काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा - कर्नाटक निकालामुळे भाजपला बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 12:01 AM2018-05-17T00:01:22+5:302018-05-17T00:01:22+5:30

The danger for the Congress-NCP boom - BJP's strength due to the removal of Karnataka | काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा - कर्नाटक निकालामुळे भाजपला बळ

काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा - कर्नाटक निकालामुळे भाजपला बळ

Next
ठळक मुद्दे‘इनकमिंग’च्या हालचाली गतिमान; महापालिका निवडणुकीचे चित्र

शीतल पाटील ।
सांगली : कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीकडे महापालिका क्षेत्रातील सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले होते. कर्नाटकात भाजपने मुसंडी मारल्याने आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससाठी धोक्याची घंटा ठरली आहे; तर हा निकाल भाजपचे नेते व कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढविणारा आहे. महिन्याभरापासून भाजपमधील इनकमिंगलाही ब्रेक लागला होता. विशेषत: राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी आमदार जयंत पाटील यांची निवड झाल्यानंतर राजकीय वातावरणातही बदल झाला होता, पण कर्नाटक निकालाने काँग्रेस व राष्ट्रवादीच्या मनसुब्यावर पाणी फिरविले असून, भाजपला रोखण्यासाठी दोन्ही पक्षांना रणनीती आखावी लागणार आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेलगत असलेल्या सांगली जिल्ह्याच्या सीमावर्ती भागाशी दररोजचा संपर्क आहे. त्यात जिल्ह्यातील एकमेव महापालिका काँग्रेसच्या ताब्यात असल्याने कर्नाटक निवडणूक निकालाचा महापालिकेच्या निवडणुकीवर काय परिणाम होईल, याचा अंदाज राजकीय नेतेमंडळी घेत होती. त्यातच महिन्यापासून दोन डझन आजी-माजी नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. काही विद्यमान नगरसेवकांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत उघड चर्चाही केली. त्यात काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचे नगरसेवक होते. सांगलीतील नगरसेवकांत मात्र अद्याप भाजप प्रवेशाबाबत द्विधा मनस्थिती होती. अशातच राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांची निवड झाल्याने पक्षातील आऊटगोर्इंगला बऱ्यापैकी ब्रेक लागला होता.
जयंत पाटील यांनी नाराज नगरसेवकांशी संपर्क साधून त्यांच्याशी चर्चाही सुरू केली होती. दोन दिवसांपूर्वी इस्लामपूर येथे काही प्रमुख पदाधिकाºयांना बोलावून निवडणुकीच्या रणनीतीवर त्यांनी चर्चा केली, पण साºयांचेच लक्ष कर्नाटक निकालाकडे लागले होते. अखेर कर्नाटकमध्ये भाजपने सर्वाधिक जागा जिंकत काँग्रेसला मोठा धक्का दिला. या निकालाचा महापालिकेच्या निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यताही आहे. सांगली, मिरजेत बºयापैकी कर्नाटकमधून रोजगारानिमित्त आलेले लोक वास्तव्य करून आहेत. कर्नाटकची निवडणूक लिंगायत समाजाच्या अवतीभोवती लढली गेली. महापालिका हद्दीत काही प्रभागात लिंगायत समाजाची मते निर्णायक ठरू शकतात. त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न भाजप करेल. कर्नाटकातील निकालाने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणीत वाढ केली आहे. राष्ट्रवादीने समविचाराशी पक्षांशी आघाडी करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. पण त्याला अद्याप काँग्रेसमधून म्हणावा तितका प्रतिसाद मिळालेला नाही. उलट काँग्रेसमधील एका गटाच्या नेत्याकडून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर टीकेची झोड उठविली जात आहे. निवडणुका तोंडावर असताना एकमेकांवर चिखलफेक केली जात आहे.
काँग्रेसमधील दुसरा गट राष्ट्रवादीशी आघाडी करण्याबाबत अनुकूल असला तरी, जागा वाटपाचा तिढा वाढणार आहे. तसेच पहिल्या गटाकडूनही त्रास होण्याचा संभव आहे. एकूणच महापालिका निवडणुकीत काँग्रेस गटबाजीत अडकून पडणार आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीतील संजय बजाज-कमलाकर पाटील संघर्ष सध्या तरी थांबला असल्याचे दिसत आहे. पण ऐन निवडणुकीत राष्ट्रवादीतही जागा वाटप कळीचा मुद्दा ठरणार आहे. भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. पण त्यांचेही लक्ष कर्नाटकच्या निकालाकडे लागले होते. आता कुंपणावरील इच्छुक भाजपमध्ये उडी घेतील. त्यात या निकालाने भाजप नेत्यांचे व कार्यकर्त्यांचे आत्मबळही वाढले आहे. त्याचा फायदा महापालिका निवडणुकीत भाजपला होऊ शकतो.

प्रचाराच्या महिन्यात : ठरतो निकाल
महापालिकेच्या आजपर्यंतच्या निवडणुकांचा इतिहास पाहता, शेवटचा महिना महत्त्वाचा ठरला आहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून मतदान होईपर्यंतच्या काळात जो पक्ष प्रचारात आघाडी घेतो, तोच महापालिकेत सत्तेवर येतो, हा पूर्वानुभव आहे. २००८ च्या निवडणुकीत जयंत पाटील यांनी अगदी शेवटच्या क्षणाला महाआघाडी स्थापन केली. सर्व पक्षांना, नेत्यांना एकत्र करून प्रचारात आघाडी घेत महापालिकेची सत्ता काबीज केली. २०१३ च्या निवडणुकीत महाआघाडीच्या काळात कोट्यवधी रुपयांची विकासकामे होऊनही जनतेने मदनभाऊंकडे सत्ता सोपविली. विशेष म्हणजे तत्पूर्वी पाच वर्षे मदनभाऊ राजकीय विजनवासात गेले होते. त्यामुळे प्रचाराच्या शेवटच्या महिन्यात आघाडीवर असलेला पक्षच आजअखेर सत्ताधीश बनला आहे.

कर्नाटक निकालाने आघाडीचा पर्याय
कर्नाटकात भाजपला बहुमत मिळाले नसले तरी, सर्वाधिक जागा जिंकत काँग्रेसला धक्का दिला. काँग्रेसचा पराभव झाला असला तरी, मतांच्या टक्केवारीत मात्र काँग्रेसने भाजपवर मात केली आहे. काँग्रेसला ३८ टक्के, तर भाजपला ३६ टक्के मते कर्नाटकात मिळाली, तर जनता दल (ध) ला १८ टक्के मते मिळाली आहे. याच गणितावर आता महापालिका क्षेत्रात भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीसमोर आघाडीचाच पर्याय असल्याचे एका नेत्याने सांगितले. महापालिका हद्दीत काँग्रेसची हक्काची मतपेढी आहे. राष्ट्रवादीलाही मध्यंतरी जनाधार मिळाला होता. भाजपच्या नेत्यांना राज्य व केंद्रातील सत्ता, लाटेचा मोठा आधार आहे. धर्मनिरपेक्ष मते एकत्र आली तर भाजपला रोखता येईल. त्यात फाटाफूट झाल्यास मात्र भाजपला फायदाच झाल्याचे चित्र निवडणुकांतून दिसून आले आहे, असेही काहींचे मत आहे.

Web Title: The danger for the Congress-NCP boom - BJP's strength due to the removal of Karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.