जिल्हा रुग्णालयातील डायलेसीस ‘व्हेंटिलेटरवर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 11:00 PM2019-04-24T23:00:53+5:302019-04-24T23:00:59+5:30

दत्ता यादव । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : मूत्रपिंडाचा विकार झालेल्या रुग्णांचे डायलेसीस करण्यासाठी रोज साडेआठ हजार लिटर पाण्याची ...

District Hospital's Dialysis on Ventilator | जिल्हा रुग्णालयातील डायलेसीस ‘व्हेंटिलेटरवर’

जिल्हा रुग्णालयातील डायलेसीस ‘व्हेंटिलेटरवर’

Next

दत्ता यादव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : मूत्रपिंडाचा विकार झालेल्या रुग्णांचे डायलेसीस करण्यासाठी रोज साडेआठ हजार लिटर पाण्याची आवश्यकता असते. मात्र, जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियोजनाच्या अभावामुळे पाण्याची व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. त्यामुळे अत्यवस्थ असलेल्या रुग्णांचे नातेवाईक चिंताग्रस्त आहेत.
जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये मूत्रपिंड व्यवस्थित काम करत नसलेल्या रुग्णांवर डायलेसीस केले जाते. एकावेळी १२ रुग्णांवर डायलेसीसची सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे. दहा ते बारा हजार रुपये खासगी रुग्णालयामध्ये मोजावे लागत असल्यामुळे खासगी रुग्णालयामध्ये डायलेसीस करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे असते. त्यामुळे सिव्हिलमध्ये डायलेसीससाठी येणाºया रुग्णांची संख्या जास्त आहे. अतिदक्षता विभागामध्ये ज्या पद्धतीने रुग्णांवर उपचार केले जातात. त्याचपद्धतीने हाही विभाग अत्यंत महत्त्वाचा आहे.
रुग्णांचे डायलेसीस करण्यासाठी रोज तब्बल साडेआठ हजार लिटर पाण्याची आवश्यकता असते. पाण्याची कमतरता झाली तर रुग्णांच्या जीवावर बेतण्याची शक्यता असते. त्यामुळे पाण्याचा पुरवठा योग्यरितीने होणे गरजेचे असताना सिव्हिलमध्ये मात्र गेल्या कित्येक दिवसांपासून पाण्याचा खेळखंडोबा सुरू आहे. जीवन प्राधिकरणकडून सिव्हिलला पाणीपुरवठा होत आहे. हा पाणीपुरवठा आठवड्यातून चार ते पाचवेळा खंडित होत आहे. त्यामुळे डायलेसीस विभागातील अधिकारी आणि कर्मचारी चिंताग्रस्त होत आहेत. पाणी पुरवठा सुरळीत झाला तर नियोजनाचा अभाव असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाइकांकडून होत आहे. पाण्याचे नियोजन करण्यासाठी सिव्हिलमधील काही कर्मचाऱ्यांना नेमण्यात आले आहे. मात्र, एकमेकांवर टोलवाटोलवी केल्यामुळे कधी- कधी पाण्याअभावी डायलेसीस मशीनचा वापर कमी प्रमाणात करावा लागत आहे. एका रुग्णांवर साधारण अडीच ते तीन तास डायलेसीस करावे लागते. मात्र, पाणी कमी असेल तर हे प्रमाण दीड ते दोन तासांवरही येते. त्यामुळे रुग्णाच्या प्रकृतीवर परिणाम होण्याची शक्यता असते. या विभागात काम पाहणाºया टेक्निशियनला पाणी उपलब्ध झाले तरच रुग्णांवर डायलेसीस करता येते. रुग्णांची जबाबदारी या त्यांच्यावर असल्यामुळे पाण्यासाठी तळमळीने त्यांना याचना करावी लागत आहे.
रुग्णांना मोफत पास..
डायलेसीस रुग्णांना वारंवार रुग्णालयात यावे लागते. त्यामुळे शासनाने रुग्णांना एसटीचा मोफत पास दिला आहे. रुग्णांची गैरसोय आणि मनोबल खचू नये, यासाठी ही सुविधा देण्यात आली आहे. काही रुग्णांना एक दिवसाआड डायलेसीस करावे लागते तर काहींना आठवड्यातून एकदा डायलेसीस करावे लागते. अशांसाठी एसटीचा मोफत पास दिला जात असल्याचे वैद्यकीय अधिकाºयांनी सांगितले.

Web Title: District Hospital's Dialysis on Ventilator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.