निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण 

By नितीन काळेल | Published: April 18, 2024 10:17 PM2024-04-18T22:17:26+5:302024-04-18T22:18:26+5:30

खटाव तालुक्यात प्रकार : औंध पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद 

An employee of the election stability survey team was beaten up by the police | निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण 

निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण 

लोकमत न्यूज नेटवर्क 
सातारा : खटाव तालुक्यातील चोराडे फाटा येथे लोकसभा निवडणुकीच्या स्थिर सर्वेक्षण पथकातील शासकीय कर्मचाऱ्याला नाकाबंदीदरम्यान गाडी तपासणी करताना पोलिसाने मी आमदार, खासदाराच्या गाड्या चेक करतो, असे म्हणत शिवीगाळ करून मारहाण केली. याप्रकरणी औंध पोलिस ठाण्यात एकावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी सुहास विलास गुरव (रा. बनवडी काॅर्नर, कऱ्हाड. मूळ रा. कनेरीवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर) यांनी तक्रार दिली आहे. तर अजय विलास माने (रा. म्हासुर्णे, ता. खटाव) यांच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. यामधील फिर्यादी हे कऱ्हाड येथील टेंभू उपसा सिंचन प्रकल्प व्यवस्थापन विभागात लिपिक आहेत. सध्या त्यांची लोकसभा निवडणुकीसाठी स्थिर सर्वेक्षण पथकात नियुक्ती करण्यात आली आहे. दि. १७ रोजी रात्री १२ ते सकाळी ८ वाजेपर्यंत त्यांची ड्यूटी कऱ्हाड-विटा मार्गावरील चोराडे फाटा येथे होती. त्यांच्याबरोबर इतर कर्मचारीही होते. वाहन तपासणीकामी सर्वांची नियुक्ती करण्यात आलेली.

दि. १७ रोजी रात्री सव्वादोनच्या सुमारास नाकाबंदी करताना कार (एमएच ११ डीएच ०४४९) थांबवली. त्यावेळी वाहनचालकास गाडीची तपासणी करायची आहे, असे म्हटले. यावरून संशयिताने मी पोलिस आहे. ओळखपत्र दाखवू का, मी आमदार, खासदाराच्या गाड्या तपासतो. तुमची लायकी आहे का, असे म्हणून हुज्जत घालण्यास सुरुवात केली. तसेच शिवीगाळ करून सुहास गुरव यांना मारहाण करण्यात आली. यावेळी संशयिताने माझे नाव अजय माने आहे. मी पोलिस असून, सारोळा येथे नोकरी करतो. तुला काय करायचे ते कर, मी कोण आहे ते दाखवतो, अशी धमकीही दिली. त्यानंतर संशयित निघून गेला.
याप्रकरणी औंध पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पोलिस अधिक माहिती घेत आहेत.
 

Web Title: An employee of the election stability survey team was beaten up by the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.