मतदारांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावायला हवा, प्रांताधिकारी कातकर यांचे आवाहन 

By सुधीर राणे | Published: April 15, 2024 01:30 PM2024-04-15T13:30:19+5:302024-04-15T13:31:42+5:30

कणकवली: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला राज्यघटना दिली आहे. तसेच राज्यघटनेने लोकशाही व्यवस्था निर्माण केली आहे. जगातील सर्वात मोठी ...

Voter awareness rally in Kankavali city | मतदारांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावायला हवा, प्रांताधिकारी कातकर यांचे आवाहन 

मतदारांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावायला हवा, प्रांताधिकारी कातकर यांचे आवाहन 

कणकवली: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला राज्यघटना दिली आहे. तसेच राज्यघटनेने लोकशाही व्यवस्था निर्माण केली आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या देशामध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ होणार आहे. लोकशाहीमध्ये निवडणुकीला खूप महत्त्व असून मतदाराला राजा असे संबोधले जाते.कणकवली विधानसभा मतदारसंघातील शंभर टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा अधिकार   बजावायला हवा, असे आवाहन प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी केले.

भारतीय निवडणूक आयोगाच्या मतदार जागरूकता व निवडणूक सहभाग कार्यक्रमांतर्गत कणकवली उपविभागीय कार्यालय , कणकवली तहसीलदार कार्यालय यांच्यावतीने कणकवली शहरातून लोकसभा निवडणुकीबाबत जनजागृती करण्यासाठी सायकल व मोटर बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी जगदिश कातकर बोलत होते.    

यावेळी तहसीलदार दीक्षांत देशपांडे म्हणाले, स्वीप कार्यक्रमांतर्गत दिव्यांग मेळावा, महिला मिळावा, वृद्ध मेळावा असे कार्यक्रम घेण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाच्या आदेशाने स्विप कार्यक्रमांतर्गत मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली आहे. याद्वारे एकही मतदार मतदानापासून वंचित राहता कामा नये, प्रत्येकाने आपल्या मतदानाचा हक्क बजावला पाहिजे यासाठी प्रबोधन करण्यात येत आहे असेही देशपांडे म्हणाले.

रॅलीची सुरुवात तहसील कार्यालय येथे प्रांताधिकारी यांनी हिरवा झेंडा दाखवून केली. रॅली सर्व्हीस रस्त्यावरून पटवर्धन चौकातून बाजारपेठ, पटकी देवी, नगरपंचायत, कॉलेज रोड मार्गे तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आली. रॅलीच्या सुरुवातीला 'मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा जागा हो', 'वृद्ध असो की जवान, प्रत्येकाने करा आपले मतदान', 'मतदान हा माझा हक्क आहे, मी मतदान करणारच' अशा घोषणा देत मतदानाची शपथ घेण्यात आली.

रॅलीत प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, नायब तहसीलदार प्रिया हर्णे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, मंडल अधिकारी दिलीप पाटील, नगरपंचायत प्रशासकीय अधिकारी अघम यांच्यासह कनक रायडर्सचे सायकलिस्ट, विद्यामंदिर कणकवली व एस.एम.हायस्कूल कणकवलीचे विद्यार्थी, कणकवली कॉलेजचे एनएसएसचे विद्यार्थी त्याचबरोबर एनसीसीचे विद्यार्थी, शिक्षक तसेच महसूल अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Web Title: Voter awareness rally in Kankavali city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.