म्हैसाळ भ्रूणहत्या अहवालाचा फार्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 11:58 PM2018-12-02T23:58:13+5:302018-12-02T23:58:17+5:30

मिरज : म्हैसाळ येथे भ्रूणहत्या केंद्र चालविणाऱ्या डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याच्या चौकशीसाठी नियुक्त समितीने शासनाला सादर केलेल्या अहवालात समाजप्रबोधन, ...

Fresher of Feminine Report | म्हैसाळ भ्रूणहत्या अहवालाचा फार्स

म्हैसाळ भ्रूणहत्या अहवालाचा फार्स

googlenewsNext

मिरज : म्हैसाळ येथे भ्रूणहत्या केंद्र चालविणाऱ्या डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याच्या चौकशीसाठी नियुक्त समितीने शासनाला सादर केलेल्या अहवालात समाजप्रबोधन, गर्भपातावरील औषध विक्री व वितरणावर निर्बंध, प्रत्येक गावातील गर्भवती महिलांचे निरीक्षण, महिलांना शासकीय मदत अशा उपाययोजनांची शिफारस केली आहे. डॉ. खिद्रापुरे प्रकरणात सहभागी अन्य डॉक्टरांविरुध्द कारवाईऐवजी किरकोळ शिफारशी करून समितीने हे प्रकरण गुंडाळले आहे. शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांच्या कार्यतत्परतेमुळे स्त्री-भ्रूणहत्येचे प्रकरण उघडकीस आल्याचा दावा चौकशी अहवालात करण्यात आला आहे.
मणेराजुरी येथील स्वाती जमदाडे या विवाहितेचा अनैसर्गिक गर्भपात करताना तिचा मृत्यू झाल्याने दोन वर्षापूर्वी म्हैसाळ येथील डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याचा कत्तलखाना उघडकीस आला होता. डॉ. खिद्रापुरे याने पुरलेले १९ भ्रूण सापडल्याने राज्यात खळबळ उडाली. मंत्री पंकजा मुंडे, दीपक केसरकर, सदाभाऊ खोत यांनी म्हैसाळ येथे भेट देऊन अवैध गर्भपातप्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची घोषणा केली होती. या प्रकरणाच्या चौकशीसाठी आरोग्य विभागाने मिरज वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली अप्पर जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, सदस्य डॉ. मधुसूदन कर्नाटकी, वरिष्ठ सल्लागार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागाच्या अध्यापक डॉ. विद्या मुळे, पोलीस उपअधीक्षक प्रा. डॉ. दीपाली काळे, अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त विद्याधर जावडेकर या पाचजणांची चौकशी समिती १५ मार्च २०१७ रोजी नियुक्त केली होती. या समितीने डॉ. खिद्रापुरे याने केलेल्या अवैध गर्भपात प्रकरणाची चौकशी करून आरोग्य विभागास २५ जुलै २0१७ रोजी सादर केलेल्या अंतिम अहवालात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी व भविष्य काळात स्त्री-भ्रूणहत्या रोखण्यासाठी तात्काळ व दीर्घकालीन स्तरावर करण्यात येणाºया उपाययोजना सुचविल्या आहेत.
श्रीमती स्वाती प्रवीण जमदाडे यांचा मृत्यू गर्भपात करताना झालेल्या हलगर्जीपणामुळे झाला असल्याचे समितीच्या निदर्शनास आले; मात्र शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांच्या कार्यतत्परतेमुळे स्त्री-भ्रूणहत्येचे प्रकरण उघडकीस आले, असे त्यांनी म्हटले आहे.
खिद्रापुरे याला वारंवार फक्त नोटिसा बजावण्यात आल्या; मात्र प्रत्यक्ष कोणतीच ठोस कारवाई करण्यात आली नाही, असे अहवालात म्हटले असले तरी, याबाबत कोणावरही कारवाईची शिफारस न करता खिद्रापुरे याची होमिओपॅथिक कौन्सिलकडील नोंदणी कायमस्वरुपी रद्द करावी, असे म्हटले आहे. गर्भपातासाठी वापरले जाणारे औषध तज्ज्ञ डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध विक्रेत्याने देणे गुन्हा ठरवावा, औषधे घेणाºया रुग्णाचे नाव छायाचित्र असलेल्या ओळखपत्राची प्रत घेऊन औषध दुकानदाराने याची संपूर्ण नोंद संगणकावर ठेवणे बंधनकारक करावे, बोगस, बेकायदा गर्भपात करणारी रुग्णालये व गर्भलिंगनिदान केंद्राबाबत माहिती देणाºया तक्रारदारास ५० हजार बक्षीस द्यावे व मोहिमेत सहभागी गर्भवती महिलांना पाच लाख रुपये द्यावेत, गर्भपातासाठी वापरात येणाºया औषधांची वाहतूक करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून परवानगी घ्यावी यासह प्रबोधनाच्या शिफारसी या अहवालात करण्यात आल्या आहेत.
सांगली-मिरजेतील ११ डॉक्टरांचा राबता
डॉ. खिद्रापुरे याच्या नोंदवहीत काही खासगी डॉक्टरांना धनादेशाव्दारे पैसे देत असल्याचे व त्याच्या रुग्णालयात सांगली व मिरजेतील ११ डॉक्टर्स येत असल्याचे चौकशीत आढळले आहे. मात्र अशा डॉक्टरांवर कारवाईऐवजी खासगी रुग्णालयात सेवा देणाºया डॉक्टरांनी आपल्या रजिस्ट्रेशनचा गैरवापर अन्य खासगी रुग्णालयास देण्याची पध्दत बंद करावी, असे आयएमए या वैद्यकीय संघटनेस कळविण्याची सूचना अहवालात करण्यात आली आहे. माहिती अधिकारात चौकशी अहवाल मिळवणारे प्रितेन आसर यांनी या प्रकरणात आढळलेल्या डॉक्टरांवर कारवाईची मागणी केली.
प्रकरण उघडकीस आले नसते तर...
स्वाती जमदाडे या महिलेच्या मृत्यूनंतर नातेवाईकांच्या तक्रारीमुळे डॉ. खिद्रापुरे याचे अवैध गर्भपात केंद्र उघडकीस आले. मात्र शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाºयांनी निदर्शनास आणले नसते तर, हे प्रकरण उघडकीस आले नसते व गर्भपाताची साखळी पुढे तशीच चालू राहिली असती, असा दावा चौकशी समितीने अहवालात केला आहे.

Web Title: Fresher of Feminine Report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.