कवितांचा कणकवलीत जागर, आवानओल प्रतिष्ठानचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 03:38 PM2017-10-28T15:38:21+5:302017-10-28T15:46:52+5:30

तुला आदरांजली म्हणून त्याच उजेडात लिहिली एक कविता की, तुझ्या माझ्या ओल्या जखमांची सरणात होत गेली राख, कविवर्य आ. सो. शेवरे यांची अशी आशयघन कविता अ‍ॅड. विलास परब यांनी सादर केली .  

Organizing Jagaar, Shreevanol Pratishthan in Kankavali | कवितांचा कणकवलीत जागर, आवानओल प्रतिष्ठानचे आयोजन

कवितांचा कणकवलीत जागर, आवानओल प्रतिष्ठानचे आयोजन

Next
ठळक मुद्देशेवरे यांच्या प्रथम स्मृतीदिनाचे औचित्य आ. सो. शेवरे यांच्या कवितांचा कणकवलीत जागरमृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत कवितेचीच आस लागलेला कवी

कणकवली , दि. २८ : तुझ्या चितेच्या उजेडात मी कविता वाचली. माणसांच्या कहाण्यांची तेव्हा वेदनेची पाखरे सहज उडून गेली सरणावरून. शेवटी तुला आदरांजली म्हणून त्याच उजेडात लिहिली एक कविता की, तुझ्या माझ्या ओल्या जखमांची सरणात होत गेली राख, कविवर्य आ. सो. शेवरे यांची अशी आशयघन कविता अ‍ॅड. विलास परब यांनी सादर केली .

 शेवरे यांच्या एकापेक्षा एक समाज जाणीवांच्या कविता ऐकताना अंतर्मुखच व्हायला झाले. निमित्त होते ते शेवरे यांच्या प्रथम स्मृतीदिनाचे औचित्य साधून आवानओल प्रतिष्ठानतर्फे येथे आयोजित करण्यात आलेल्या जागल्या या कार्यक्रमाचे. यावेळी शेवरे यांच्या मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत कवितेचीच आस लागलेला कवी अशा प्रकारच्या अनेक आठवणी जागृत करण्यात आल्या.


आ. सो. शेवरे तथा आबा यांनी आयुष्यभर फक्त काव्यलेखन आणि सामाजिक कामच केले. त्यांची कविता आणि सामाजिक कृती ही जागल्याचेच काम करत होती. त्यांनी जागल्या नावाची अप्रतिम कविताही लिहिली होती.

९० च्या दशकाच्या प्रारंभी तळकोकणात पहिली विद्रोही साहित्य चळवळ सुरू करणाऱ्या या कलावंत-समाज चिंतकाचे गेल्या वर्षी निधन झाले. त्यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त आयोजिलेल्या या कार्यक्रमात अ‍ॅड. परब यांच्या बरोबरच अजय कांडर, राजेश कदम, विनायक सापळे, अच्युत देसाई, किशोर कदम यांनी आबांच्या आठवणी जागृत केल्या आणि त्यांच्या कवितांचे वाचन केले.


शेवरे यांनी जाती धर्मापलीकडला समाज निर्माण व्हावा असे स्वप्न पाहिले आणि समाजाला समजून घेत एकूण समाजासाठीच काम करताना समाजासाठीच कविता लिहिली. हे करताना आधी आपल्यातले माणूसपण जपण्याचा सतत प्रयत्न केला. म्हणून किशोर कदम यांनी यावेळी सादर केलेल्या त्यांच्या ह्यसत्याला सत्य नि असत्याला असत्य म्हणावे, सम्यक दृष्टी प्राप्त करत चालत रहावे अखंड माणूस म्हणून जगतानाह्ण या कवितेतून माणुसकीचेच दर्शन झाले.


यावेळी देसाई यांनी शेवरे यांची  कमळ चिखलात राहिले म्हणून ही कविता सादर करून समाजात मानल्या गेलेल्या कनिष्ठ जातीतील गुणवत्ता दुर्लक्षित करता येत नाही याचीच प्रचिती दिली तर राजेश कदम यांनी घुसमटलेल्या माणसांचा प्रश्न ही कविता सादर करून आबांच्या कवितेतील तळातल्या माणसांचेच दु:ख मांडले तर कांडर यांनी  पक्ष्याचे झाड ही त्यांची कविता सादर करताना समाजातील संवेदनशीलताच हरवत असल्याचे दाखवून दिले.

मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत कवितेची आस लागलेला कवी

यावेळी अजय कांडर म्हणाले, आबा आपल्यातून निघून गेले तरी त्यांनी जी कवितेतून दृष्टी दिली. त्यातूनच अनेकांना लिहिण्याची प्रेरणा मिळाली. मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत आस लागलेला हा कवी होता.

निधनाच्या आदल्या दिवशी त्यांना अनेक कवी भेटायला गेले तर त्यांनी मृत्यूशयेवर असतानाही त्यांच्याकडून कविताच ऐकल्या. त्यांच्यामुळेच तळकोकणात प्रथम विद्रोही साहित्य चळवळ सुरू झाली आणि त्यातून अनेक परिवर्तन विचारांचे कवी लिहिते झाले.

सध्या तांबे, सुनील हेतकर, अरूण नाईक, मधुकर मातोंडकर, सिद्धार्थ तांबे, राजेश कदम, विठ्ठल कदम, अनिल जाधव, मनिषा जाधव, अंकुश कदम ही आजची लिहिती मंडळी म्हणजे आबांच्या चळवळीची फलश्रृती होय.

आबा नसते तर...

यावेळी शेवरे यांच्या सहवासात वाढलेल्या कवी राजेश आणि किशोर कदम यांनी आबांमुळेच आम्ही चळवळीकडे ओढले गेलो आणि लिहूही लागलो. त्यांच्या सहवासात आलो नसतो तर आमचा इथवरचा प्रवासच होऊ शकला नसता अशी सहृदयी भावना व्यक्त केली.
 

Web Title: Organizing Jagaar, Shreevanol Pratishthan in Kankavali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.