सावंतवाडीत असताना जाहीर झाला द्रोणाचार्य पुरस्कार, आचरेकर सर अन् सावंतवाडीचे अतूट नाते

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2019 10:11 PM2019-01-02T22:11:04+5:302019-01-02T22:12:07+5:30

ते १९७३ साली पहिल्यांदा आनंद रेगे यांच्यासमवेत सावंतवाडीत आले.

Dronacharya award was announced then he was in Sawantwadi, Achrekar Sir and Sawantwadi's unbreakable relationship | सावंतवाडीत असताना जाहीर झाला द्रोणाचार्य पुरस्कार, आचरेकर सर अन् सावंतवाडीचे अतूट नाते

सावंतवाडीत असताना जाहीर झाला द्रोणाचार्य पुरस्कार, आचरेकर सर अन् सावंतवाडीचे अतूट नाते

Next

- अनंत जाधव 
सावंतवाडी : रमाकांत आचरेकर हे मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण-वायरी येथील असले तरी त्यांची विशेष ओढ सावंतवाडीकडेच होती. ते १९७३ साली पहिल्यांदा आनंद रेगे यांच्यासमवेत सावंतवाडीत आले. त्यानंतर गेली ४८ वर्षे त्यांचे आणि सावंतवाडीचे अतूट असे नाते होते. विशेष म्हणजे केंद्र सरकारचा  द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर केला तेव्हा रमाकांत आचरेकर सर हे सावंतवाडीत खेळाडूंना प्रशिक्षण देत होते. त्यानंतर पुढील काही वर्षातच त्यांनी सावंतवाडीपासून जवळच मळगाव येथे बंगला बांधला आणि त्याला द्रोणाचार्य हे नाव दिले आहे. आचरेकर सर यांचे बुधवारी सांयकाळी निधन झाले त्यानंतर आचरेकर सर यांच्या आठवणींना त्याच्या जवळच्या मित्रपरिवाराने उजाळा दिला आहे.

क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर यांचे गुरू म्हणून रमाकांत आचरेकर यांची ओळख संपूर्ण जगाला झाली. पण आचरेकर सर यांची ओळख सावंतवाडीला १९७३ पासून आहे. स्टेट बँकेमध्ये आचरेकर सर नोकरी करत असतानाच त्यांचा क्रिकेटशी संबंध आला. त्यानंतर त्यांनी स्टेट बँकेच्या टीम क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. या काळातच त्यांची सावंतवाडीतील आनंद रेगे यांच्याशी ओळख झाली आणि या ओळखीतूनच आचरेकर हे सावंतवाडीत आले. ते काही काळ येथील पंचम खेमराज महाविद्यालयात विद्यार्थ्यांना क्रिकेटचे धडे देत असत. या काळात त्यांनी अ‍ॅड. बापू गव्हाणकर, दिलीप वाडकर, पिटर फर्नांडिस, प्रकाश शिरोडकर, लवू टोपले आदींना क्रिकेटचे धडेही दिले आहेत.

पुढे आचरेकर सर हे एकत्रित सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याचे कर्णधार झाले. त्याच काळात सावंतवाडीतील जिमखाना मैदानावर जगदनवाला चषकमधील अंतिम  सामना सावंतवाडीतील जिमखाना मैदानावर आयोजित करण्यात आला होता. त्यात महाराष्ट्रातील नऊ रणजीपटू खेळले होते. त्यावेळी सिंधुदुर्ग-रत्नागिरीचे प्रतिनिधित्व आचरेकर सर यांनी केले होते. आचरेकर सर यांचे गाव मालवण तालुक्यातील वायरी असले तरी त्यांचे सावंतवाडीशी अतूट नाते होते. त्यामुळे आचरेकर सर मुंबईतून आले की थेट सावंतवाडीत यायचे आणि ते येथील आनंद रेगे किंवा बापू गव्हाणकर यांच्या घरी राहायचे. तेव्हा फोनची सोय नव्हती. त्यामुळे आचरेकर सर आपल्या सावंतवाडीतील मित्रांशी खेळाडूंना पत्र पाठवून त्यांची खुशाली घ्यायचे. एखाद्या मित्राने किंवा खेळाडूने पत्र पाठवले नाही तर ते स्वत: त्यांना पत्र पाठवून का पत्र पाठवले नाही, असे विचारायचे. एवढे त्याचे सावंतवाडीवर प्रेम होते.

आचरेकर सरांनी सावंतवाडीतून क्रिकेटचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. मुंबईत सावंतवाडीप्रमाणे शारदाश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांना क्रिकेटचे धडे देत असत, येथेच त्यांची ओळख सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी यांच्यासोबत झाली. आचरेकर सरांनी सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, प्रवीण आमरे यांना पहिल्यांदा १९८७ साली सावंतवाडीतील जिमखाना मैदानावर आणले आणि त्यांना येथे क्रिकेटचे धडे दिले. त्यानंतर अनेक वेळा सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी हे खेळाडू सावंतवाडीतील जिमखान्यावर येऊन सराव करत असत. आठ-आठ दिवस सावंतवाडीत येऊन राहत असत. आचरेकर सर सावंतवाडीतील खेळाडूंना मुंबईत घेऊन जात असत. तेथे त्यांना क्रिकेटचे धडे देत असत. वेळ पडली तर सावंतवाडीतील खेळाडूंच्या राहण्याची सोय ते स्वत:च्या घरी करत असत.

सावंतवाडीत असतानाच सचिन तेंडुलकरची निवड पकिस्तान विरुद्धच्या कसोटी सामन्यात झाली होती. त्याचप्रमाणे आचरेकर सर हे सावंतवाडीतील विद्यार्थ्यांना येथील जिमखाना मैदानावर क्रिकेटचे धडे देत असतानाच त्यांच्या नावाची घोषणा द्रोणाचार्य पुरस्कारांसाठी झाली होती. हा खेळाच्या क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. हा काळ १९९५-९६ मधील आहे. त्यानंतर आनंद रेगे, अ‍ॅड. बापू गव्हाणकर, दिलीप वाडकर आदी त्यांच्या सावंतवाडीतील शिष्यांनी  त्यांना बसमधून मुंबईला पाठवले होते.

सावंतवाडीत पहिल्यांदाच १९९९च्या सुमारास देशातील दिग्गज खेळाडू आणण्याची किमया आचरेकर सर यांनीच घडवली होती. सरांचे शिष्य सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, अजित आगरकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली, जवागल श्रीनाथ आदी खेळाडूंनी येथील जिमखाना मैदानावर क्रिकेटचा आनंद लुटला. तर जिल्ह्यातील क्रिकेट सैनिकांना हा क्षण पाहण्याची संधी दिली ती आचरेकर सर यांनी. त्यामुळे आचरेकर सर हे नेहमीच सिंधुदुर्गवासीयांच्या स्मरणात राहतील. पण त्यापेक्षा अधिक सावंतवाडीवासीयांच्या स्मरणात राहणार आहेत.
आचरेकर सर हे आपल्या आजारपणाच्या काळात म्हणजे मागील तीन ते चार वर्षांपूर्वी शेवटचे सावंतवाडीत आले होते. अ‍ॅड. बापू गव्हाणकर यांच्या मुलाच्या विवाह समारंभात त्यांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर ते सावंतवाडीत आले नाही. मात्र गेल्या वर्षी आचरेकर सर यांचे सर्व शिष्य गुरूवंदना कार्यक्रमासाठी खास मुंबई येथे गेले होते. त्या कार्यक्रमात सरांचे अनेक शिष्य आले होते. त्यातही सावंतवाडीचे अ‍ॅड. बापू गव्हाणकर यांनी भाषण केले होते आणि सावंतवाडीतील सरांच्या आठवणींना उजाळा दिला होता.



द्रोणाचार्य नावाने सावंतवाडीत बंगला
रमाकांत आचरेकर सर यांना द्रोणाचार्य पुरस्कार मिळाला. त्यानंतर त्यांच्या कुटुंबाने सावंतवाडीजवळ मळगाव येथे बंगला बांधला आणि त्याला द्रोणाचार्य हे नाव दिले. त्यामुळे सिंधुदुर्गवासीयांच्या स्मरणात कायम सर राहणार आहेत. या बंगल्यात सर तसेच त्याची मुलगी जावई अधून-मधून येत असत. अलिकडेच सरांच्या आजारपणाला कोणाला येणे शक्य झाले नसल्याचे त्याच्या जवळच्या मित्रांनी सांगितले.

Web Title: Dronacharya award was announced then he was in Sawantwadi, Achrekar Sir and Sawantwadi's unbreakable relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.