यापुढे समाजकारणातून जनतेची सेवा करणार- दयानंद गवस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2018 02:07 PM2018-07-01T14:07:17+5:302018-07-01T14:07:26+5:30

मी निवृत्त होत नसून आता फक्त माझी पोलिसातील नोकरी बदलत आहे. यापूर्वी पोलिसात काम करत होतो.

Dayanand Gavas will now serve the people through social work | यापुढे समाजकारणातून जनतेची सेवा करणार- दयानंद गवस

यापुढे समाजकारणातून जनतेची सेवा करणार- दयानंद गवस

googlenewsNext

सावंतवाडी : मी निवृत्त होत नसून आता फक्त माझी पोलिसातील नोकरी बदलत आहे. यापूर्वी पोलिसात काम करत होतो. आता सामाजिक कार्यात कार्यरत असणार आहे. खाकी अंगावर आल्याने मला जनतेची सेवा करण्याची संधी प्राप्त झाली. या ३३ वर्षाच्या सेवेत अनेकांना न्याय देऊ शकलो हे माझे मी भाग्य समजतो, असे मत सावंतवाडीचे मावळते पोलीस उपअधीक्षक दयानंद गवस यांनी व्यक्त केले. सेवानिवृत्तीचा कार्यक्रम हा माझ्या बालपणीच्या मित्रांसमवेत साजरा होतो याच्यासारखा आनंद कुठला नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सावंतवाडीचे पोलीस उपअधीक्षक दयानंद गवस हे शनिवारी सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे सावंतवाडी पोलीस ठाण्याने एका भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी नगराध्यक्ष बबन साळगावकर, उपविभागीय अधिकारी सुशांत खांडेकर, पोलीस निरीक्षक सुनील धनावडे, कुडाळ पोलीस निरीक्षक अविनाश भोसले, उद्योजक राजन आंगणे, नगरसेवक उदय नाईक, बाबा नाईक, व्यापारी संघाचे जगदीश मांजरेकर, सभापती आनंद नेवगी, प्रा. सुभाष गोवेकर, माजी कृषी अधिकारी काका परब, बाळ बोर्डेकर, बांद्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर, माजी नगरसेवक संजय पेडणेकर, पोलीस निरीक्षक विनित चौधरी आदी उपस्थित होते.

यावेळी नगराध्यक्ष बबन साळगावकर म्हणाले, दयानंद गवस यांनी अधिकारी म्हणून चांगले काम केले आहे. त्याची पोचपावती त्यांच्या पुढील आयुष्यात मिळेल. त्यांनी आपण स्थानिक असलो तरी कुणावरही अन्याय करणार नाही ही भावना कायम ठेवून काम केले. त्यामुळेच ते यशस्वी अधिकारी होऊ शकले, असे मत यावेळी त्यांनी मांडले. त्यांनी आपल्या पुढील आयुष्यात राजकारणात यावे आणि काम करावे, असे आवाहनही साळगावकर यांनी यावेळी केले. उपविभागीय पोलीस अधिकारी सुशांत खांडेकर यांनी सेवानिवृत्ती ही खरोखरच अवघड असते. पण जी व्यक्ती नेहमी समाजासोबत काम करत असते, त्या व्यक्तीला कधीही याची उणीव भासत नाही. आता यापुढे गवस यांनीही समाजकारण तसेच स्पर्धा परीक्षांसाठी काम करावे, असे मत मांडले.

पोलीस उपअधीक्षक दयानंद गवस हे चांगलेच भावूक झाले होते. मी ३३ वर्षांपूर्वी सेवेत आलो, पण कधीही पोलीस सेवा वाईट म्हटली नाही. जे चांगले असेल ते स्वीकारत गेलो आणि काम केले. त्यामुळेच मला माझ्या बालपणीचे मित्रही सेवा निवृत्तीच्या काळात मिळाले, असे सांगत मुंबईत सेवा बजावत असताना अनेक प्रसंग आले. मुंबई कोणासाठी थांबत नाही हे आम्ही अनुभवले आणि हे अनुभवण्याचे भाग्यच पोलीस सेवेमुळे मिळाले, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मुंबई बॉम्बस्फोट तसेच १९९२ ची मुंबई दंगल आदी घटना मला पाहण्यास मिळाल्या हे मी माझे भाग्य समजतो. वाहतूक पोलीस म्हणूनही चांगले काम केले. माझ्यावर वाहतुकीबाबत अभ्यास करण्याची खास जबाबदारी सध्याचे पोलीस महासंचालक सतीष माथूर यांनी दिली होती आणि ते काम मी योग्य पध्दतीने केले असल्याचे गवस यांनी सांगितले. आतापर्यंत पोलिसांच्या माध्यमातून जनतेची सेवा केली. आता यापुढे फक्त माझी नोकरी बदलली. आता सामाजकारण ही माझी नोकरी असणार आहे. माणसाने कधीही शांत बसता नये. नेहमी काम करत रहावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी सर्वांना केले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण गवस व नाईक यांनी पोलीस उपअधीक्षक गवस यांचा सत्कार केला. तर पोलीस हेडकॉन्स्टेबल माया पवार यांनी यांच्या पत्नीचा सत्कार केला. यावेळी पोलीस निरीक्षक सुनील धनावडे, माजी कृषी अधिकारी काका परब, जगदीश मांजरेकर, सुभाष गोवेकर, सतीश पाटणकर आदींनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेश नाईक यांनी, आभार अभय वाखारे यांनी मांडले.

Web Title: Dayanand Gavas will now serve the people through social work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.