मिरजेच्या चार गावांत विकासाला खीळ, थेट सरपंच निवडीमुळे राजकीय संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 12:14 AM2018-04-15T00:14:14+5:302018-04-15T00:14:14+5:30

Growth of development in four villages of Miraj, political struggle by directly selecting the sarpanch | मिरजेच्या चार गावांत विकासाला खीळ, थेट सरपंच निवडीमुळे राजकीय संघर्ष

मिरजेच्या चार गावांत विकासाला खीळ, थेट सरपंच निवडीमुळे राजकीय संघर्ष

Next
ठळक मुद्देपडसाद : ; कट्टर विरोधाचा परिणाम; सरपंच अल्पमतात, तर विरोधक बहुमतात!

अण्णा खोत ।
मालगाव : थेट जनतेतून सरपंच निवडीचे पडसाद गावस्तरावर उमटू लागले आहेत. चुरशीने पार पडलेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीत सरपंच अल्पमतात व विरोधक बहुमतात, असा निकाल पुढे आला. तो सध्या विकास कामांना खीळ घालणारा व संघर्ष वाढविणारा ठरला आहे.
मिरज पूर्वभागातील खटाव, सोनी, सिध्देवाडी, वड्डी या चार ग्रामपंचायतीत दोन गटांत राजकीय संघर्ष दिसून येत आहे. जनतेतून सरपंच निवडीच्या निर्णयाला फारसा विरोध न झाल्याने तो निवडणुकीत अमलात आला. निवडणुका लक्षवेधी ठरल्या. मात्र काही गावात सरपंच अल्पमतात व विरोधक बहुमतात असा निकाल लागला. या चार गावात सरपंच अल्पमतात आहेत. सरपंचांना निर्णयाचे पूर्ण अधिकार असले तरी, विरोधी गटाचे सदस्य वरचढ ठरू लागले आहेत. मर्जीतील ग्रामसेवकाची नेमणूक, मंजूर असलेली चौदाव्या वित्त आयोगासह इतर योजनांची कामे राबविण्याचा सरपंचांकडून प्रयत्न होत आहे. मात्र कामे विश्वासात न घेता राबविली जात असल्याचा आरोप करीत विरोधकांकडून बहुमताच्या बळावर सरपंचांनी घेतलेला निर्णय हाणून पाडला जात आहे. सरपंचांनी अधिकाराचा वापर करून निर्णय घेण्याचा प्रयत्न केल्यास दोन गटात टोकाचा संघर्ष होत असल्याने अल्पमतात असलेल्या सरपंचांना माघार घ्यावी लागत आहे.
वड्डीत भाजपची सत्ता असली तरी, तेथे सरपंच व सदस्यांची संख्या पाच व विरोधी गटाची सदस्य संख्या सहा आहे. विरोधी गटाचा उपसरपंच आहे. येथे विरोधी गटाचे बहुमत असल्याने व महिला सरपंचांचा पती ग्रामपंचायतीच्या कामकाजात हस्तक्षेप करीत असल्याचा विरोधी गटाचा आरोप असल्याने सरपंचांच्या निर्णयाला उघड विरोध होत आहे. वड्डी ग्रामपंचायत ग्रामसेवक नेमणुकीचा वाद थेट पंचायत समितीपर्यंत आला होता. याचा कामांवर परिणाम होत आहे.
खटाव ग्रामपंचायतीत सत्ताधारी गटाच्या सरपंचांसह सहा व विरोधी गटाचे आठ सदस्य आहेत. खटावसाठी गत पदाधिकाऱ्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी सुमारे ५९ लाख रुपये खर्चाची मुख्यमंत्री पेयजल योजना व सोमेश्वर मंदिरासाठी साडेएकवीस लाखांचा निधी मंजूर करून घेतला आहे. दोन्ही कामे राबविण्यासाठी सत्ताधारी गटाने निवडलेल्या जागेला विरोधी गटाने बहुमताच्या बळावर विरोध केल्याने दोन्ही कामे सध्या वादाच्या भोवºयात सापडली आहेत. या विरोधामुळे सत्ताधारी गटाला माघार घेण्याची वेळ आली असली तरी, वादात ही कामे ठप्प आहेत.
सोनीतही बहुमत नसल्याने विकासकामे राबविताना सत्ताधारी सरपंच गटाची तारेवरची कसरत सुरू आहे. सध्या विद्यमान सरपंच असलेले राजू माळी यांनी ते जिल्हा परिषद सदस्य असताना गत ग्रामपंचायत सत्ताधाºयांनी राबविलेल्या कामावर आक्षेप घेतले होते. माळी सरपंच झाल्यानंतर विरोधी गटाने बहुमताच्या बळावर गावात सुरू करण्यात आलेल्या रुणालयाच्या कामाला जाण्याच्या कारणावरून आक्षेप घेतल्याने या वादात रुग्णालयाचे काम रखडले आहे. दोन्ही गटाचे नेते जिल्हास्तरावर कार्यरत आहेत.
सिध्देवाडी ग्रामपंचायतीचा निकाल धक्कादायक ठरला. येथेही सरपंच रामचंद्र वाघमोडे अल्पमतात आहेत. त्यांच्या गटाचा एकही सदस्य निवडून आला नाही. विरोधी महावीर खोत गटाचे बहुमत असल्याने विकासकामे राबविण्यावरून मतभेद होत आहेत. दोन्ही गटाकडून एकत्र येण्यासाठी प्रयत्न होत नसल्याने विकासाला फारशी गती नाही.

प्रशासनाची : डोकेदुखी
खटाव, वड्डी, सोनी व सिध्देवाडी या चार ग्रामपंचायतीत विरोधी सदस्यांचा गट बहुमतात असल्याने अल्पमतात असलेल्या सरपंचांना विकासाचा श्रीगणेशाही करता येईना. सरपंचांच्या विकास कामाच्या निर्णयाला विरोध होत असल्याने राजकीय संघर्षात वाढ झाली आहे. या विषयावर तंटामुक्ती होत नसल्याने गाव पातळीवरचा हा वाद पंचायत समितीपर्यंत पोहोचला आहे. दोन्ही गट आपल्या भूमिकेशी ठाम रहात असल्याने प्रशासनाचा डोकीदुखीचा विषय ठरत आहे.

Web Title: Growth of development in four villages of Miraj, political struggle by directly selecting the sarpanch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.