अपघातानंतर तरुणाईचा ‘सेल्फी विथ जेसीबी’-काळजाचा थरकाप उडणाऱ्या घटनेने नागरिक भयभीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 22:43 IST2018-03-16T22:43:34+5:302018-03-16T22:43:34+5:30
सातारा : सेल्फीच्या फंद्यात वाहत गेलेल्या तरुणाईची मने बोथट होत असल्याचे चित्र साताºयात शुक्रवारी झालेल्या अपघातावेळी पाहायला मिळाले. ब्रेक निकामी झालेल्या जेसीबीने सात ते आठ वाहनांना

अपघातानंतर तरुणाईचा ‘सेल्फी विथ जेसीबी’-काळजाचा थरकाप उडणाऱ्या घटनेने नागरिक भयभीत
सातारा : सेल्फीच्या फंद्यात वाहत गेलेल्या तरुणाईची मने बोथट होत असल्याचे चित्र साताऱ्यात शुक्रवारी झालेल्या अपघातावेळी पाहायला मिळाले. ब्रेक निकामी झालेल्या जेसीबीने सात ते आठ वाहनांना ठोकर दिल्यानंतर घटनास्थळाचे चित्र अत्यंत विदारक होते. हे दृश्य पाहून अनेकांच्या काळजाचा थरकाप उडत होता. तर दुसरीकडे साताºयातील काही युवक अपघातग्रस्त वाहनांसोबत सेल्फी काढत असल्याचे धक्कादायक चित्र दिसून आले.
युवकांच्या हातात मोबाईल आल्यानंतर सेल्फीची फॅशन आणि फॅड वाढतच गेले. या सेल्फीच्या नादात अनेकांना अक्षरश: जीव गमवावा लागल्याचे अनेकदा पाहात आणि ऐकतही असतो. मात्र, तरीही सध्याची तरुणाई सेल्फीच्या फंद्यात स्वत:ला जखडून ठेवत असल्याचे दिसून येत आहे. कोणत्याही वाईट अथवा चांगल्या क्षणाचे आपण साक्षीदार होतो, हे दाखवून देण्यासाठी तरुणांची धडपड सुरू असते. याचाच प्रत्यय साताºयात शुक्रवारी दुपारी झालेल्या अपघातावेळी पाहायला मिळाला.
अदालतवाड्याशेजारी तीव्र उतारावर ब्रेक निकामी झाल्याने एक जेसीबी हेलकावे घेत वेगात आला. समोरून येणाºया तीन ते चार वाहनांना जेसीबीने धडक दिली. त्यानंतर रस्त्याच्याकडेला उभ्या असलेल्या सात चारचाकी वाहनांना धडक दिली. वाटेत येणारी सर्व वाहने जेसीबीच्या पुढच्या लोडर बकेटने कापत नेली. यावेळी मोठा आवाज झाला. महिला व लहान मुलांच्या किंकाळ्या आणि सर्वत्र धूळ पसरली होती. जखमी नागरिक रस्त्यावर विव्हळत पडले होते. भर वस्तीत हा प्रकार घडल्याने या अपघाताचे साक्षीदार महिला आणि नागरिक होते.
जखमींना मिळेल त्या वाहनाने तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं. वाहतूक ठप्प झाल्यामुळे रस्त्यातून वाहने बाजूला घेण्याचे काही नागरिकांचे प्रयत्न सुरू होते. तर दुसरीकडे काही युवक हातात मोबाईल घेऊन अपघातग्रस्त वाहनांसोबत सेल्फी काढत होते. या मुलांचे वागणे काही महिला व नागरिकांना आवडले नाही. यांना समजतंय का? असा प्रश्नही यावेळी एका महिलेने उपस्थित केला. आपल्याकडे लोक पाहतायंत, हे जेव्हा त्या मुलांना समजलं तेव्हा कुठे त्यांनी हा प्रकार थांबविला.