आमदार, मंत्री भाजपाच्या कोट्यातून; मला काढणारे शेट्टी कोण? - सदाभाऊ खोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 05:35 PM2017-08-18T17:35:34+5:302017-08-18T18:01:27+5:30

  ‘मी सामान्य शेतकरी असूनही माढा लोकसभा मतदारसंघात पाच लाख मते घेतली. खासदार राजू शेट्टी, तुमच्यात हिंमत असेल तर हातकणंगले मतदारसंघाच्या बाहेर जाऊन निवडून येऊन दाखवा’,

MLA, minister from BJP quota; Who am I to get out of Shetty? - Sadabhau Khot | आमदार, मंत्री भाजपाच्या कोट्यातून; मला काढणारे शेट्टी कोण? - सदाभाऊ खोत

आमदार, मंत्री भाजपाच्या कोट्यातून; मला काढणारे शेट्टी कोण? - सदाभाऊ खोत

googlenewsNext

सांगली, दि.18 -  ‘मी सामान्य शेतकरी असूनही माढा लोकसभा मतदारसंघात पाच लाख मते घेतली. खासदार राजू शेट्टी, तुमच्यात हिंमत असेल तर हातकणंगले मतदारसंघाच्या बाहेर जाऊन निवडून येऊन दाखवा’, असे आव्हान कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगलीत शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिले.
‘मला आमदारपद, मंत्रीपद भाजपाच्या कोट्यातून मिळाले असल्यामुळे, शेट्टींनी काढण्याचा संबंधच कुठे येतो? मला काढायचे की ठेवायचे ते भाजपाचे नेतेच ठरवतील’, असा टोलाही त्यांनी शेट्टींना लगावला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी झाल्यानंतर खोत यांना राज्य मंत्रिमंडळातून काढण्याबाबत खा. शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांना पत्र दिल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर खोत यांनी पहिल्यांदाच सविस्तर भूमिका मांडली.
ते म्हणाले की, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता होतो आणि सरकारमध्ये गेल्यानंतरही कार्यकर्ता म्हणूनच काम करत होतो. मंत्री
झाल्यानंतरही माझ्या छातीवरचा संघटनेचा बिल्ला मी काढला नव्हता. पण, माझे मंत्रीपद शेट्टींच्या डोळ्यात खुपत असल्यामुळे त्यांनी वारंवार माझ्यावर
टीका करून माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला. माझ्या मुलाचाही जिल्हा परिषद निवडणुकीत जाणीवपूर्वक पराभव केला. तरीही मी संघटनेचे काम प्रामाणिकपणे करत होतो. मात्र त्यांनी चौकशी समिती नेमण्याचे नाटक करून माझी हकालपट्टी केली. एवढ्यावर समाधान झाले नसल्यामुळे माझ्याविरोधात गलिच्छ भाषेत टीका करून माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न ते करीत आहेत.
ते म्हणाले की, राजू शेट्टींनी शेतकरी हितापेक्षा स्वत:च्या हितालाच नेहमी प्राधान्य दिले. त्याचा आणि इतर भानगडींचा मी साक्षीदार आहे. ऊस
दराबाबत कारखानदारांच्या बैठकीत बोलायचे एक आणि शेतक-यांसमोर दुसरेच सांगायचे. आम्हालाही त्यांच्या या भूमिकेबद्दल आश्चर्य वाटायचे.
कर्जमाफीबाबतही तसेच झाले. बैठकीत तोडगा मान्य, म्हणून उठले आणि बाहेर येऊन, पूर्ण कर्जमाफीशिवाय मागे हटणार नाही, अशी घोषणा केली. भाजपा सरकार निवडून आणून चूक झाल्याचे सांगून, सरकारमधून बाहेर पडण्याची घोषणा केली जाते. प्रत्यक्षात त्यांना सरकारमध्ये थांबायला कोणी सांगितले आहे? परंतु शेट्टींची सरकारमधून बाहेर पडण्याची हिंमत नाही. त्यांना केवळ सरकारमधील सदाभाऊंची अ‍ॅलर्जी असल्याने हा खटाटोप चालू आहे. मला काढण्याचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कशासाठी देता? तुमचा संबंधच काय? मी भाजपच्या कोट्यातून आमदार आणि मंत्री झालो आहे. त्यामुळे मला ठेवायचे की नाही, ते भाजपाचे नेते ठरवतील.
खोत म्हणाले की, जनाधार म्हणाल, तर तुम्ही हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या बाहेर पडून कोठूनही निवडून येऊन दाखवावे. मी कायमस्वरूपी
राजकारण सोडतो. नाही तर तुम्ही तर राजकारण सोडून दाखवा. तुमच्यात ताकद असेल तर हातकणंगले मतदारसंघातून अन्य कार्यकर्त्याला संधी द्या. मी माढा लोकसभा मतदारसंघात प्रस्थापितांच्या विरोधात निवडणूक लढवून पाच लाख मते घेतली. तुम्ही अथवा तुमच्या कार्यकर्त्याने तेथे उभे राहून एक लाख तरी मते घेऊन दाखवावीत. तेथे गेल्यावरच तुमचा जनाधार आणि कार्यकर्ते किती तुमच्या सोबत आहेत ते समजणार आहे.

शेट्टींचा हुकूमशाही पध्दतीने कारभार
खा. राजू शेट्टींना त्यांच्याशिवाय कोणीही मोठे झालेले आवडत नसल्यामुळे, त्यांनी माझी संघटनेतून हकालपट्टी केली आहे. माझ्याप्रमाणेच त्यांनी
उल्हास पाटील यांनाही तशीच वागणूक दिली होती. संघटनेतील प्रत्येकाला हुकूमशाही पध्दतीने वागणूक देतात. ते कार्यकर्त्यांना गुलामाप्रमाणे
वागवत आहेत. आपण सांगू तीच पूर्व दिशा असली पाहिजे, असा त्यांचा स्वभाव आहे. त्यांनी आजपर्यंत संघटनेचा केवळ स्वार्थासाठीच उपयोग केला आहे, असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला.

‘स्वाभिमानी’ची धुरा मी सांभाळली असती...
तुम्ही प्रत्येक वेळा शेतक-यांची दिशाभूल करण्यासाठी, आपण एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मिरवता. तुम्हाला संघटनेचे नेतृत्व करण्याचा कंटाळा
आला होता, तर मी संघटनेची धुरा सांभाळण्यास तयार होतो. आमच्यावर जबाबदारी टाकून पाहायचे होते. पण, प्रत्येकवेळा बहुजनांचा चेहरा घेऊन मिरवायचे आणि त्यांना कोणत्याही पदावर संधीच मिळू द्यायची नाही, हा उद्योग आता बंद करा, अशी टीकाही खोत यांनी केली.

शेट्टींचा राजकारणाचा व्यवसाय बंद पाडू
राजू शेट्टींनी शेतक-यांचे भांडवल करून राजकारणाचा ‘व्यवसाय’ चालू केला आहे. याला माझा विरोध होता, म्हणूनच त्यांनी माझी संघटनेतून हकालपट्टी
केली आहे. पण, यापुढे त्यांचा राजकारणातील आणि संघटनेतील साखरसम्राटांबरोबरचा ‘व्यवसाय’ बंद पाडण्यात येईल, असा इशारा सदाभाऊ खोत
यांनी दिला.

शरद जोशींनी हकालपट्टी केली, तेव्हा तुम्ही गद्दारी केली होती का?
शेतकरी संघटनेतून शरद जोशींनी तुमची हकालपट्टी केली, तेव्हा तुम्ही गद्दारी केली होती का? जोशींनी भाजपाबरोबर युती केली म्हणून त्यांच्यावर
टीका करून तुम्ही स्वतंत्र संघटना स्थापन केली. त्यावेळी तुमचा आत्मसन्मान कोठे गेला होता? कोल्हापुरात भाजपाबरोबर, सांगलीत काँग्रेस आणि
नाशिक, पनवेलमध्ये शिवसेनेबरोबर युती-आघाड्या करता आणि तत्त्वाची भाषा आम्हाला शिकविता काय, असा घणाघात सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींवर केला.

Web Title: MLA, minister from BJP quota; Who am I to get out of Shetty? - Sadabhau Khot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.