दोन चोरट्यांकडून दहा वाहने जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 11:21 PM2019-06-30T23:21:33+5:302019-06-30T23:21:38+5:30

सातारा : शहर व परिसरातून वाहने चोरणाऱ्या दोन युवकांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून, त्यांच्याकडून १० लाख १९ ...

Ten vehicles from two thieves seized | दोन चोरट्यांकडून दहा वाहने जप्त

दोन चोरट्यांकडून दहा वाहने जप्त

Next

सातारा : शहर व परिसरातून वाहने चोरणाऱ्या दोन युवकांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून, त्यांच्याकडून १० लाख १९ हजारांची तब्बल दहा वाहने जप्त करण्यात आली आहेत. यामध्ये तीन कार आणि सात दुचाकींचा समावेश आहे.
राहुल रमेश गुजर (वय २६, रा. गोळीबार मैदान, सातारा), शंभू जगन्नाथ भोसले (२७, रा. कोडोली, सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, कोडोली येथे शनिवारी दुपारी दोन युवक दुचाकीवरून संशयितरीत्या फिरत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक सागर गवसणे यांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार त्यांनी तत्काळ आपल्या टीमसह तेथे धाव घेतली. गुजर आणि भोसले याला ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याजवळ असलेली दुचाकी चोरीची असल्याचे पुढे आले. त्यामुळे दोघांनाही स्थानिक गुन्हे शाखेत आणण्यात आले. या ठिकाणी दोघांचीही पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्यांनी आतापर्यंत दहा वाहने चोरल्याची कबुली दिली. त्यामध्ये सात मोटारसायकली, दोन कार आणि एका जीपचा समावेश आहे. ही सर्व वाहने या दोघांनी सातारा शहर परिसरातून चोरल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे. शंभू भोसले याच्या घराच्या परिसरातून पोलिसांनी ही सर्व वाहने हस्तगत केली आहेत. या दोघांवर पोलादपूर पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल असून, त्यांना पुढील तपासासाठी शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर गवसणे, सहायक फौजदार पृथ्वीराज घोरपडे, हवालदार विनोद गायकवाड, मोहन नाचण, राजकुमार ननावरे, नितीन भोसले, योगेश पोळ, संतोष जाधव, प्रवीण कडव, गणेश कापरे, धीरज महाडिक, केतन शिंदे, वैभव सावंत, मयूर देशमुख, मोहसीन मोमीन यांनी केली.

Web Title: Ten vehicles from two thieves seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.