सावंतवाडीतील गंजिफासह लाकडी खेळण्यांना जीआय मानांकन 

By अनंत खं.जाधव | Published: April 10, 2024 05:38 PM2024-04-10T17:38:41+5:302024-04-10T17:39:11+5:30

केंद्र सरकारकडून निर्णय: मेक इन इंडिया च्या माध्यमातून हस्तकलांना प्रोत्साहन

GI rating of wooden toys including Ganjifa in Sawantwadi | सावंतवाडीतील गंजिफासह लाकडी खेळण्यांना जीआय मानांकन 

सावंतवाडीतील गंजिफासह लाकडी खेळण्यांना जीआय मानांकन 

सावंतवाडी : भारतात प्रसिद्ध अशा सावंतवाडीतील 'गंजीफा' या कलेसाठी व 'लाकडी खेळण्यासाठी जीआय मानांकन केंद्र सरकारकडून प्राप्त झालं असून मेक इन इंडियाच्या माध्यमातून येथील हस्तकलांना प्रोत्साहन मिळणार आहे. अशी माहिती सावंतवाडीच्या राजघराण्यातील खेमसावंत भोसले, शुभदादेवी भोसले यांनी दिली आहे.

सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी जीआय मानांकन प्राप्त करून दिल्याबद्दल  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'गंजीफा' भेट स्वरूपात देणार असल्याचे श्रद्धाराजे भोसले यांनी सांगितले तर तर गंजीफाच म्युझिअम सावंतवाडीत व्हावं यासाठी ही प्रयत्न करणार असल्याचे लखमसावंत यांनी सांगितले.

यावेळी गंजिफा कलाकार मोहन कुलकर्णी, लाडू ठाकूर, रामचंद्र ठाकूर, सदाशिव धुरी, पांडुरंग धुरी, सचिन कुलकर्णी, वर्षा लोंढे, गायत्री कुलकर्णी, प्रज्ञा पांचाळ, संगिता कुंभार, आत्माराम नार्वेकर, सोनाली कुंभार, सुकन्या पवार, प्रेरणा वाडकर, आर्या देवरूखकर, वेदीका गावडे, संजना कदम, निकिता आराबेकर, सिताराम गवस, परशुराम मेस्त्री, मधुकर सोनावडेकर आदी यावेळी उपस्थित होते.

शुभदादेवी म्हणाल्या, गंजीफा हा खजिना आहे, या गंजीफा कार्डवर विष्णूचे दहा अवतार आहेत‌. १७ व्या शतकात गंजीफा सावंतवाडीत आला. खेमसावंत तिसरे यांच्या काळात कलेला प्रोत्साहन दिलं गेलं. तदनंतर राजेसाहेब शिवरामराजे व राजमाता सत्वशीलादेवी भोसले यांनी ही कला जोपासली. पुंडलिक चितारी यांच्या माध्यमातून ही कला पुढील पिढीपर्यंत पोहचवली. नव्या पिढीला ही कला शिकवली. 

आजही गंजीफा राजवाड्यात तयार केला जातो. ही परंपरा युवराज लखमराजे व श्रद्धाराजे पुढे घेऊन जातील असा विश्वास आहे. आजच जीआय मानांकन मिळण्यासाठी आमच्या गंजीफा कलावंतांच देखील कौतुक करावं तेवढं कमी आहे. नवीन कलावंत देखील पुढे येत आहेत. शासनानं या कलेसाठी व कलावंतांसाठी हितकारक योजना सुरु केल्यास आणखीन कलाकार पुढे येतील अस मत शुभदादेवी यांनी व्यक्त केलं.‌ 

दरम्यान, गंजीफाला जीआय मानांकन मिळालं ही सावंतवाडीसाठी गौरवास्पद बाब आहे. ही कला जोपासण्यासाठी २५ कलाकार कार्यरत असून  १२५ कलाकार कसे तयार होतील यासाठी आमचा प्रयत्न आहे. गंजीफामध्ये १४ प्रकार सावंतवाडीत आहेत. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला गंजीफा पोहोचला आहे. देशातील स्मार्ट सीटीत गंजीफा आहे‌. ही कला अजून पुढे घेऊन जायची आहे. तर मेक इन इंडियाच्या माध्यमातून हस्तकलांना प्रोत्साहन दिले जात आहे. म्हणूनच लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सावंतवाडीचा हा गंजीफा भेट स्वरूपात देण्यात येणार असल्याचे श्रध्दाराणी म्हणाल्या आहेत.

तर राजमात सत्वशीलादेवी यांची इच्छा होती की गंजीफा म्युझिअम सावंतवाडीत व्हावं. त्यादृष्टीने आमचा प्रयत्न असणार आहे. शासनाकडून त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या कलेला जीआय मानांकन मिळाल्यामुळे निश्चितच हे स्वप्न साकार होईल असा विश्वास लखमसावंत भोसले यांनी व्यक्त केला. 

Web Title: GI rating of wooden toys including Ganjifa in Sawantwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.