साबुदाणा लागवड कोकणसाठी वरदान

By admin | Published: June 12, 2016 09:29 PM2016-06-12T21:29:58+5:302016-06-13T00:19:09+5:30

नावीन्यपूर्ण पिकांची गरज : सात महिन्यांत फायदा देणारे पीक

Boon for sabudana plantation kokan | साबुदाणा लागवड कोकणसाठी वरदान

साबुदाणा लागवड कोकणसाठी वरदान

Next

कडावल : शेवरकंद म्हणजे साबुदाण्याच्या झाडांची लागवड कोकणातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरू पाहत आहे. केवळ सहा ते सात महिन्यांचे पीक, साबुदाण्याला बाजारात वर्षभर असणारी मागणी तसेच उत्पादनाला मिळणाऱ्या दरामुळे साबुदाणा लागवड किफायतशीर ठरत असून, आर्थिक सुबत्तेसाठी शेतकऱ्यांनी या लागवडीकडे मोठ्या प्रमाणात वळण्याची गरज आहे.
कृषी क्षेत्रातही आता आधुनिकतेचे वारे वाहू लागले आहे. नावीन्यवपूर्ण प्रयोगांद्वारे शेतीच्या विकासाबरोबरच स्वत:च्या आर्थिक संपन्नतेसाठी येथील शेतकरी झटत आहेत. परिणामी येथील शेत शिवार विविध पिकांनी डोलताना दिसत आहेत. कोकणातील हवामान व जमिनीला मानवणारे शेवरकंद म्हणजेच साबुदाण्याच्या झाडांची लागवड फायदेशीर ठरत आहे. आर्थिक सुबत्तेसाठी येथील शेतकऱ्यांनी या नावीन्यपूर्ण पिकाच्या लागवडीकडे वळणे गरजेचे आहे.
साबुदाण्याला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. केवळ सहा ते सात महिन्यांत हे पीक काढण्यास तयार होते. प्रति हेक्टरी सुमारे पंचवीस टन उत्पादन मिळते, तर साबुदाण्याच्या पावडरला बाजारात प्रतिकिलो सुमारे ५५ रुपये दर मिळतो. साबुदाण्याची पावडर घरीच बनविता येत असल्याने शेतकऱ्यांना यापासून गृहद्योगही सुरू करता येतो. एकंदरीत शेवरकंदाची लागवड शेतकऱ्यांना फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे.
अखिल भारतीय समन्वित एकात्मिक कृषी संशोधन, योजनेचे अधिकारी तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र डॉ. नामदेव म्हसकर याबाबत बोलताना म्हणाले, शेवरकंद म्हणजे म्हणजे साबुदाण्याच्या झाडांची लागवड कोकणातील शेतकऱ्यांना फायद्याची ठरू शकते. साबुदाण्याला बाजारात वर्षभर मागणी असते. साबुदाण्याची पावडर शेतकरी आपल्या घरीच तयार करू शकतात. या पावडरला दरही चांगला मिळतो. लागवडीसाठी एच-११९, श्री जया किंवा श्री प्रकाश या जातींची निवड करावी, असे आवाहनही डॉ. म्हसकर यांनी केले आहे. (वार्ताहर)

शेवरकंदाची लागवड सरी वरंबा पद्धतीने केली जाते. लागवडीसाठी ६ ते १० महिने वयाच्या योग्य वाढ झालेल्या निरोगी झाडांच्या खोडाचे २० ते २५ सेंटिमीटर लांबीचे तुकडे वापरण्यात येतात.
लागवड जातीनिहाय ९० बाय ९० सेंटिमीटर किंवा ७५ बाय ७५ सेंटिमीटर अंतरावर करावी. एक हेक्टर लागवडीसाठी सुमारे १२३५० ते १७७८० कांड्या पुरतात. लागवडीनंतर योग्य प्रमाणात खते, पाणी, मशागत, बेनणी तसेच भर देणे, आदी कामे वेळोवेळी पूर्ण करणे आवश्यक आहे.
कोकण विभागासाठी एकात्मिक खत व्यवस्थापनात या पिकासाठी हेक्टरी ७.५ टन शेणखत तसेच नत्र:स्फुरद:पालाश अनुक्रमे ७५:५०:७५ मात्रा देण्यात यावी. सोबत २० किलो धैचा बियाणे लागवडीवेळी पेरून भरीच्या वेळी जमिनीत गाडावे.
लागवडीनंतर ३० ते ४५ दिवसांनी पहिली बेनणी करून सरीवर रोपांना भर द्यावी. नंतर एक महिन्याने पुन्हा एकदा भर देणे गरजेचे असून, यावेळी खताचा दुसरा हप्ता द्यावा. पिकाला आवश्यकतेनुसार ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.

Web Title: Boon for sabudana plantation kokan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.