तडजोडीच्या बळामुळे टवाळखोर निर्ढावले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2016 12:41 AM2016-05-08T00:41:52+5:302016-05-08T00:41:52+5:30

बोरगावचा आत्मकेंद्रीपणा : मसुचीवाडीतील दुफळी चिंताजनक

Confirmation of tie-up due to compromise ... | तडजोडीच्या बळामुळे टवाळखोर निर्ढावले...

तडजोडीच्या बळामुळे टवाळखोर निर्ढावले...

Next

इस्लामपूर : शालेय मुलींच्या छेडछाडीवरून सुरू झालेला मसुचीवाडी आणि बोरगाव या वाळवा तालुक्यातील लगतच्या गावातील वाद आता पोलिसांच्या दारात पोहोचला आहे. गेल्या दोन वर्षांपासून स्थानिक पातळीवरील नेत्यांसमोर तडजोडीचे प्रयत्न होऊन अशा घटनांवर पांघरूण घातले जायचे. त्यामुळे या तडजोडीचे बळ टवाळखोरांना मिळाले आणि खुलेआम छेडछाडीला सुरुवात झाली. शेवटी त्रासलेल्या मसुचीवाडीकरांनी टोळक्याची धुलाई केली. त्यावर निर्ढावलेल्या टोळक्याने मसुचीवाडीतील एकास बेदम चोप देऊन पुन्हा आव्हान दिले. शेवटी ग्रामसभा घेऊन हा वादाचा विषय पुन्हा ऐरणीवर आला.
बोरगाव आणि त्याखालील पाच वाड्या असा या परिसराचा पसारा. मसुचीवाडी, गौंडवाडी, साटपेवाडी, बनेवाडी आणि फार्णेवाडी अशा या छोट्या-छोट्या वाड्या आणि या सर्व वाड्यांचे सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय पितृत्व करणारे बोरगाव हे गाव. ही सगळी गावे कृष्णा नदीकाठी असल्याने ओघाने सुबत्ता आलीच. ५० वर्षांपूर्वी हिंदमाता शिक्षण मंडळाच्या रूपाने शिक्षणाची व्यवस्था सुरू झाली. सध्या या शिक्षण मंडळाचे अध्यक्षपद हे मसुचीवाडीचे माजी सरपंच व ज्येष्ठ नेते दत्तूआप्पा खोत यांच्याकडे आहे.
बोरगावात एक महाविद्यालय आणि दोन माध्यमिक विद्यालये असल्याने आजूबाजूच्या वाड्यांमधील मुले-मुली शिक्षणासाठी बोरगावमध्ये येतात. काळाच्या ओघात परिस्थितीही बदलत गेली. शहरी जीवनशैलीकडे ओढा वाढला आणि त्यातूनच मग या टपोरेगिरीचा धागाही परिसरात आपसुकच विणला गेला. मुडदे पाडण्यापर्यंतची गुंडगिरी बोरगावला नवी नाही. मात्र ग्रामीण ढाच्याच्या पारंपरिक जीवनशैलीत छेडछाडीला अथवा महिला, मुलींविषयक आगळीकीला मात्र स्थान नव्हते. अलीकडे छोट्या-मोठ्या टोळ्क्यांचा स्वैराचार वाढला. घरातूनच पाठबळ मिळत असल्याने भान हरवलेली ही टोळकी वासनांध बनली. ज्या-ज्यावेळी छेडछाडीबाबत मुलींच्या तक्रारी आल्या, त्यावेळी बोरगावातील स्थानिक नेतेमंडळी संबंधित युवकाला ताकीद द्यायचे आणि या प्रकाराला पांघरूण घातले जायचे. त्यामुळे पोलिसांपर्यंत तक्रार कधी गेलीच नाही. त्यानंतर आठ-पंधरा दिवसांनी पुन्हा तोच प्रकार सुरू राहिल्याने अशा तडजोडीचे बळ या टवाळखोरांना मिळत गेले. या परिस्थितीला मसुचीवाडीमधील अंतर्गत राजकीय दुफळीची किनारही आहे. (वार्ताहर)
ग्रामस्थांचा पुढाकार : प्रश्न ऐरणीवर
पंधरा दिवसांपूर्वी मसुचीवाडीतील एका मुलीची बोरगाव बसस्थानक परिसरात छेड काढल्यावर या टोळक्यातील काहीजण हनुमान यात्रेनिमित्त तमाशा बघायला मसुचीवाडीत गेले. तेथेही या बोरगावच्या टोळक्याकडून कुरापती सुरू राहिल्याने मसुचीवाडी ग्रामस्थांनी या टोळक्याला बदडून काढले. त्यानंतर या मारहाणीचा वचपा बोरगावकरांनी लगेच मसुचीवाडीतील एका युवकास चोप दिला. त्यानंतर हा प्रकार छेडछाडीच्या स्वरूपात पोलिसांसमोर आला. मसुचीवाडी ग्रामस्थांनी विशेष ग्रामसभा घेत मुलींच्या छेडछाडीचा प्रश्न ऐरणीवर आणला. त्यानुसार आता पोलिसांची कारवाई सुरू झाली आहे.
भूमाता ब्रिगेड मसुचीवाडीमध्ये धडकणार
शनिशिंगणापूर, त्र्यंबकेश्वर, कोल्हापूरची महालक्ष्मी अशा मंदिरांमध्ये महिलांच्या प्रवेशासाठी झगडून यश मिळवणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यासुद्धा मसुचीवाडीत भेट देऊन मुलींवरील अन्यायाविरुद्धच्या लढाईत उतरणार असल्याची चर्चा आहे.
 

बोरगाव हे चांगले गाव आहे. त्यामुळे अशा टवाळखोरांना गावाचा पाठिंबा असू शकत नाही. मुलींची छेड काढली जाते, हे कायदा व सुव्यवस्थेला शोभणारे नाही. मुलींना त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याची कार्यवाही पोलिसांकडून सुरू आहे. लवकरच ते बोरगावातील गावगुंडांचा बंदोबस्त करतील.
- जयंत पाटील, आमदार
 

मसुचीवाडीतील मुली गेल्या दोन वर्षापासून हा त्रास सोसत आहेत. टवाळखोरांना अटकाव करण्यात बोरगावच्या पदाधिकाऱ्यांना यश आले नाही. हा त्रास वाढतच राहिल्याने आम्ही मुलींना तेथील शाळा, महाविद्यालयातून काढण्याचा तसेच सर्व निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी याप्रकरणी ठोस कारवाई करून या छेडछाडीला कायमस्वरुपी आळा घालावा.
- सुहास कदम, सरपंच, मसुचीवाडी
बोरगावला सामाजिक, सांस्कृतिक ओळख आहे. एका-दोघांमुळे गावाची बदनामी करणे हे योग्य नाही. परिसरातील पाचही वाड्यांना टोकाची भूमिका घेण्यापेक्षा सामोपचाराने चर्चा करून मुलींना त्रास होणार नाही, यावर मार्ग काढता येईल.
-विकास पाटील, उपसरपंच, बोरगाव

Web Title: Confirmation of tie-up due to compromise ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.