रिकेट अकाउंट्सनी एकत्र येऊन अख्तर यांची ऐतिहासिक भावमुद्रा अक्षरशः साजरी केली. इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल आणि सॉमरसेट काउंटी यांनीही हे मीम स्वतःच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केलं. 

कोण म्हणतं इंटरनेट फक्त त्रासच देतं?
इंटरनेटवर एखादी पोस्ट, एखादा फोटो किती वेगाने व्हायरल होऊ शकतो याची अनेक उदाहरणं रोजच आपल्यासमोर येत असतात. त्यातल्या अनेक उदाहरणांमध्ये कोणाचं तरी नुकसान झालेलं अनेकदा दिसून येतं. हा सहज व्हायरल झालेला फोटो आणि त्यातून निर्माण झालेली मीम्स यातून प्रत्येकाला केवळ आनंदच मिळालेला दिसतो. इंटरनेट सगळ्या जगाला एकत्र विचार करायला लावू शकतं, याचं हे उत्तम उदाहरण आहे.

Web Title: Who says the internet is only trouble muhammad sarim akhtar reached the whole world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.