आयर्लंडचे पंतप्रधान डॉ. लिओ वराडकर सिंधुदुर्गात, जंगी स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2019 04:54 PM2019-12-29T16:54:39+5:302019-12-29T20:31:46+5:30

कुटुंबीयांसह मालवणी जेवणाचा घेतला आस्वाद

Indian-origin Irish PM Leo Varadkar arrives at Sindhudurg, maharashtra in India on private visit to meet family | आयर्लंडचे पंतप्रधान डॉ. लिओ वराडकर सिंधुदुर्गात, जंगी स्वागत

आयर्लंडचे पंतप्रधान डॉ. लिओ वराडकर सिंधुदुर्गात, जंगी स्वागत

Next

मालवण : भारतात मी याआधी पाचवेळा आलो आहे. मात्र माझे आजोबा, वडील राहत असलेल्या वराड गावी येण्याचा योग पहिल्यांदाच आला असून गावात येऊन मला अतिशय आनंद झाला आहे. माझे आडनाव या गावाशी जोडले आहे याचाही आनंद असून आम्ही वराडकर कुटुंबीय गावच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू, असा विश्वास आयर्लंडचे पंतप्रधान डॉ. लिओ वराडकर यांनी वराड (ता. मालवण) येथे व्यक्त केला. 

शासकीय पातळीवर दौऱ्याचे आयोजन न करता घरगुती स्तरावर पंतप्रधान लिओ वराडकर यांचा खाजगी दौरा होता. कोणत्याही शासकीय यंत्रणेला दौऱ्याची कल्पना नव्हती असे चित्र होते. रविवारी सकाळी सिंधुदुर्गातील मालवण वराड या गावी 'वरदश्री' या निवासस्थानी लिओ वराडकर व कुटुंबीयांचे जल्लोशी स्वागत करण्यात आले. पंतप्रधान वराडकर यांनी गाडीतून उतरताच भारतीय पद्धतीने उपस्थितांना नमस्कार केला. यावेळी गावकऱ्यांनीही मालवणी बोली भाषेत जयघोष करत स्वागत केले. सुहासिनींनी पंचारती ओवळल्या. अगदी लहान थोर माणसांनी वराडकर यांना गराडा घातला. 

डॉ. लिओ यांच्या सोबत त्यांचे वडील डॉ. अशोक वराडकर, आई मेरिअम, बहीण सोफिया, सोनिया, एरीक, जॉन, त्यांची मुले व संपूर्ण कुटुंबीय उपस्थित आहे. डॉ. लिओ वराडकर यांनी येथील मालवणी जेवणाचाही आस्वाद घेतला. त्यानंतर गावात आंबा काजू बागेत फेरफटका मारला. गावातील शाळेत विद्यार्थ्यांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. गावातील वेताळ मंदिर व कट्टा येथील चर्चलाही त्यांनी भेट दिली. वराड येथे आपल्या निवासस्थानी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला यावेळी त्यांची चुलत बहीण शुभदा वराडकर यांनी दुभाषिकांची भूमिका बजावली. 

यावेळी वसंत वराडकर, शेखर वराडकर, अविनाश वराडकर, पांडुरंग वराडकर, अरुण गावडे, हरिश्चंद्र परब, पोलीस पाटील संतोष जामसंडेकर, पस सदस्य विनोद आळवे, मालवणचे नगरसेवक यतीन खोत, सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत यासह ग्रामस्थांनी  पंतप्रधान डॉ. लिओ वराडकर यांचे स्वागत केले. 

प्रत्येकजण पंतप्रधान डॉ. लिओ वराडकर यांच्यासोबत सेल्फी व फोटो काढत होते. यावेळी कोणताही मोठेपणा न ठेवता वराडकर सर्वसामान्यात मिसळत होते. यातून त्यांची सर्वसामान्य माणसाबद्दल असलेली आपुलकी स्पष्ट दिसून आली. भारतात गेल्या २५ वर्षात येथील विकासाने अधिक गती पकडल्याचे चित्र आहे. दोन्ही देशात अधिक चांगले संबंध प्रस्थापित होण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत असेही पंतप्रधान डॉ. लिओ वराडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना स्पष्ट केला. 

देवाच्या प्रार्थनेत मोठी शक्ती
२०१७ साली मी आयर्लंड देशाचा पंतप्रधान झालो. यावेळी वराड गावात ग्रामस्थांनी माझ्यासाठी देवालयात प्रार्थना केली. मी धार्मिक नाही मात्र मला कल्पना आहे, की प्रार्थनेत मोठी शक्ती असते. असे सांगत पंतप्रधान लीओ वराडकर यांनी ग्रामस्थांचे आभार मानले. 

Web Title: Indian-origin Irish PM Leo Varadkar arrives at Sindhudurg, maharashtra in India on private visit to meet family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.