अतिवृष्टीचा जावली तालुका पाण्यावाचून तहानलेलाच

By admin | Published: March 21, 2017 01:08 PM2017-03-21T13:08:24+5:302017-03-21T13:08:24+5:30

प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष : २९ गावे टंचाईग्रस्त घोषित; ग्रामस्थ मात्र टँकरच्या प्रतीक्षेत

The excessive drain of the taluka is thirsty without water | अतिवृष्टीचा जावली तालुका पाण्यावाचून तहानलेलाच

अतिवृष्टीचा जावली तालुका पाण्यावाचून तहानलेलाच

Next

आॅनलाईन लोकमत
सायगाव : सातारा जिल्ह्यात सर्वाधिक अतिवृष्टीचा तालुका म्हणून जावळीला ओळखले जाते. परंतु, पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन नसल्यामुळेच अधिक पाऊस पडूनही तसेच उशाला चार-चार धरणे असूनही जावळीकरांना उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणी टंचाईचा सामना करावा लागतो आहे.
तालुक्यातील ६८ गावांचे टंचाईग्रस्त म्हणून प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. त्यापैकी २९ गावांचे प्रस्ताव प्रांताधिकाऱ्यांनी मंजूर केले असल्याची माहिती तहसीलदार रोहिणी आखाडे-फडतरे यांनी दिली.
जावळीत पाऊस अधिक प्रमाणात होतो. मात्र पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन नसल्यामुळे हे पाणी डोंगरऊतारावरून वाहून जाते. पाणी आडवा पाणी जिरवा यासाठी शासनस्तरावरून नालाबंडिंग, पाणलोट विकास कार्यक्रम राबवले जात आहेत. मात्र जावळीत हे केवळ कागदावर दाखविण्याचा प्रयत्न गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी यांच्याकडून होताना दिसतो. आजतागायत तालुक्यात पाऊस कधीच कमी पडला नाही मात्र भीषण पाणी टंचाई भासणाऱ्या गावांची संख्या मात्र प्रत्येक वर्षी वाढताना आढळत आहे. तालुक्यात यावर्षी तर ६८ गावांमध्ये तसेच काही गावांमधील वाड्यावस्त्यांमध्ये पाणी-बाणी ची परिस्थिती निर्माण झाली आहे.
यावर कहर म्हणजे तालुक्यातील अधिकारी केवळ कागदी घोडे नाचवताना आढळत आहेत. दरवर्षी पाणी टंचाईची आढावा बैठक घेऊन केवळ कागदोपत्री उपाययोजना करण्यातच मश्गुल असलेल्या तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पाणीटंचाई भासणार नाही, अशा पद्दतीने टंचाई निवारण्यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. तरच कुठे तरी पाणीटंचाई भासणाऱ्या गावांची संख्या कमी होईल, यासाठी नूतन पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन शासकीय यंत्रणा कामाला लाऊन उन्हाळ्यातच यावर विचार करणे गरजेचे आहे.
तालुक्यात सध्या पाणीटंचाईबाबत ६८ गावांचे प्रस्ताव आले आहेत. त्यापैकी २९ गावांना प्रांताधिकारी स्वाती देशमुख यांनी मंजुरी दिली आहे. तर १४ गावांचे नवीन नळ पाणी दुरुस्ती प्रस्ताव मंजुरीसाठी, दोन गावांचे विहिरी खोल करण्याकरिताचे प्रस्ताव आले आहेत, अशी माहिती तहसीलदार रोहिणी आखाडे-फडतरे यांनी दिली.

या २९ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई
तालुक्यातील केळघर, दूंद, कुसुंबी अंतर्गत बालदारवाडी, बेलोशी, वहागाव, कोळघर, बिभवी, तेटली, शेबडी, बामणोली कसबे अंतर्गत दंडवस्ती, मोहाट, केळघर तर्फ सोळशी, आसनी, दरेखूर्द अंतर्गत जावळेवाडी, भुतेघर (भुतेघरमुरा), बाहुळे, भोगवली, ओखवडी, दापवडी, मोरावळे-खामकरवाडी, करंजे (आनंदनगर), चोरांबे, कुरळोशी (वारनेवस्ती), गाढवली पुनर्वसीत, डांगरेघर, केंजळ, निपाणी (अंतर्गत वाड्या), बेलावडे (बौद्धवस्ती), या भीषण पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या २९ गावांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे.

यावर्षी कोणत्याही गावाला पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही. त्यादृष्टीने ज्या गावात पाणीटंचाई आहे अशा गावांनी प्रस्ताव द्यावेत तात्काळ अशा गावांना पाणी पुरवण्यासाठी उपाययोजना केल्या जातील. व प्रत्येकाला पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध करून दिले जाईल.
- दत्ता गावडे
उपसभापती

Web Title: The excessive drain of the taluka is thirsty without water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.