खासदारांची इच्छा आम्ही पूर्ण करू -  भाजपचा इशारा  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2018 08:42 PM2018-06-26T20:42:48+5:302018-06-26T20:43:04+5:30

सावंतवाडी तालुक्यात विस्कळीत झालेल्या बीएसएनएल सेवेबाबबत भाजपच्या शिष्टमंडळाने येथील जिल्हा प्रबंधक मिलिंद  क्षीरसागर यांना मंगळवारी धारेवर धरत सेवा सुधारा.

We will fulfill the wishes of the MPs - BJP's warning | खासदारांची इच्छा आम्ही पूर्ण करू -  भाजपचा इशारा  

खासदारांची इच्छा आम्ही पूर्ण करू -  भाजपचा इशारा  

Next

सावंतवाडी  - तालुक्यात विस्कळीत झालेल्या बीएसएनएल सेवेबाबबत भाजपच्या शिष्टमंडळाने येथील जिल्हा प्रबंधक मिलिंद  क्षीरसागर यांना मंगळवारी धारेवर धरत सेवा सुधारा, अन्यथा खासदार राऊतांनी दिलेला इच्छा आम्ही पूर्ण करत कार्यालयाला टाळे ठोकू, असे सांगितले. दरम्यान, येत्या दोन दिवसात सेवा सुधारण्याच्या आश्वासनानंतर घेराव मागे घेण्यात आला.
सावंतवाडी तालुक्यातील बांदा, माडखोल, सांगेली शिरशिंगे, ओटवणे तसेच सावंतवाडी शहरातील बीएसएनएलची सेवा वारंवार विस्कळीत होण्याचे प्रकार घडत आहेत. याबाबत बीएसएनएल कर्मचारी तसेच अधिकारी वर्गांना निवेदने देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. त्यामुळे ग्राहकांना याचा नाहक मनस्ताप सहन करावा लागत होता. महाविद्यालयीन प्रवेशाकरिता आवश्यक दाखले देण्यात ग्रामपंचायतींना अडचणींना सामोरे जावे लागत होते. काही ठिकाणी ठेकेदाराने अर्धवट काम टाकून पळाल्याने सेवा बंद आहे. 
याचा सर्व रोष गावातील लोकप्रतिनिधींना सहन करावा लागत असल्याने अखेर भाजपाच्या शिष्टमंडळाने प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांच्या उपस्थितीत जिल्हा प्रबंधक मिलिंद क्षीरसागर यांना टार्गेट करत घेराव घातला. यावेळी तालुकाध्यक्ष महेश सारंग, बांदा सरपंच मंदार कल्याणकर, जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, माडखोल सरपंच संजय सिरसाट, अनिल परब, नगरसेवक आनंद नेवगी, संजू शिरोडकर, पंचायत समिती सदस्या प्राजक्ता केळुसकर, महेश धुरी, प्रथमेश तेली, अमित परब, परिणिता वर्तक, आनंद तळवणेकर, बांदा ग्रामपंचायत सदस्य हेमंत दाभोलकर, अजय सावंत, अनिल परब आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दोन दिवसांपूर्वी खासदार विनायक राऊत यांनी बीएसएनएल कामांबद्दल नाराजी व्यक्त करुन कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता. त्या पाठोपाठ आज दुपारनंतर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक बनले.
महामार्गाच्या कामात केबल तुटली जाते. त्यावर भर घातल्याने केबल खोलीवरुन काढून दुरुस्ती केली जाते. त्यामुळे तसेच वीज पडल्याने बºयाच ठिकाणी सेवा विस्कळीत झाली आहे, असे कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रश्नावर क्षीरसागर म्हणाले. मात्र खासगी कंपन्याच्या केबल तुटूनही सेवा विस्कळीत होत नाही, त्यांच्या टॉवरना पावसाचा व्यत्यय येत नाही. हे फक्त बीएसएनएलच्याच बाबतीत का, असा उलट प्रश्न केला. इथले अधिकारी मुजोर बसले असून, ते फक्त पगारासाठी काम करतात. त्यांना लोकांचे काय लागले नाही. जिल्ह््यात बीएसएनएलची स्थिती पाहता खासगी कंपन्यांना विकण्याचा घाट दिसून येत असल्याचा आरोपही यावेळी केला.
सावंतवाडी शहरात तसेच कोलगाव येथे सेवा मिळत नाही. ग्राहकांमध्ये प्रचंड चीड आहे. त्यामुळे त्यांनी सिमकार्डे तुमच्या ताब्यात द्यायची काय? वेळोवेळी तक्रारी करुनही दुर्लक्ष केले जात आहे. माडखोल टॉवर तेथील कर्मचारी बंद करुन जातो. याबाबत अधिकाºयांना निवेदन देऊनही कार्यवाही होत नाही. आज एक महिना होत आला, त्यावर काय कार्यवाही केली, असा प्रश्न महेश सारंग यांनी उपस्थित केला. रस्त्याच्या बाजुला चर मारल्यामुळे बांदा ग्रामपंचायतीचे दोन लाखाचे नुकसान केल्याची बाब तेथील भाजपा कार्यकर्त्यांनी लक्षात आणून दिली. 
तेथील ओएफसी केबल वेळोवेळी ब्रेक होत  असल्याने त्यावर नेटवर्क कसे चालणार, असा सवाल केला. याबाबत अधिकाºयांच्या लक्षात आणून देऊनही उपाय केले जात नाहीत? ठेकेदाराने काम अर्धवट टाकून पलायन केल्याने तेथील बीएसएनएल ग्राहक सेवेवाचून वंचित आहे. हा प्रकार गेले एक महिन्यापासून आहे, असे सरपंच मंदार कल्याणकर यांनी उघडकीस आणून दिले. 
कारिवडे, माडखोल येथील दूरसंचार सेवा विस्कळीत झाली याला अधिकारी जबाबदार आहेत. ओटवणे, आंबोली, चौकूळ, शिरशिंगेसह तालुक्यातील सेवा सुधारा. त्याबाबत आम्हाला ठोस निर्णय द्या. अन्यथा खासदार राऊतांनी दिलेला इशारा आम्ही पूर्ण करत कार्यालयास टाळे ठोकू, असे महेश सारंग यानी सांगितले.
दरम्यान, बांदा तसेच माडखोल पंचक्रोशीतील सेवा येत्या दोन दिवसात सुधारु, आवश्यक ठिकाणी केबल बदलू, असे आश्वासन क्षीरसागर यांनी दिल्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी माघार घेतली.
चौकट 
बीएसएनएल जिओला विकायची आहे का?
जिल्ह्यात बीएसएनएलची झालेली स्थिती, ग्राहकांना मिळणारी विस्कळीत सेवा त्यावर उपाय नाही. अधिकाºयांचा कामचुकारपणा लक्षात घेता तुम्हाला सरकारची ही दूसरंचार सेवा जिओला विकायची आहे का, असा संतप्त सवाल उपस्थितांनी अधिकाºयांना केला.
खासगी जमिनीमुळे टॉवर बंद
बांदा येथे गेले वर्षभरापासून एकाने आपल्या  मालकीच्या जमिनीतून केबल टाकण्यास विरोध दर्शविल्याने तेथील टॉवर बंद आहे. मात्र, यावर तोडगा काढण्यासाठी बीएसएनएलच्या वरिष्ठांनी काय प्रयत्न केले, असा प्रश्न सरपंच मंदार कल्याणकर यांनी जिल्हा प्रबंधक क्षीरसागर यांना केला. मात्र या प्रश्नावर ते अनुत्तरीत झाले. आपण लक्ष देत नसल्याने आम्हाला लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागते, असे कल्याणकर यांनी त्यांच्या लक्षात आणून दिले.

Web Title: We will fulfill the wishes of the MPs - BJP's warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.