खांब रस्त्यावर अन् गटारे वाऱ्यावर !

By admin | Published: March 28, 2016 08:26 PM2016-03-28T20:26:34+5:302016-03-29T00:28:04+5:30

वाहनांच्या संख्येत वाढ : लोणंदला वाहतुकीच्या समस्येचा विळखा; शिरवळ-बारामती चौपदरीकरण रस्ता महत्त्वाचा --लोणंदचं रणकंदन

Poles on the road and the dirtiest wind! | खांब रस्त्यावर अन् गटारे वाऱ्यावर !

खांब रस्त्यावर अन् गटारे वाऱ्यावर !

Next

राहिद सय्यद -- लोणंद -लोणंद शहरातून जाणारा शिरवळ-बारामती चौपदरीकरण रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. तसेच लोणंद-सातारा, लोणंद-खंडाळा, लोणंद-फलटण या बाजूकडून सर्वच रस्त्यांवर सर्व प्रकारची व अवजड वाहनांची वाहतूक वाढलेली आहे. त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. त्यातच लोणंद मधील विद्युत, टेलिफोन खांब अडथळा ठरत आहेत. दुकानासमोरील पार्किंग, रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी गटार व्यवस्था नसल्याने लोणंद शहर वाहतुकीच्या समस्यांच्या विळख्यात अडकल्याचे दिसत आहे.
कांद्याची मोठी बाजारपेठ असलेले लोणंद शहर हे अनेक गावांतून येणाऱ्या लोकांसाठी रोजगार मिळवून देणारे ठरले आहे. त्यामुळे लोकांची व वाहनांची गर्दी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अनेक लोकांना ये-जा करताना गर्दीचा संघर्ष करावा लागत आहे. या सर्व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी रिंगरोड होणे गरजेचे आहे. शिरवळ-बारामती हे चौपदकरीकरण प्रभाग ४, ५, ६ मधून जाणारे आहे.
लोणंद नगरपंचायतीचे पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचे वातावरण तापलेले असताना १७ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानासाठी १७ जागांसाठी १०६ उमेदवार रिंगणात आहेत. प्रत्येक उमेदवाराने आपापल्या परीने प्रचाराला सुरुवात केल्याचे दिसत आहे. परंतु लोणंदमधील नागरिकांना वर्षानुवर्षे ज्या समस्या उद्भवत आहेत त्याकडे कोणत्याही पक्षाचे किंवा सत्ताधाऱ्यांचे लक्ष नाही. क्त प्रत्येक निवडणुकीवेळी सर्वच नेत्याकडून आश्वासने सोडून काहीही मिळत नाही अशी स्थिती आहे. येथील प्रभाग क्र. ४, ५, ६ हे अनेक मूलभूत समस्यांनी ग्रासलेले दिसून येत आहेत. यावर उपाययोजना होणे महत्वाचे आहे.
प्रभाग क्र. ४ हा इंदिरा नगर, बाळासाहेब नगर, सरहदेचा ओढा परिसर असून, अनुसूचित जातीतील महिलांसाठी राखीव आहे. प्रभागाची लोकसंख्या ९१७ असून, मतदार ९०३ आहेत. या प्रभागांमध्ये अनियमितपणे पाणी, रस्ता, अंतर्गत गटारे, सांडपाण्याची व्यवस्था, सार्वजनिक स्वच्छतालय, कचराकुंड्या अशा अनेक गोष्टींच्या समस्यांनी हा प्रभाग ग्रासलेला आहे.
प्रभाग क्र. ५ व ६ शिरवळ चौक ते अहिल्यादेवी स्मारक आहे. प्रभाग क्र. ५ ची लोकसंख्या ११२५ असून, मतदार १००० आहेत. इथे सर्वसाधारण महिला उमेदवारासाठी आरक्षण आहे. प्रभाग ६ मध्ये लोकसंख्या १०९६ आहे. मतदार संख्या सर्वात कमी म्हणजे ३९९ इतकी आहे. येथील निवडणुकीतील आरक्षण सर्वसाधारण उमेदवारासाठी आहे. त्यामुळे या प्रभागामध्ये अपक्षांची भाऊगर्दी दिसून येत आहे. येथील महत्त्वाच्या समस्या म्हणजे वीज, पाणी, अंतर्गत गटारे, रस्ते नाहीत. लोकांना निवांतक्षणी विश्रांती घेता यावी, तसेच लहान मुला-मुलींसाठी गार्डन, पार्क असण्याची गरज आहे. दोन्ही प्रभागांमध्ये वाहतुकीच्या त्रासामुळे पालकांना मुलांना शाळेत सोडावे लागत आहे. रस्त्यावरील वाहतूक कमी होण्यासाठी पर्यायी रस्ता गावाबाहेरून होण्याची गरज आहे.

प्रभाग ४ मध्ये रस्ता, गटारे, कचराकुंडी नसल्याने नागरिक सर्व कचरा रस्त्याच्या कडेला टाकतात. त्यामुळे घाणीचे साम्राज्य वाढत आहे.
- दादा रणदिवे, नागरिक (प्रभाग क्र. ४)
प्रभाग ५ मध्ये वाहतुकीच्या कोंडीचे प्रमाण जास्त असल्याने बाह्य वळण रस्ता होणे गरजेचे आहे. तसेच मोकाट जनावरे, ओला व सुका कचरा यांचे नियोजन करण्याची गरज आहे.
- नितीन करंजे, नागरिक (प्रभाग क्र. ५)
लोणंद-सातारा रस्त्यावर दोन्ही बाजूस सांडपाणी, गटारे यांची व्यवस्था नसल्याने सांडपाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात आहे. तसेच रस्त्यालगत असलेले विद्युत खांब, त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी नागरिकांना त्रासदायक ठरत आहे.
- विश्वास कापसे, नागरिक (प्रभाग क्र. ६)

Web Title: Poles on the road and the dirtiest wind!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.