बटाट्यासह कांद्यावरही अस्मानी संकट

By admin | Published: December 18, 2014 09:18 PM2014-12-18T21:18:18+5:302014-12-19T00:32:55+5:30

शेतकरी हवालदिल : वातावरणातील बदलाचा परिणाम

Horrible crisis on the onion with potato | बटाट्यासह कांद्यावरही अस्मानी संकट

बटाट्यासह कांद्यावरही अस्मानी संकट

Next

खटाव : वातावरणात होत असलेल्या बदलामुळे खटावसह परिसरातील शेतकऱ्यांच्या बटाटा पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांमधून वर्तवली जात आहे. त्याचबरोबर ज्वारी, हरभरा, गहू आदींसह बटाटा पिकांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या अस्मानी संकटामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे.
बटाट्याच्या रोपावर पडलेल्या रोगामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकाच्या उत्पादनावर त्याचा परिणाम होणार असल्यामुळे आर्थिक संकटात सापडण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.
खटाव तालुक्यात तसेच परिसरात बटाट्याचे पीक मोठ्या प्रमाणात केले जाते. बटाट्याच्या पिकाला यावर्षी चांगला दर मिळू लागल्यामुळे शेतकरी आनंदीत होता. बटाटा लागवड करताना शेतकरीऱ्यांनी बियाण्यांसाठी क्विंटलला तीन हजार पाचशे रुपये दराने बियाणे खरेदी करून बटाट्याची लागण केली आहे.
अचानक पडणारा पाऊस, कोंदट हवामान तसेच थंडी बरोबरच सकाळी पडणारे धुके या सर्वाचा परिणाम बटाट्याच्या रोपांवर झालेला दिसतो. बहुतांश बटाट्याचे प्लॉटमध्ये बटाट्याची रोपे जागेवरच बसलेली आहेत. तर त्याची पाने सुकून गेलेली दिसून येत आहेत. त्यामुळे शेतकरी आता बटाटा पीक वाचविण्यासाठी औषधफवारणीच्या लगबगीत आहे.
बटाटा बरोबरच कांदा उत्पादक शेतकरीही कांद्यावर पडत असलेल्या टाका रोगामुळे चिंतातूर झाला आहे. कांद्याची लागवड करताना शेतकरी तीन हजार रुपयांप्रमाणे बियाणे विकत घेऊन कांद्याची लागण केली; परंतु हवेतील होणारा बदल तसेच सकाळी पडणारे धुके यामुळे कांद्याच्या पातीवर टाका रोगाच्या प्रादूर्भावाने कांद्याची पात जागेवरच मुरगळून जात आहे.
नगदी पिके म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कांदा व बटाटा उत्पादक शेतकऱ्यांच्या मात्र तोंडचे पाणी पळाले आहे. हातातोंडाशी आलेले पीक या हवामानाच्या बदलत्या परिस्थितीमुळे धोक्यात आली आहे. शेतकऱ्याला रोगापासून आपली पिके वाचविण्यासाठी बरीच मेहनत करावी लागत आहे. या अस्मानी संकटामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हवामानात असाच जर बदल होत राहिला तर गहू, हरभरा या पिकांवरही रोग पडण्याची भीती लागली आहे. (वार्ताहर)


पीक वाचविण्यासाठी औषधफवारणी
कधी थंडी, कधी कडाक्याचे ऊन या बदलत्या हवामानामुळे या पिकावर रोग पडू लागला आहे. करपा व तुडतुडे रोगामुळे रोपांची वाढ झाली नाही, तसेच बटाट्याचीही वाढ झाली नाही. त्यामुळे तीस क्विंटल बटाट्याची लागण करूनही हाती अवघ्या तीस पोतींवर समाधान मानावे लागणार आहे. बटाट्याचे पीक वाचविण्यासाठी पाच-पाच वेळा औषधफवारणी करूनही बटाट्याच्या रोपावरील कीड नष्ट झाली नाही.



बटाटा पिकातून उत्पन्न चांगले मिळते, हे जरी खरेअसले तरी बटाटा बी खरेदीपासून त्याची लागवड करून त्यात लागणारी मेहनत आदीसह एका एकराला चाळीस हजारांपर्यंत खर्च होतो. त्यामुळे हे पीक घेताना जेवढे कष्ट आहेत, त्यातच हा असा अचानक पडणारा रोगामुळे आम्हा शेतकरीऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
- किशोर डंगारे, शेतकरी

Web Title: Horrible crisis on the onion with potato

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.