तारकर्ली निष्कलंक रहायला हवी - मधु मंगेश कर्णिक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2017 03:40 PM2017-12-26T15:40:55+5:302017-12-26T15:41:33+5:30

पर्यटनाच्या माध्यमातून वेगळी ओळख निर्माण केलेले तारकर्ली गाव झपाट्याने प्रगती साधत आहे. यात अनेक चांगल्या गोष्टी घडत आहेत

Tarkari must be clean - Madhu Mangesh Karnik | तारकर्ली निष्कलंक रहायला हवी - मधु मंगेश कर्णिक

तारकर्ली निष्कलंक रहायला हवी - मधु मंगेश कर्णिक

googlenewsNext

 

मालवण : पर्यटनाच्या माध्यमातून वेगळी ओळख निर्माण केलेले तारकर्ली गाव झपाट्याने प्रगती साधत आहे. यात अनेक चांगल्या गोष्टी घडत आहेत. त्यामुळे पर्यटनाच्या माध्यमातून घडणाºया वाईट गोष्टींना गावात थारा असता कामा नये. तारकर्ली आज जशी निष्कलंक आहे तशीच ती कायम रहायला हवी, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी केले. ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी लिहिलेल्या ‘तारकर्ली’ या कादंबरीचा प्रकाशन सोहळा रविवारी सायंकाळी तारकर्ली महापुरुष मंदिर येथे मोठ्या थाटात झाला. यावेळी व्यासपीठावर गंगाराम गवाणकर, महेश केळुसकर, वैशाली पंडित, रूजारिओ पिंटो, शशिकांत तिरोडकर, मंगेश मस्के, डॉ. जितेंद्र केरकर, स्नेहा केरकर, अनंत कोळंबकर, दादा कोळंबकर, नमिता कीर, रमेश कीर, अरुण नेरकर, महेंद्र पराडकर आदी उपस्थित होते.

यावेळी वस्त्रहरणकार गवाणकर म्हणाले, ज्या तारकर्ली गावच्या नावाने ही कादंबरी आहे त्याच तारकर्ली गावात कादंबरीचे प्रकाशन होत आहे. ही अत्यंत चांगली बाब आहे. यावेळी त्यांनी ‘अच्छी मच्छी’ ही विविध मासळीची ओळख करून देणारी कविता सादर करत उपस्थितांची वाहवा मिळविली. सूत्रसंचालन शशिकांत तिरोडकर यांनी केले. मंगेश मस्के यांनी आभार मानले. 

तारकर्लीची अवस्था गोव्यातील कलंगुट बिचसारखी होता कामा नये
यावेळी कर्णिक म्हणाले, तारकर्ली गावाची स्थित्यंतरे या नव्या कादंबरीच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पूर्वीची तारकर्ली ही गरीब होती. परंतु आताच्या तारकर्लीत फार बदल झाल्याचे दिसून येते. कादंबरी वाचताना वाचकाला काल्पनिक तसेच वास्तववादी वाटेल. 

वाचकाने कादंबरीतील वास्तवाचा शोध घेण्याचा प्रयत्न करू नये. या कादंबरीत समाजवाद नाही. पण समाजाचा आविष्कार आहे आणि तो वाचकाला जाणवेल. तारकर्लीत पर्यटनाच्या माध्यमातून चांगले बदल होत आहेत. परंतु तारकर्लीची अवस्था गोव्यातील कलंगुट बिचसारखी होता कामा नये. 

मात्र, असे होणार नाही याची जबाबदारी तारकर्लीतील ग्रामस्थांनी घ्यायला हवी. कादंबरी लिहीत असताना ज्ञानेश देऊलकर, रूजारिओ पिंटो, महेंद्र पराडकर यांची मोलाची मदत झाली आहे. त्यामुळे त्यांची आठवण आज काढणे आवश्यक असल्याचे मत मधु मंगेश कर्णिक यांनी व्यक्त केले.

तारकर्ली येथील महापुरुष मंदिरात ‘तारकर्ली’ कादंबरीच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात लेखक मधु मंगेश कर्णिक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी गंगाराम गवाणकर, महेश केळुसकर, वैशाली पंडित, डॉ. जितेंद्र केरकर, स्नेहा केरकर आदी उपस्थित होते.

Web Title: Tarkari must be clean - Madhu Mangesh Karnik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.