जिल्ह्यात मानवी विकासाबाबतचे काम समाधानकारक : जलाजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 12:54 AM2017-11-28T00:54:20+5:302017-11-28T00:55:52+5:30

 Work on human development in the district is satisfactory: Reservoir | जिल्ह्यात मानवी विकासाबाबतचे काम समाधानकारक : जलाजा

जिल्ह्यात मानवी विकासाबाबतचे काम समाधानकारक : जलाजा

Next
ठळक मुद्देआढावा बैठक : जिल्ह्यात शासकीय यंत्रणांच्या कामाचे कौतुकजिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्ह्यातील विविध विभागांचा आढावा

सातारा : ‘जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण अतिशय चांगले असून आरोग्य, अन्न सुरक्षा, मनरेगा, अंगणवाडी याबाबतीतही उल्लेखनीय काम करून मानवी विकासाबाबत चांगले काम झाले आहे,’ असे गौरवोद्गार राष्ट्रीय मानव अधिकारी आयोगाच्या जलाजा यांनी काढले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्ह्यातील विविध विभागांचा आढावा घेताना त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, उपवनसंरक्षक अनिल अंजनकर, उपजिल्हाधिकारी (महसूल) अविनाश शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सिंघल म्हणाल्या, ‘माण, खटाव, कोरेगाव तालुक्यांचा काही भाग अवर्षण प्रवण क्षेत्र असल्याने पाण्याचे दुर्भीक्ष हा नेहमीचाच प्रश्न होता; पण गेल्या तीन वर्षांपासून जलयुक्त शिवार अभियानात जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होऊन पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

अंगणवाडीतील पोषण आहार, कुपोषण निर्मूलनासाठी उपयुक्त असून, त्यासाठी अधिकाधिक लहान मुलांना अंगणवाडीत येण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. सातारा हा राज्यातील पहिला हागणदारी मुक्त जिल्हा असून, आता घनकचरा व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करणार आहे.’
‘जिल्हा प्राथमिक शिक्षणात राज्यात दुसºया क्रमांकावर असून, आम्ही शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी विविध उपाय अवलंबले आहे,’ अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे यांनी दिली.
जलजा म्हणाल्या, ‘स्त्री-पुरुष जन्मदराचे प्रमाण ग्रामीण भागात जास्त आणि शहरात कमी आहे त्यावर उपाय करावेत. घनकचरा व्यवस्थापनासाठी पंचायत समिती स्तरावर लक्ष द्यावे.’

गुन्हे निकालाचे प्रमाण ४२ टक्के
जिल्ह्यात तीस पोलिस ठाणे, अठरा आऊटपोस्ट आहेत. जिल्ह्यातील गुन्हे निकाली काढण्याचे प्रमाण ४२ टक्के आहे. महिलांच्या सुरक्षतेसाठी निर्भया पथक, प्रतिसाद पथक सुरू करण्यात आले आहे. यामुळे गुन्हे मोठ्या प्रमाणात आटोक्यात आले आहेत,’ अशी माहिती पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली.

Web Title:  Work on human development in the district is satisfactory: Reservoir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.