आठ हॉटेल्सवर छापे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 12:10 AM2018-10-30T00:10:39+5:302018-10-30T00:10:51+5:30

सांगली : घाणीच्या साम्राज्यातच किचनमध्ये पदार्थ तयार करणाऱ्या हॉटेल मालकांना अन्न व औषध प्रशासन विभागाने सोमवारी पुन्हा दणका दिला. ...

Raids in eight hotels | आठ हॉटेल्सवर छापे

आठ हॉटेल्सवर छापे

googlenewsNext

सांगली : घाणीच्या साम्राज्यातच किचनमध्ये पदार्थ तयार करणाऱ्या हॉटेल मालकांना अन्न व औषध प्रशासन विभागाने सोमवारी पुन्हा दणका दिला. सांगली, मिरजेतील आठ हॉटेल्सवर एकाचवेळी छापे टाकले. हॉटेलसह किचनचीही तपासणी केली. यामध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत.
सर्व हॉटेल मालकांना कारवाईची नोटीस बजावण्यात आली आहे, अशी माहिती सहायक आयुक्त सुकुमार चौगुले यांनी दिली.
चार दिवसांपूर्वी काँग्रेस भवनजवळील हॉटेल ‘नवरत्न’मध्ये अन्नपदार्थांमध्ये झुरळ आढळले होते. ग्राहकांनी तक्रार केल्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाने या हॉटेलवर छापा टाकून किचनची तपासणी केली होती. त्यावेळी भिंतीवर झुरळ आढळून आले. कांदा फरशीवर ठेवण्यात आला होता.
प्रचंड घाणीच्या साम्राज्यातच पदार्थ तयार केले जात असल्याचे आढळून आले. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाने हे हॉटेल बंद करण्याची नोटीस बजावली. शनिवारपासून हॉटेल बंद आहे. यानिमित्ताने शहरातील सर्वच हॉटेल्समधील किचन आणि स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला.
दरम्यान, ‘लोकमत’ टीमने शनिवारी शहरातील हॉटेल्सना भेट देऊन ‘स्टिंग आॅपरेशन’ केले होते. त्यावेळी किचनमध्ये घाणीचे साम्राज्य आढळून आले. ‘लोकमत’च्या ‘स्टिंग आॅपरेशनची अन्न व औषध प्रशासन विभागाने गंभीर दखल घेऊन हॉटेलच्या तपासणीसाठी ‘टास्क फोर्स’ तयार केला आहे. सोमवारी या टास्क फोर्सने सांगलीतील जिमखान्याचे रेस्टॉरंट हॉटेल हनुमान, हॉटेल विहार, हळद भवन कॅन्टीन, द्वारका स्वीटस् बेकर्स अ‍ॅण्ड केक शॉप, मिरजेतील हॉटेल अयोध्या, हॉटेल सुखसागर, अवनी थीम पार्क याठिकाणी छापे टाकून तपासणी केली. तेथे किचनमध्ये अस्वच्छता आढळून आली. फरशा फुटलेल्या होत्या. भिंती काळवंडल्याचे आढळून आले. अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती एस. व्ही. हिरेमठ, सुरेश दांगट व र. ल. महाजन यांनी ही कारवाई केली.
...अन्यथा परवाना निलंबित
सहायक आयुक्त सुकुमार चौगुले म्हणाले, सर्व हॉटेल मालकांना त्यांच्या हॉटेलमध्ये आढळलेल्या त्रुटींचा समावेश करुन नोटीस बजावण्यात आली आहे. त्रुटींची पूर्तता येत्या आठ दिवसांत न केल्यास त्यांच्या हॉटेलचा परवाना निलंबित केला जाईल. मंगळवारपासून पुन्हा हॉटेलसह सर्व व खाद्यपदार्थ विक्रेत्यांची तपासणी केली जाणार आहे.

Web Title: Raids in eight hotels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.