सिंधुदुर्ग : आंबा, काजू बागेला आग लागून नुकसान, एक लाखाची हानी, नाटळ-हुमलेटेंब येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 16:20 IST2018-01-23T16:16:16+5:302018-01-23T16:20:12+5:30
नाटळ-हुमलेटेंबवाडी येथील शेतकरी प्रभाकर भोगले यांच्या तीन एकर बागेला अचानक आग लागल्याने त्यांचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले. याबाबतचा पंचनामा तलाठ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला आहे. भोगले यांनी हुमलेटेंबवाडी येथे तीन एकर जमिनीत काजू कलमे, हापूस आंबा कलमे तसेच इतर जंगली झाडे लावली होती.

नाटळ-हुमलेटेंब येथील तीन एकरातील आंबा कलमांच्या बागेला आग लागल्याने प्रभाकर भोगले यांचे नुकसान झाले.
कनेडी : नाटळ-हुमलेटेंबवाडी येथील शेतकरी प्रभाकर भोगले यांच्या तीन एकर बागेला अचानक आग लागल्याने त्यांचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले. याबाबतचा पंचनामा तलाठ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला आहे.
भोगले यांनी हुमलेटेंबवाडी येथे तीन एकर जमिनीत काजू कलमे, हापूस आंबा कलमे तसेच इतर जंगली झाडे लावली होती. त्यांच्या बागेला अचानक आग लागल्याने आंबा, काजू व जंगली झाडे जळून खाक झाली आहेत. काही आंबा कलमे ही गेल्यावर्षी लावलेली होती तर काही कलमे ही अनेक वर्षांपूर्वीची होती.
त्या बागेच्या मध्यावरून वीज वितरणच्या वीजवाहिन्या गेल्या आहेत. त्या वाहिन्या काही ठिकाणी एकमेकांच्या जवळ आल्याने वादळात चिकटत असलेल्या दिसत आहेत. प्रथमदर्शनी या वाहिन्या चिकटल्याने शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याचे दिसत आहे.
वीज कंपनीने तारांची दुरूस्ती करण्याची मागणी
या आगीला सुरुवात विद्युत तारा चिकटलेल्या ठिकाणीच झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पावसाळ््यातही याठिकाणच्या विद्युत तारा एकमेकांना चिकटतात आणि याचा परिणाम म्हणून गावाचा वीजपुरवठा खंडित होतो. वीज वितरणच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना याबाबत वारंवार सांगूनही याबाबतची दखल घेतली जात नाही.
दखल वेळीच घेतली असती तर हा प्रसंग घडलाच नसता. याठिकाणी विद्युत तारा या ग्रामस्थांच्या डोक्याला टेकतील एवढ्या खाली आल्या आहेत. त्या पूर्वस्थितीत करण्याची मागणी ग्रामस्थांनी वीज वितरणकडे केली आहे. तसे न झाल्यास वीज वितरणविरूद्ध तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे.