अलायन्स एअरला मालवणी दणका, प्रवाशांनी विमानातच मांडली ठाण

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: September 14, 2023 08:50 PM2023-09-14T20:50:46+5:302023-09-14T20:51:11+5:30

चिपीकडे येणारे विमान अचानक रद्द केल्यानंतर पवित्रा, रात्री उशिरा कंपनीने केली राहण्याखाण्याची व्यवस्था

Malvani crash to Alliance Air, passengers staged a protest on the plane itself sindhudurg Chipi Airport latest news | अलायन्स एअरला मालवणी दणका, प्रवाशांनी विमानातच मांडली ठाण

अलायन्स एअरला मालवणी दणका, प्रवाशांनी विमानातच मांडली ठाण

googlenewsNext

सिंधुदुर्ग : मोठा गाजावाजा करून दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळावर गेल्या वर्षभरात सातत्याने अचानक फ्लाइट रद्द करण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. १ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दररोज विमान धावेल, अशी सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलेली घोषणा हवेतच विरली.

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अलायन्स एअर कंपनीच्या उड्डाण क्रमांक ९ आय ६६१ हे ५१ प्रवासी बसलेले असताना सकाळी ११:४० वाजता सुटणारे विमान अचानक रद्द केल्याचे कंपनीने जाहीर केले. त्यामुळे विमानात बसलेल्या प्रवास करणाऱ्या चाकरमानी प्रवाशांनी आक्रमक पवित्रा घेत विमानातून न उतरण्याचा निर्णय घेतला. सकाळी ११ पासून रात्री ८ वाजेपर्यंत तब्बल ९ तास प्रवासी या विमानातच बसून होते. रात्री उशिरा या प्रवाशांची राहणा, खाण्याची व्यवस्था करून उद्या त्यांना चिपीत आणले जाणार आहे. त्यामुळे एअर लाइन्सला मालवणी दणका देत या प्रवाशांनी दाखविलेल्या धैर्याचे मालवणी मुलखात, सोशल मीडियावर सर्वत्र कौतुक होत होते.

दरम्यान, हे विमान पहिले रद्द केले. त्यानंतर प्रवाशांच्या आक्रमक पवित्र्यानंतर सोडण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर एक खासगी विमान मुंबई विमानतळावर कोसळल्यानंतर अनेक विमानांची उड्डाणे रद्द केली. त्यात हे विमानही रद्द केल्याचे सांगण्यात आले. मात्र, आतील प्रवासी विमानातून न उतरताच आम्ही हलणार नाही, असा पवित्रा घेतल्यानंतर पहिला एसी बंद करून त्यानंतर, लाईट बंद करून प्रवाशांना आतून बाहेर काढण्याचा प्रयत्नही करण्यात आला. मात्र, प्रवासी आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. हे विमान रद्द होऊ नये म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्यवाह नितीन वाळके यांनी अनेक लोकप्रतिनिधींना संपर्क केला. त्यानंतर ते सोडण्यासाठी यंत्रणा तयार झाली होती.

चिपीतून प्रवाशांनाही मागे पाठविले
मुंबईकडे जाण्यासाठी चिपी विमानतळावर आलेल्या प्रवाशांनाही विमान रद्द झाल्याचे सांगून मागे पाठविण्यात आले. त्यामुळे सणासुदीच्या काळात अचानक विमान रद्द केल्याने मागे फिरणाऱ्या प्रवाशांनीही तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

वृद्ध, रुग्ण प्रवाशांना फटका
विमान सकाळी ११:४० चे असल्याने पहाटेपासूनच वसई, विरार, डहाळू आदी लांबपल्ल्याच्या प्रवासी चाकरमान्यांनी विमानतळावर येण्यासाठी घर सोडले होते. त्यातच काही प्रवासी हे वृद्ध आणि रुग्ण असल्याने त्यांना या विमानातील ठिय्या आंदोलनाचा मोठा फटका बसला.

नाईट लँडिंगचेही कारण
दरम्यान, सायंकाळी उशिरा हे विमान सोडले तर चिपी येथे नाईट लँडिंगची व्यवस्था नसल्याचे कारणही कंपनीकडून सांगण्यात आले. मात्र, प्रवाशांनी मागे न हटता आम्हाला मोपाला सोडा आणि तेथून सिंधुदुर्गात नेण्याची व्यवस्था करा, अशीही आग्रही मागणी लावून धरली होती.

Web Title: Malvani crash to Alliance Air, passengers staged a protest on the plane itself sindhudurg Chipi Airport latest news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.