‘तिलारी’च्या रूंदावत्या पात्रामुळे धोका

By Admin | Published: April 12, 2015 10:00 PM2015-04-12T22:00:18+5:302015-04-12T23:58:36+5:30

नदीकाठची जमीन ढासळतेय : बागायतदार शेतकऱ्यास प्रशासनाकडून उपाययोजना हव्यात

Risk of Tilari | ‘तिलारी’च्या रूंदावत्या पात्रामुळे धोका

‘तिलारी’च्या रूंदावत्या पात्रामुळे धोका

googlenewsNext

वैभव साळकर - दोडामार्ग  -तिलारी नदीच्या रुंदावणाऱ्या पात्रामुळे नदीकाठच्या शेतीबागायतींना मोठा धोका निर्माण झाला आहे. दिवसेंदिवस नदीचे पात्र रुंदावत असून पात्र नदीकाठची कित्येक मीटर जमीन गिळंकृत करत असल्याने शासनाने आवश्यक त्या ठिकाणी नदीतील गाळ दूर करण्याची मागणी नदीकाठच्या बागायतदारांतून होत आहे.
तालुक्यातील सीमावर्ती भागातून तिलारी घाटातील डोंगरातून खराडी येथून तिलारी नदीचा उगम होतो. पुढे वीजघर येथील वीजनिर्मिती केंद्रात चंदगड तालुक्यातील धामणे धरणातील बाोगद्याद्वारे सोडण्यात येणारे पाणीही मुळस-वीजघर येथे तिलारी नदीला मिळते. परिणामी पावसात अगोदरच तिलारी नदीचे पात्र दुथडी भरून वाहत असताना त्यात वीज केंद्रात धामणे धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे तिलारी नदीपात्रातील पाण्यात वाढ होते. त्यामुळे पावसाळाभर तिलारी नदीपात्र दुथडी भरून वाहते व नदीला मोठा पूर येतो. या पुराच्या पाण्यामुळे तिलारी नदीचे पात्र आपसुकच रूंदावते.
त्यातच तिलारी नदीत वीजघर येथे धामणे धरणातून वीजघरच्या वीजकेंद्र्रातून सोडण्यात येणारे पाणी पुढे तेरवण-मेढे येथील उन्नेयी बंधाऱ्यात अडविले जाते व तिथे वीज निर्मिती केली जाते. मात्र, तेरवण-मेढे बंधाऱ्याची पाणी साठवण क्षमता मर्यादित असल्याने तेथे पाणी अधिक काळ साठविता येत नाही. परिणामी उन्नेयी बंधाऱ्यांच्या गेटवरून अतिरिक्त पाणी पुढे तिलारी नदीतून धाव घेते आणि अशी परिस्थिती उद्भवल्या कारणाने तेरवण-मेढे उन्नेयी बंधाऱ्याच्या सर्व गेट उघडणे तिलारी प्रकल्पाला भाग पडते. त्यामुळे तिलारी नदीला पूर येतो. तिलारी येथे आयनोडे-सरगवे येथील नदीवर धरण बांधण्यात आलेल्या नदीचा पूर्वी तिलारीत संगम व्हायचा. मात्र, आता धरण पूर्ण झाल्याने नदीचे एक पात्र पूर्णत: बंद झाले.
परिणामी उन्नेयी बंधाऱ्यातून वेगाने येणारे पाणी तिलारी येथील निंबाळकर यांच्या शेती बागायतीत गेल्या दोन-तीन वर्षांपासून मोठ्या प्रमाणात घुसत असल्याने तेथे सुमारे २५ ते ३० मीटर नदीचे पात्र रूंदावले आहे. त्यामुळे तेथेच असलेल्या तिलारी येथील मोठ्या पुलाला आता मोठा धोका निर्माण झाला आहे. पुलाच्या तिलारीकडील पायथ्याच्या काही भागाचा भरावही वाहून गेला आहे. त्यामुळे पुलाला धोका अधिकच गडद झाला आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासूनचा नदीचा प्रवाहही दिवसेंदिवस बदलत असल्याने नदीकाठच्या गावातील नागरिकांच्या शेतीबागायतीही तिलारी नदी गिळंकृत करते आहे. त्यातच नदीपात्रात साचलेला गाळ व वाढलेल्या झाडी यामुळे नदीचा प्रवाह सातत्याने बदलत आहे.
तिलारी, भटवाडी, घोडगेवाडी, कोनाळकट्टा, साटेली भेडशी, परमे, कुडासे ते मणेरीपर्यंतच्या सर्वच बागायतदारांनी आता तिलारीच्या रुंदावणाऱ्या पात्राचा मोठा धसका घेतला आहे. यावर्षी तर मोठ्या प्रमाणात आलेल्या पुराने तिलारी नदीचे पात्र अधिकच रुंदावले आहे. त्यामुळे शासनाने यावर वेळीच उपाययोजना करून नदीकाठच्या आमच्या बागायती वाचवाव्यात, अशी मागणी बागायतदार नागरिकांतून केली जात आहे. शासनानेही या तिलारीच्या रुंदावणाऱ्या पात्राच्या समस्येवर योग्य तोडगा वेळीच शोधणे उचित ठरेल.


नदीच्या पुलाचेही भवितव्य अडचणीत
तिलारी येथील पुलालाही नदीच्या रूंदावत्या पात्रामुळे भविष्यात धोका संभवतो आहे. तिलारी प्रकल्पाकडे तेथे संरक्षक भिंत बांधण्याची मागणी करूनही प्रकल्पाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने त्या पुलाचे भवितव्यही धोक्यात आहे.

Web Title: Risk of Tilari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.