सांगलीतील खूनप्रकरणी  १३ हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 01:17 PM2019-04-12T13:17:26+5:302019-04-12T13:17:55+5:30

येथील शंभरफुटी रस्त्यावरील गुलाब कॉलनीतील महेश नाईक या तरुणाच्या खूनप्रकरणी १३ हल्लेखोरांविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील चौघांना गुरुवारी सकाळी अटक करण्यात आली.

13 accused in Sangli murder case | सांगलीतील खूनप्रकरणी  १३ हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा

सांगलीतील खूनप्रकरणी  १३ हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा

googlenewsNext
ठळक मुद्देरुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना नाईकचा मृत्यू

सांगली : येथील शंभरफुटी रस्त्यावरील गुलाब कॉलनीतील महेश नाईक या तरुणाच्या खूनप्रकरणी १३ हल्लेखोरांविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील चौघांना गुरुवारी सकाळी अटक करण्यात आली. त्रिमूर्ती कॉलनीत बुधवारी रात्री साडेनऊ वाजता ही घटना घडली होती. पूर्ववैमनस्यातूनच हा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या पार्टीमध्ये नाईक याचा खून झाला होता. या पार्टीला दोन नगरसेवक व पोलिसांनीही हजेरी लावली होती. 

अटक केलेल्यांमध्ये सचिन विजय डोंगरे (वय २७), सुरेश श्रीकांत शिंदे (२३), प्रवीण अशोक बाबर (२५, तिघेही रा. गुलाब कॉलनी) व प्रशांत दुंडाप्पा सुरगाडे (२९, भगतसिंग शाळेजवळ, हनुमाननगर, सांगली) यांचा समावेश आहे. तसेच गोपाळ पुजारी, सागर महानूर, रियाज किरजगी, मारुती शिंदे, राज पाटील, सुशांत कदम व दोन अनोळखी यांच्याविरुद्धही खून व खुनाचा प्रयत्न, असे गुन्हे दाखल आहेत. अटकेच्या भीतीने हे सर्वजण पसार झाले आहेत. त्यांच्या शोधासाठी दोन पथके रवाना केली असल्याचे पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांनी सांगितले. 

गतवर्षी महेश नाईक व संशयित प्रवीण बाबर हे एका बारशाच्या कार्यक्रमास एकत्रित आले होते. बाबर हा ‘जॉय’ ग्रुपचा सदस्य आहे. या ग्रुपची प्रचंड दहशत आहे. बारशाच्या कार्यक्रमात नाईक व बाबर यांच्यात किरकोळ कारणावरुन वाद झाला होता. त्यावेळी नाईक याने बाबरला शिवीगाळ करून मारहाणही केली होती. तेव्हापासून ग्रुपचे सदस्य त्याच्यावर चिडून होते. गुरुवारी रात्री गुराप्पा मेस्त्री यांचा वाढदिवस होता. यासाठी त्रिमूर्ती कॉलनीत पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला नाईक व जॉय ग्रुपचे सदस्य आले होते. दोन नगरसेवक व विश्रामबाग पोलीस ठाण्यातील दोन पोलीसही आले होते.

नाईक व ग्रुपचे सदस्य आमने-सामने आले. एकमेकांकडे रागाने पाहण्याच्या कारणावरुन त्यांच्यात पार्टीमध्येच वाद सुरू झाला. यावेळी उपस्थित नगरसेवक व पोलिसांनी मध्यस्थी करुन वाद मिटविला. त्यानंतर सर्वजण बिर्याणीवर ताव मारत होते. तेवढ्यात ग्रुपच्या सदस्यांनी नाईक याच्यावर अंधारात चाकूने हल्ला चढविला. त्याचा मित्र गणेश चन्नाप्पा बबलादी (२५, प्रगती कॉलनी, शंभरफुटी रस्ता, सांगली) याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण संशयितांनी त्याच्यावरही जीवघेणा हल्ला केला होता. दोघांना उपचारार्थ शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना नाईकचा मृत्यू झाला.

पत्नीचा आक्रोश
नाईकचा सहा महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. त्याची पत्नी मुंबई पोलीस दलात पोलीस शिपाई आहे. पतीचा अपघात झाला आहे, असे सांगून त्यांना बोलाविण्यात आले; पण शववाहिका पाहून त्यांनी आक्रोश सुरू केला. नातेवाईकांनी त्यांना धीर दिला. घटनेनंतर हनुमाननगर, त्रिमूर्ती कॉलनीत बंदोबस्त तैनात केला होता. पहाटे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

Web Title: 13 accused in Sangli murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.