संजयकाका-पृथ्वीराजबाबा गटात ‘सोशल’ वादावादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 12:35 AM2019-04-26T00:35:20+5:302019-04-26T00:35:24+5:30

सांगली : निवडणूक काळात शांत झालेला भाजपातील अंतर्गत वाद मतदानानंतर पुन्हा उफाळून आला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आणि ...

'Social' debate in Sanjayanka-Prithvirajbaba group | संजयकाका-पृथ्वीराजबाबा गटात ‘सोशल’ वादावादी

संजयकाका-पृथ्वीराजबाबा गटात ‘सोशल’ वादावादी

Next

सांगली : निवडणूक काळात शांत झालेला भाजपातील अंतर्गत वाद मतदानानंतर पुन्हा उफाळून आला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आणि खासदार संजयकाका पाटील गटातील काही कार्यकर्त्यांनी एका व्हॉटस्-अ‍ॅप ग्रुपवर एकमेकांवर चिखलफेक करीत वादाला तोंड फोडले. या प्रकाराने पक्षातील अन्य कार्यकर्ते अवाक् झाले आहेत.
संजयकाका पाटील आणि पृथ्वीराज देशमुख यांच्यातील संघर्ष जुना असला तरी, निवडणुकीच्या काळात हा वाद बाजूला ठेवून ते एकत्र आले होते. प्रचार सभा आणि बैठकांमध्ये त्यांनी एकत्रितपणे काम केले आहे. त्यामुळे निवडणूक काळात कुठेही त्यांचे कार्यकर्ते, समर्थकांमध्येही संघर्ष दिसत नव्हता. मतदान झाल्यानंतर मात्र या दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते सोशल मीडियावर आमने-सामने आले. भाजपशी संबंधित प्रमुख कार्यकर्त्यांचा एक व्हॉटस् अ‍ॅप ग्रुप आहे. या ग्रुपवर गुरुवारी राजकीय पोस्ट पडत होत्या. चर्चांनाही सुरुवात झाली होती. दरम्यान, देशमुख गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केले नसल्याचा आरोप खासदार गटातील एका कार्यकर्त्याने केला. त्यावरून देशमुख व खासदार गटातील कार्यकर्त्यांनी एकमेकांवर चिखलफेक सुरू केली. दोघांच्याही वादात रस नसणाऱ्या भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना हा प्रकार खटकला. काहींनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो निष्फळ ठरला.
सांगली जिल्ह्यातील भाजपअंतर्गत वाद निवडणुकीपूर्वी विकोपाला गेला होता. पक्षांतर्गत गटबाजी वाढल्याची बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निदर्शनास आली होती. त्यामुळे त्यांनी मुंबईत याबाबत बैठक घेतली होती. या बैठकीस जिल्ह्यातील पक्षाचे आमदार, प्रमुख पदाधिकारी यांना बोलाविण्यात आले होते. त्याठिकाणी पक्षांतर्गत वादावर पडदा टाकण्यात आला होता. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच नेते एकसंधपणे निवडणुकीत काम करताना निदर्शनास आले. त्यामुळे पुन्हा वाद निर्माण होणार नाहीत, असा विश्वास कार्यकर्त्यांना वाटत होता. गुरुवारी सोशल मीडियावरील वादावादीच्या घटनेने त्यांना धक्का बसला.
सांगली लोकसभा मतदारसंघातील निकालाविषयी बरेच तर्कवितर्क लढविले जात आहेत. भाजपमध्येही यावरून चर्चांना उधाण आले आहे. अशाच उधाणलेल्या चर्चांमधून वादावादीसही सुरुवात झाली आहे. सामान्य कार्यकर्त्यांमधील वादावादीचे हे प्रकार पक्षासाठी भविष्यात डोकेदुखीचे ठरू शकतात. त्यामुळे स्थानिक पदाधिकारी व नेत्यांनीही या गोष्टीची दखल घेत संबंधित कार्यकर्त्यांना शांत बसण्याची सूचना दिल्याचे समजते.

चर्चेला फुटले पाय; कार्यकर्ते गप्पच
एका ग्रुपवर झालेल्या वादामुळे त्याची चर्चा अन्य ग्रुपवरही रंगली होती. चर्चेला पाय फुटून ती कार्यकर्त्यांमध्ये येऊन पोहोचली. सांगली, मिरजेतील कार्यकर्त्यांमध्ये गुरुवारी सायंकाळी वादावादीच्या प्रकारावरून चर्चा सुरू होत्या. काही प्रमुख कार्यकर्त्यांशी संपर्क साधल्यानंतर, त्यांनी याविषयी काहीही सांगण्यास नकार दिला.
जुन्या-नव्यांचाही पक्षातील वाद कायम
भाजपमध्ये जुन्या-नव्या कार्यकर्त्यांचा वादही कायम आहे. निवडणुकीत तो शांत असला तरी, भविष्यात यावरून पुन्हा नाराजीनाट्य रंगण्याची चिन्हे आहेत. यापूर्वी जुन्या निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांनी बैठक घेऊन नव्याने आलेल्या लोकांकडून होत असलेल्या अन्यायाबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे वाचा फोडली होती.

Web Title: 'Social' debate in Sanjayanka-Prithvirajbaba group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.