‘लोकमत’च्या सांगली आवृत्तीचा सोमवारी वर्धापनदिन

By admin | Published: February 13, 2015 10:30 PM2015-02-13T22:30:18+5:302015-02-13T22:59:02+5:30

स्नेहमेळाव्याचे आयोजन : विश्वंभर चौधरी यांचे व्याख्यान

Anniversary on the Sangli version of 'Lokmat' on Monday | ‘लोकमत’च्या सांगली आवृत्तीचा सोमवारी वर्धापनदिन

‘लोकमत’च्या सांगली आवृत्तीचा सोमवारी वर्धापनदिन

Next

सांगली : वाचकांच्या पाठबळावर प्रेम, जिव्हाळा आणि विश्वासार्हतेची परंपरा जपत सांगली जिल्ह्यात ‘लोकमत’ची दमदार वाटचाल सुरू आहे. स्नेहाचा हा झरा अखंड वाहता रहावा, यासाठी ‘लोकमत’ सांगली आवृत्तीच्या सोळाव्या वर्धापनदिनानिमित्त सोमवारी (दि. १६ फेब्रुवारी) स्नेहमेळाव्याचे आयोजन केले आहे. यावेळी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विश्वंभर चौधरी यांचे ‘महासत्ता भारत की आनंदी भारत’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.
‘लोकमत’च्या दमदार वाटचालीत वाचक, हितचिंतक, वृत्तपत्र विक्रेते, एजंट, जाहिरातदार व समाजातील प्रत्येकाने प्रेमाचा वर्षाव केला आहे. या जिव्हाळ्याचे बंध आणखी दृढ व्हावेत, या उद्देशाने सोमवारी (दि. १६) स्नेहमेळाव्याचे आयोजन केले आहे. माधवनगर रस्त्यावरील डेक्कन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन हॉल (आरटीओ कार्यालयाशेजारी) येथे सायंकाळी हा स्नेहमेळावा होणार आहे. यंदाच्या सोळाव्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विश्वंभर चौधरी यांचे ‘महासत्ता भारत की आनंदी भारत’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. स्नेहमेळाव्याच्या ठिकाणीच सायंकाळी पाच वाजता व्याख्यान होईल. निरपेक्ष वृत्तीने जपलेल्या नीतीमूल्यांचा आदर केल्यामुळेच वाचकांच्या मनाचा ठाव घेण्यात आणि यशाचे उत्तुंग शिखर गाठण्यात ‘लोकमत’ परिवार यशस्वी ठरला आहे. कृष्णा-वारणाकाठच्या संपन्न परंपरेप्रमाणे प्रेमाने समृद्ध झालेला हा परिवार नवचैतन्य, उत्साहानिशी नव्या वाटचालीस सज्ज झाला आहे. या वाटचालीत सर्वांच्या प्रोत्साहनाची आवश्यकता वाटते, म्हणूनच वर्धापनदिनाचा मुहूर्त साधत ‘लोकमत’ परिवाराने स्नेहमेळाव्याचे आयोजन केले आहे. प्रत्येक क्षेत्रातील घटकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन ‘लोकमत’ परिवाराच्यावतीने केले आहे. (प्रतिनिधी)


‘मेक इन सांगली’ विशेषांक
वर्धापनदिनानिमित्त ‘मेक इन सांगली’ हा विशेषांक प्रकाशित करण्यात आला असून, त्यातून जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक, उद्योग, आरोग्य, कृषी, शैक्षणिक, शहर सुधार आदी क्षेत्रातील वाटचाल, भविष्यातील चित्र यावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. जिल्ह्याचे बदलते रूप आणि अपेक्षांचा ऊहापोह याद्वारे करण्यात आला आहे. दि. १४, १५ व १६ फेब्रुवारी असे सलग तीन दिवस हा विशेषांक वाचकांना दिला जाणार आहे.

Web Title: Anniversary on the Sangli version of 'Lokmat' on Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.