शिमगोत्सवाची परंपरागत पध्दतीने सांगता; कणकवलीत सप्त रंगांची उधळण

By सुधीर राणे | Published: April 8, 2024 05:36 PM2024-04-08T17:36:01+5:302024-04-08T17:37:19+5:30

कणकवली : ' रंगात रंगू या सारे' असे म्हणत कणकवली शहरात सप्तरंगांची उधळण करीत मोठ्या उत्साहात सोमवारी रंगपंचमी साजरी ...

Celebrating Shimgotsava in a traditional way; excitement Rangpanchami in Kankavli | शिमगोत्सवाची परंपरागत पध्दतीने सांगता; कणकवलीत सप्त रंगांची उधळण

शिमगोत्सवाची परंपरागत पध्दतीने सांगता; कणकवलीत सप्त रंगांची उधळण

कणकवली : ' रंगात रंगू या सारे' असे म्हणत कणकवली शहरात सप्तरंगांची उधळण करीत मोठ्या उत्साहात सोमवारी रंगपंचमी साजरी करण्यात आली. या रंगपंचमीने येथील शिमगोत्सवाची परंपरागत पध्दतीने सांगता झाली. रंगपंचमी खेळताना बच्चे कंपनीबरोबरच तरुणाईचाही उत्साह दांडगा होता.

शिमगोत्सवात रंगपंचमीला खूप महत्व असते. या रंगपंचमीला धुळवड किंवा धूलिवंदन असेही म्हटले जाते. प्रत्येक गावात तेथील परंपरेनुसार विविध दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. काही ठिकाणी होळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी तर काही ठिकाणी पाचव्या दिवशी रंगपंचमी खेळली जाते.

 कणकवलीत गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. याठिकाणी पंधरा दिवसांचा शिमगोत्सव असतो. काही घरांच्या ठिकाणीही होळीचे मांड असतात. या ठिकाणिहि परंपरागत पध्दतीने सांस्कृतिक कार्यक्रम होतात. राधा, कृष्ण, गोप यांच्या जोडीने अनेक सोंगे आणली जातात.

शहरातील काही ठिकाणी बच्चे कंपनी सोमवारी सकाळपासूनच रंगपंचमीचा आनंद लूटत असले तरी दुपारी १.३० वाजल्यानंतर साधारणतः रंगपंचमी साजरी करण्यास सुरुवात झाली. रंगपंचमीची जय्यत तयारी शहरातील तरुणाईने केली होती.

रंग बनविण्याबरोबरच अनेक 'प्लॅन' मनोमन रचले होते. त्यांना मूर्त स्वरूप देण्यात आले. रंग पंचमीच्या पार्श्वभूमिवर विविध प्रकारचे रंग, पिचकाऱ्या बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध झाले होते. बच्चे कंपनीची रंग तसेच इतर साहित्य खरेदीसाठी सकाळी बाजारपेठेत लगबग दिसून येत  होती.

शहरात  दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास रंगपंचमीला सुरुवात झाल्यानंतर सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास प्रथेप्रमाणे ढोल वाजल्यावर ही रंगपंचमी थांबविण्यात आली. त्यानंतर श्री रवळनाथ मंदिराजवळील गाव होळी जवळ परंपरागत पध्दतीने काही धार्मिक विधी पार पड़ल्यानंतर शिमगोत्सवाची सांगता करण्यात आली. 

सोमवारी शहरातील तेलीआळी, टेंबवाड़ी, बाजारपेठेसह विविध भागात रंगपंचमी साजरी करण्यात आली. या रंगपंचमीच्या निमित्ताने सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. तरुणाईने रंगोत्सवाचा मनमुराद आनंद लुटला. यात युवतीही सहभागी झाल्या होत्या. चेहरे रंगवून काही तरुण शहरातून दुचाकीवरुन फेरफटका मारताना दिसत होते. रंगपंचमीच्या निमित्ताने लहान थोर सर्वानीच आनंद लुटला.

Web Title: Celebrating Shimgotsava in a traditional way; excitement Rangpanchami in Kankavli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.