‘सरकारां’चं रिलेशन; इलेक्शन टू इलेक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 11:37 PM2019-07-14T23:37:15+5:302019-07-14T23:37:20+5:30

दत्ता पाटील। लोकमत न्यूज नेटवर्क तासगाव : पाच वर्षांपूर्वी भाजपचे नेते, माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकारांचा विधानसभा निवडणुकीत निसटता ...

Relations of 'Governments'; Election to Election | ‘सरकारां’चं रिलेशन; इलेक्शन टू इलेक्शन

‘सरकारां’चं रिलेशन; इलेक्शन टू इलेक्शन

Next

दत्ता पाटील।
लोकमत न्यूज नेटवर्क
तासगाव : पाच वर्षांपूर्वी भाजपचे नेते, माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकारांचा विधानसभा निवडणुकीत निसटता पराभव झाला. त्यानंतर पाच वर्षांत घोरपडेंनी तासगावची नाळ तोडून टाकली. विधानसभा निवडणुुकीचे वेध लागल्यानंतर, पाच वर्षांनी पुन्हा सरकारांनी तासगाव तालुक्याकडे मोर्चा वळवला. दौरे काढण्यास सुरुवात केली. त्यामुळे तासगाव तालुक्याशी ‘सरकारांचं रिलेशन; केवळ इलेक्शन टू इलेक्शन आहे का?’ याची चर्चा सुरू झाली आहे.
पाच वर्षांपूर्वी २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याविरोधात भाजपकडून माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे सरकार यांनी जोरदार लढत दिली होती. अत्यंत अटीतटीच्या या लढतीत घोरपडेंना अवघ्या २२ हजार मतांनी पराभव पत्करावा लागला. घोरपडेंच्या पराभवात पक्षांतर्गत माशी शिंकल्याची चर्चा सुरू झाली. गृहमंत्री पदावर असूनही आर. आर. पाटील यांच्याविरोधात निसटता पराभव झाल्याचे शल्य घोरपडेंना सातत्याने बोचत राहिल्याची चर्चा होत होती.
या विधानसभा निवडणुकीनंतर मात्र घोरपडेंनी भाजपशी फारकत घेतली. पाच वर्षांत झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राष्टÑवादीशी हातमिळवणी करून लढवल्या. या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपशी आणि खासदार संजयकाका पाटील यांच्यातील मतभेद उघडकीस येऊ लागले. अगदी जिल्हा परिषदेत अध्यक्षपदासाठी पाठिंबा देतानाही अध्यक्षपदाच्या शर्यतीत असणाऱ्या डी. के. पाटील यांना विरोध करून, विद्यमान अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांना अध्यक्ष करण्याच्या अटीवरच पाठिंबा जाहीर केला. घोरपडेंच्या मनातील खदखद सातत्याने समोर येत असतानाच, लोकसभा निवडणुकीत पुन्हा राजकारणाला कलाटणी मिळाली. खासदार पाटील यांच्याशी जुळवून घेतले. तेव्हापासून सरकार-खासदार मनोमीलन एक्स्प्रेस सुरू झाली.
भाजपचा वारु सुसाट धावू लागल्याने आणि मुख्यमंत्र्यांकडून, भाजपकडून विधानसभेसाठी उमेदवारीची हमी मिळाल्याने, सरकारांनी पुन्हा विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरु केली आहे. याच पार्श्वभूमीवर तासगाव तालुक्यात दौरा काढण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी उपळावी येथील भाजपच्या कार्यक्रमास हजेरी लावली. त्यापूर्वी राजापूरसह येळावी गटातील काही गावांचा दौरा केला. खासदारांच्या सत्काराला हजेरी लावली. सरकारांनी तासगाव तालुक्यातील गावोगावी भेटीगाठीचा धडाका लावला आहे. मात्र या भेटीगाठी सुरु असताना, पाच वर्षे सरकारांनी तासगाव तालुक्याकडे पाठ का फिरवली? असा प्रश्न उपस्थित होत असून, घोरपडे सरकारांचे तासगावशी रिलेशन विधानसभा निवडणुकीपुरतेच आहे का? याची कार्यकर्त्यांत चर्चा सुरु आहे.

तासगावात गट उभारण्यात यश नाही
पाच वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत संजयकाका पाटील यांना खासदारकीची लॉटरी लागली. त्यापूर्वी तासगाव - कवठेमहांकाळ मतदारसंघातील दोन्ही तालुक्यात केवळ आर. आर. पाटील यांचाच गट होता. पाच वर्षांपूर्वी संजयकाकांचा तासगाव तालुक्यापुरता, तर अजितराव घोरपडेंचा कवठेमहांकाळ तालुक्यापुरता मर्यादित गट होता. मात्र संजयकाका खासदार झाल्यानंतर कवठेमहांकाळ तालुक्यात राष्टÑवादी आणि घोरपडे सरकारांच्या गटाला धक्के देत, स्वत:चा गट तयार केला. मात्र सरकारांना पाच वर्षात तासगाव तालुक्यात स्वत:चा गट तयार करण्यात पूर्णपणे अपयश आले.

खासदारांवरच भरोसा
तासगाव तालुक्यात अजितराव घोरपडेंना मानणारा स्वत:चा गट नाही. किंंबहुना तासगाव तालुक्याशी पाच वर्षात जनतेशी कोणतीच नाळ राहिली नाही. ते तालुक्यात फिरकलेही नाहीत. त्यामुळे विधानसभा निवडणूक लढवताना, सरकारांना खासदार संजयकाका पाटील यांच्याच भरवशावर रहावे लागणार असल्याचे चित्र आहे.

Web Title: Relations of 'Governments'; Election to Election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.