वाळव्यात गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट-परिसर हादरला : प्रापंचिक साहित्य, रोख रक्कम जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 11:47 PM2019-02-14T23:47:59+5:302019-02-14T23:50:18+5:30

वाळवा येथील क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा श्रमिकनगर (बाराबिगा) हा परिसर गुरूवारी सहा गॅस सिलिंडरच्या स्फोटांनी हादरून गेला. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नसली तरी, प्रापंचिक साहित्य, दागिने

 Gas Cylinder scorched by the explosion in the dump: Prakantik Sahitya, cash amount burnt | वाळव्यात गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट-परिसर हादरला : प्रापंचिक साहित्य, रोख रक्कम जळून खाक

वाळव्यात गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट-परिसर हादरला : प्रापंचिक साहित्य, रोख रक्कम जळून खाक

Next
ठळक मुद्देमदतकार्याने जीवितहानी टळली

वाळवा : वाळवा येथील क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा श्रमिकनगर (बाराबिगा) हा परिसर गुरूवारी सहा गॅस सिलिंडरच्या स्फोटांनी हादरून गेला. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नसली तरी, प्रापंचिक साहित्य, दागिने आणि रोख रक्कम जळून खाक झाली.परिसरातील २0 घरे व २४ कुटुंबांचे तब्बल ६७ लाख ६९ हजार रूपयांचे नुकसान झाले. आग आटोक्यात आणण्यासाठी माळभाग, बाराबिगा व हुतात्मा संकुलाच्या कार्यक र्त्यांनी प्रयत्न केले. स्फोटानंतर घटनास्थळी प्रचंड भीती, गोंधळ व धावपळ उडाली होती.

गंगूबाई प्रकाशे यांच्या घरी प्रथम गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. हा स्फोट गॅस गळतीने झाला, असा प्राथमिक अंदाज वर्तविला गेला. या घरातील सर्वजण मजुरीसाठी सकाळी बाहेर पडले होते. स्फोट झाला तेव्हा घराच्या छताचे दोन पत्रे फाटून, उडून नजीकच्या घराच्या छतावर पडले. या स्फोटानंतर आग भडकली. त्यामुळे उत्तरेकडील व पश्चिमेकडील जवळची घरे पेटत गेली. याचदरम्यान पुन्हा शिवाजी चिखले, दशरथ शंकर करांडे, पांडुरंग डांगे, काकासाहेब लोखंडे यांच्या घरातील गॅस सिलिंडरचे स्फोट झाले. सलग सहा सिलिंडरचे स्फोट झाल्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. यातूनही माळभाग वाळवा येथील आहेर गल्ली, हुतात्मा बझारचे कामगार, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, बाराबिगा येथील नागरिक आणि ग्रामस्थ यांनी नजीकच्या प्रत्येक घरात घुसून सर्व घरांच्या वस्तीमधील गॅस सिलिंडर बाहेर काढून दूरवर नेऊन ठेवले. दरम्यान, वाळवा हुतात्मा साखर कारखाना व इस्लामपूर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांनी आग आटोक्यात आणली. तोपर्यंत २0 घरे आगीत जळून खाक झाली होती.

या आगीत नीलाबाई बनसोडे, गंगूबाई प्रकाशे, गंगूबाई बनसोडे, शिवाजी लोखंडे, शिवाजी चिखले, पोपट कंबार, श्रीमंत करांडे, मीलन मुल्ला, मालन कांबळे, ईश्वर करांडे, लक्ष्मण यमगर, गंगाराम यमगर, दशरथ करांडे, भागवत करांडे, म्हाळसाबाई लोखंडे, पांडुरंग डांगे, आण्णाप्पा डांगे, म्हारू तांबे, बिरू कारंडे, शिवराम करांडे, शिवाजी चिखले, धोंडीराम लोखंडे, मरगाबाई करांडे, काकासाहेब लोखंडे, शंकर करांडे यांच्या घरावरील छत, पत्रे, साहित्य, संसारोपयोगी सर्व धान्य, भांडी, कपडे, अंथरूण, पांघरून, टीव्ही, पलंग, गाद्या, तसेच पांडुरंग डांगे यांनी घराच्या बांधकामासाठी घरी ठेवलेली दोन लाख रूपये रोख रक्कम, इतर घरांतील पाच-पंचवीस हजार रूपये रोख रक्कम, दागिने आगीत जळून खाक झाले आहे. आग आटोक्यात आल्यानंतर घरातील साहित्याची राख पाहून अनेकांच्या डोळ््यात अश्रू उभे राहिले.

महिला जखमी : इस्लामपूरमध्ये उपचार
गंगूबाई प्रकाशे यांच्या घरी गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने, त्याच्या धक्क्याने जवळील घरातील सुगंधा यमगर या बेशुध्द पडल्या. त्यांना प्रकाश हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ इस्लामपूरला दाखल करण्यात आले. मीलन मुल्ला यांच्या ३५ वर्षे वयाच्या अपंग मुलीच्या डोक्याचे केस आगीत जळाले आहेत. तसेच एक म्हैस होरपळली, तर रेडी ठार झाली.
 

तलाठी, मंडल अधिकाऱ्यांकडून पंचनामा
जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती प्राचार्या डॉ. सुषमा नायकवडी, हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी, उपसभापती नेताजी पाटील, चंद्रशेखर शेळके, गौरव नायकवडी, ग्रामपंचायत सदस्य, वर्धमान मगदूम, मिलिंद थोरात, वाल्मिक कोळीसह इसाक वलांडकर यांनी भेट दिली व सूचना केल्या. तलाठी अरुण पवार, मंडल अधिकारी विनायक यादव यांनी पंचनामा केला. सरपंच शुभांगी माळी, उपसरपंच पोपट अहिर यांनी पंचनाम्याबाबत सर्वांना सहकार्य व जळीतग्रस्तांना मदत केली.
 

गॅस सिलिंडर स्फोटाच्या आगीत जळून नुकसान झालेल्या २४ कुटुंबांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची आर्थिक मदत हुतात्मा साखर कारखान्याने दिली.

या कुटुंबातील रेशनकार्ड, जातीचे दाखले व अन्य दाखले, कागदपत्रे जळाल्याने ते नवीन देण्याचे आणि अतितातडीने या लोकांचे घरकुल प्रस्ताव प्रथम देण्याचे काम ग्रामपंचायतीतर्फेे करण्यात येणार आहे, अशी माहिती सरपंच डॉ. सौ. शुभांगी माळी व डॉ. अशोक माळी यांनी दिली.

हुतात्मा साखर कारखान्याच्यावतीने २४ कुटुंबातील सर्वांना सकाळी, दुपारी, सायंकाळी जेवण, नाष्टा, चहा याची चार दिवसांची सर्व सोय करण्यात आली.

ग्रामपंचायतीच्यावतीने गावातील प्रत्येक रेशनिंग दुकानामार्फत या लोकांना तातडीने प्रत्येक कुटुंबाला २0 किलो धान्याची मदत केली आहे. चरापले गॅस एजन्सीकडून प्रत्येक कुटुंबाला शेगडी व गॅस सिलिंडर पंचनामा करून देण्याचे ठरले. सह्याद्री गौरव फौंडेशनकडून कपडे, ग्रामपंचायतीकडून चादरींचे वाटप करण्यात आले.


काय घडले,
कसे घडले...

1गंगूबाई प्रकाशे यांच्या घरी प्रथम गॅस सिलिंडरचा स्फोट

2उत्तरेकडील व पश्चिमेकडील जवळची घरे पेटत गेली. सलग सहा सिलिंडरचे स्फोट झाल्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले.
3घराच्या छताचे दोन पत्रे फाटून, उडून नजीकच्या घराच्या छतावर पडले. या स्फोटानंतर आग भडकली.

4परिसरातील २0 घरे व २४ कुटुंबांचे तब्बल ६७ लाख ६९ हजार रूपयांचे नुकसान झाले.

Web Title:  Gas Cylinder scorched by the explosion in the dump: Prakantik Sahitya, cash amount burnt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली