वादग्रस्तच नव्हे, सर्व प्रकारचे लोक संपर्कात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 11:50 PM2018-02-11T23:50:59+5:302018-02-11T23:50:59+5:30

Not just controversial, but all kinds of people contact | वादग्रस्तच नव्हे, सर्व प्रकारचे लोक संपर्कात

वादग्रस्तच नव्हे, सर्व प्रकारचे लोक संपर्कात

Next


सांगली : महापालिका निवडणुकीसाठी केवळ वादग्रस्तच नव्हे, तर सर्वच प्रकारचे लोक भाजपच्या संपर्कात आहेत. निवडून येण्याची क्षमता हा एकच निकष लावून आम्ही अन्य पक्षीय कार्यकर्त्यांना भाजपमध्ये घेऊ, असे विधान जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी रविवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना केले.
ते म्हणाले की, सांगली, मिरज, कुपवाड महापालिका निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढविण्याचा आमचा निर्णय झाला आहे. त्यासंदर्भातील नियोजन सुरू आहे. पक्षात येऊ पाहणाºयांना आम्ही प्रवेश देणार आहोत. निवडून येण्याचाच निकष त्यांना लावण्यात येणार आहे. अन्य कोणत्याही निकषावर त्यांची परीक्षा नाही. वादग्रस्तच नव्हे, तर सर्वच प्रकारचे लोक भाजपच्या संपर्कात आहेत. सर्वांशीच आम्ही चर्चा करू. सर्वांचे समाधान होईल, असे निर्णय घेतले जातील. देशमुख यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर नवे वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. दोनच दिवसांपूर्वी भाजपचे नेते महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिकेच्या मतदारांना १ लाख भेटवस्तू वाटपाचे विधान केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या या वक्तव्यावर चोहोबाजूंनी टीकास्त्र सोडले जात आहे. काँग्रेस, जिल्हा सुधार समिती, शिवसेना, नागरिक हक्क संघटना अशा अनेक पक्ष, संघटनांनी त्यांचा निषेध केला होता. अशातच महापालिका निवडणुकीविषयी देशमुख यांनीही वादग्रस्त व्यक्ती संपर्कात असल्याचे मान्य करुन नव्या वादास तोंड फोडले आहे.
सांगली महापालिका निवडणुकीत प्रत्येकवेळी वादग्रस्त व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या उमेदवारांचा विषय चर्चेत येतो. ज्या पक्षाच्या उमेदवारांच्या यादीत गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक असतील, ते टीकेचे धनी होत असतात. राष्टÑवादीचे नेते अजित पवार यांनीही सांगलीत एकदा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नगरसेवकांच्या पोस्टरबाजीवर टीकास्त्र सोडले होते. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत अशा उमेदवारांचा आणि नगरसेवकांचा विषय चर्चेला येत असतो. यंदा चांगल्या राजकीय कार्यकर्त्यांसह काही वादग्रस्त कार्यकर्तेही भाजपच्या संपर्कात आले आहेत.
त्यांनी पक्षप्रवेशाकरिता स्थानिक भाजप नेत्यांना साकडे घातले आहे. अद्याप त्यांच्याविषयी निर्णय झाला नसला तरी, देशमुख यांनी त्यांच्यासाठीही केवळ निवडून येण्याच्या क्षमतेचा निकष लावल्याचे स्पष्ट केले.

Web Title: Not just controversial, but all kinds of people contact

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.