सांगली, मिरजेत पैगंबर जयंतीनिमित्त मिरवणूक : ईद-ए-मिलाद उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 01:19 AM2017-12-03T01:19:13+5:302017-12-03T01:20:28+5:30

 The procession for the birthday of Prophet Mohammad in Sangli, Eid-e-Milad | सांगली, मिरजेत पैगंबर जयंतीनिमित्त मिरवणूक : ईद-ए-मिलाद उत्साहात

सांगली, मिरजेत पैगंबर जयंतीनिमित्त मिरवणूक : ईद-ए-मिलाद उत्साहात

Next
ठळक मुद्देविविध कार्यक्रमांचे आयोजन, विशेष प्रार्थनाबाराईमाम दर्ग्यापासून सुरू झालेल्या मिरवणुकीत पारंपरिक अरबी पध्दतीच्या वेशभूषेत घोड्यावर बसलेली लहान बालके,

सांगली/मिरज : महंमद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी सांगली शहरातून मिरवणूक काढण्यात आली. माजी मंत्री पतंगराव कदम काहीवेळ मिरवणुकीत सहभागी झाले होते.
बदाम चौकातून मिरवणुकीस प्रारंभ झाला. स्टेशन चौक, आझाद चौक, काँग्रेस भवन, राम मंदिर कॉर्नर, राजवाडा चौक, पटेल चौक, झाशी चौक, हरभट रस्ता, महापालिका, मुख्य बसस्थानक, सिव्हिल चौक, फौजदार गल्ली आदी मार्गावरुन फिरुन बदाम चौकात मिरवणुकीची सांगता झाली. लहान मुले-मुली मोठ्या संख्येने सहभागी झाली होती.

मदिनाची प्रतिकृती व अग्रभागी घोडे मिरवणुकीत होते. हिंदू मित्र मंडळ, एकता रिक्षा मंडळ, दलित संघटना तसेच शीख समाजातील पदाधिकारीही सहभागी झाले होते. माजी मंत्री पतंगराव कदमही मिरवणुकीत सहभागी झाले होते. पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी शहर पोलिस ठाण्याजवळ मिरवणुकीचे स्वागत केले. यावेळी आसिफ बावा, उमर गवंडी, इकबाल जमादार, शहानवाज फकीर, युसूफ मेस्त्री, जावेद पठाण, साहील खाटीक आदी उपस्थित होते.

मिरज : मिरज शहर परिसरात पैगंबर जयंती व ईद ए मिलाद उत्साहात साजरी करण्यात आली. बाराईमाम दर्ग्यापासून शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत हजारो मुस्लिम बांधव सहभागी होते. मीरासाहेब दर्गा आवारात मिरवणुकीचा समारोप झाला. बाराईमाम दर्ग्यापासून सुरू झालेल्या मिरवणुकीत पारंपरिक अरबी पध्दतीच्या वेशभूषेत घोड्यावर बसलेली लहान बालके, रिक्षा, बैलगाड्या व डफवादक फकीर यांच्यासह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी होते. लक्ष्मी मार्केट, शास्त्री चौक, बुधवार पेठ, गुरुवार पेठ, भंडारी बाबा दर्गामार्गे मिरवणुकीचा मीरासाहेब दर्ग्याच्या आवारात समारोप झाला. समारोपप्रसंगी विशेष प्रार्थना झाली. मिरवणुकीत विविध संघटनांतर्फे सहभागी झालेल्यांना सरबत वाटप करण्यात आले. दर्गा सरपंच अजिज मुतवल्ली, मौलाना अन्वर, मौलाना नुरी, ए. जी. नदाफ, असगर शरीकमसलत, जैलाब शेख, जानीब मुश्रीफ, मुस्लीम ओबीसी संघटनेचे शब्बीर अन्सारी, इद्रिस नायकवडी, उद्योजक नूर मोहम्मद यांच्यासह कार्यकर्त्यांनी संयोजन केले.

दर्गा आवारात मिरवणुकीच्या समारोपप्रसंगी नात शरीफ सलाम व प्रार्थना झाली. मौलाना नुरी यांनी जगात शांततेसाठी प्रेषित पैगंबरांच्या विचारांची गरज असल्याचे सांगितले. कवी नौशाद यांनीही शायरीच्या माध्यमातून प्रबोधन केले. ईद-ए-मिलादनिमित्त मीरासाहेब दर्गा व मिरज शहरात विविध ठिकाणी अन्नदान करण्यात आले. मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, उपअधीक्षक धीरज पाटील यांच्यासह मोठा पोलिस फौजफाटा उपस्थित होता.

मिरजेत भाजप, शिवसेनेतर्फे स्वागत
खा. संजय पाटील, भाजप नेते दीपक शिंदे, गजेंद्र कुळ्ळोळी यांनी मिरजेतील किसान चौकात मिरवणुकीचे स्वागत केले. शिवसेनेचे चंद्रकांत मैगुरे, पप्पू शिंदे, मलगोंड पाटील, दाऊद काजी मिरवणुकीत सहभागी होते. मिरवणूक मार्गावर एमआयएम, बसपा, सौदागर गल्ली फ्रेड सर्कल, रजा अ‍ॅकॅडमीतर्फे स्वागत करण्यात आले. भीम आर्मीतर्फे सरबत वाटप झाले.

Web Title:  The procession for the birthday of Prophet Mohammad in Sangli, Eid-e-Milad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.