मोदी सरकारकडून संविधानाचा वारंवार अवमान - ॲड. असीम सरोदे 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 02:04 PM2023-11-20T14:04:05+5:302023-11-20T14:17:33+5:30

पैशाचा आणि सत्तेचा खेळ म्हणजे लोकशाही नव्हे

Repeated contempt of the Constitution by the Modi government says Adv. Asim Sarode | मोदी सरकारकडून संविधानाचा वारंवार अवमान - ॲड. असीम सरोदे 

मोदी सरकारकडून संविधानाचा वारंवार अवमान - ॲड. असीम सरोदे 

कवठे एकंद : सध्याचे मोदी सरकार हे संविधानाचा अवमान करणारे असल्याचे वारंवार दिसून आले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील पक्ष फोडाफोडीचे प्रकार म्हणजे राजकीय व्यवस्थापनातील चुकीचे पायंडे आहेत. त्यांचा खेळ चालला आहे, याला लोकशाही म्हणायचे का, असा सवाल ॲड. असीम सरोदे यांनी कवठे एकंद (ता. तासगाव) येथे केला. 

कवठे एकंद येथील क्रांतिसिंह नाना पाटील ज्ञानप्रबोधिनीच्या व्याख्यानमालेत दुसरे पुष्प गुंफताना ॲड. सरोदे हे ‘सत्तेच्या खेळातील लोकशाही’ विषयावर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजाराम माळी होते. प्रा. डॉ. बाबूराव गुरव, ॲड. सुभाष पाटील, प्रा. बाबूराव लगारे, ॲड. सतीश लोखंडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

ॲड. सरोदे म्हणाले, सध्या राजकारणाचा आणि राजकारण्यांचा दर्जा घसरला आहे. मार्गदर्शन करण्याची क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे लोकशाही विरळ होत चालली आहे. माणसामाणसांमध्ये, जाती- धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याची प्रवृत्ती संविधानात नाही. परंतु, सध्याच्या कट्टरवादी सरकारने लोकशाहीचा खेळ सुरू केला आहे हे समजून घेतले पाहिजे. जाणीवपूर्वक संविधानाचे आणि लोकशाहीचे अवमूल्यन करण्याचा घाट घातला जात आहे. हे शहाण्या मतदारांनी ओळखले पाहिजे. कुणाला पाडायचं हे आता लोकांनी ठरवलं पाहिजे.

ते पुढे म्हणाले, पैशाचा आणि सत्तेचा खेळ म्हणजे लोकशाही नव्हे. देशावर आणि संविधानावर प्रेम असणारी लोकं लोकशाहीत पाहिजेत. राजकारणाचा दर्जा घसरला आहे. त्यांना त्यांची जागा दाखवायला पाहिजे. लोकशाही मारून टाकण्याची प्रवृत्ती वाढत आहे. पण, लोकशाहीला जिवंत ठेवण्यासाठी आपण विचार केला पाहिजे. लोकशाहीची नैतिकता सांभाळण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. यासाठी प्रत्येक नागरिकाने सगज राहिले पाहिजे.

Web Title: Repeated contempt of the Constitution by the Modi government says Adv. Asim Sarode

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.