भररस्त्यात रुग्णवाहिकेमध्येच महिलेने दिला बाळाला जन्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 12:12 AM2018-10-03T00:12:24+5:302018-10-03T00:12:29+5:30

The baby gave birth to the baby in the ambulance | भररस्त्यात रुग्णवाहिकेमध्येच महिलेने दिला बाळाला जन्म

भररस्त्यात रुग्णवाहिकेमध्येच महिलेने दिला बाळाला जन्म

Next

नीलेश साळुंखे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोयनानगर : पाटण तालुक्यातील हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेतून सोमवारी दुपारी गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी नेले जात होते. मात्र, प्रसूती वेदना वाढल्या आणि रस्त्यातच रुग्णवाहिकेमध्ये महिलेची प्रसूती झाली. एका आशा स्वयंसेविकेने कोणतीही वैद्यकीय साधने उपलब्ध नसतानाही सुरक्षित प्रसूती केली.
हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील गोषटवाडी येथील मनीषा कुराडे यांना सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास प्रसूतीपूर्व वेदना सुरू झाल्या. त्यामुळे गावातील आशा स्वयंसेविका रेश्मा सुर्वे यांनी मनीषा यांना हेळवाकच्या आरोग्य केंद्रात आणले. त्याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता मनीषा यांचा रक्तदाब वाढल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांना तातडीने पाटणच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला. त्याठिकाणी उपलब्ध असणाºया रुग्णवाहिकेतून मनीषा यांना पाटणला नेण्यात येत होते. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास रुग्णवाहिका येराड गावच्या हद्दीत आली. मात्र, मनीषा यांच्या वेदना वाढल्या. त्यांच्यासह गर्भातील बाळाच्या जीवाला धोका निर्माण झाला. त्यामुळे वेळ न घालवता आशासेविका रेश्मा यांनी कोणतेही साधन उपलब्ध नसताना प्रसूतीची तयारी सुरू केली. गाडी रस्त्यातच थांबवून त्यांनी सुरक्षित प्रसूती केली. बाळ आणि मनीषा यांना पुढील उपचार आवश्यक असल्यामुळे चालकाने रुग्णवाहिका चालू केली. मात्र, काही अंतर गेल्यानंतर काळोली गावाजवळ रुग्णवाहिकाच बंद पडली.
यावेळी स्थानिक ग्रामस्थ दिलीप सपकाळ, सिराज तांबोळी यांच्यासह इतरांनी तातडीने दुसरी गाडी उपलब्ध करून त्या मातेसह बाळाला पाटणच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वेळेत उपचार झाल्यामुळे दोघांचाही जीव वाचला. आशा स्वयंसेविका रेश्मा सुर्वे यांनी प्रसंगावधान राखत भररस्त्यात सुमो जिपच्या रूग्णवाहिकेमध्ये केलेल्या प्रसूतीची चर्चा परिसरात होती.
... अन् बाळ रडायला लागले
रस्त्यातच रुग्णवाहिकेमध्ये मनीषा यांची सुरक्षित प्रसूती झाली. आशासेविका रेश्मा सुर्वे यांनी प्रसंगावधान राखत हे कौतुकास्पद काम केले. प्रसूतीनंतर नातेवाइकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र, बाळ गुदमरल्याने ते रडत नव्हते. अखेर रेश्मा यांनी बाळाला स्वत:च कृत्रिम श्वास दिला. त्यामुळे बाळ रडायला लागले.

Web Title: The baby gave birth to the baby in the ambulance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.