शिवाजी विद्यापीठाच्या खानापूर उपकेंद्रासाठी १०० कोटींचा निधी, उपमुख्यमंत्र्यांचे कार्यवाहीचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 04:39 PM2024-02-23T16:39:22+5:302024-02-23T16:40:43+5:30

वैभव पाटील यांचा पाठपुरावा 

100 crore fund for Shivaji University Khanapur sub centre, Deputy Chief Minister order for action | शिवाजी विद्यापीठाच्या खानापूर उपकेंद्रासाठी १०० कोटींचा निधी, उपमुख्यमंत्र्यांचे कार्यवाहीचे आदेश

शिवाजी विद्यापीठाच्या खानापूर उपकेंद्रासाठी १०० कोटींचा निधी, उपमुख्यमंत्र्यांचे कार्यवाहीचे आदेश

विटा : शिवाजी विद्यापीठाचे खानापूर येथे उपकेंद्र होण्यासाठी विद्यापीठ स्तरावर सर्व प्रक्रिया व ठराव मंजूर झाले असून, दिलेल्या प्रस्तावानुसार या उपकेंद्रसाठी १०० कोटी रुपयांची तरतूद तत्काळ करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व शिवाजी विद्यापीठाचे सिनेट सदस्य ॲड. वैभव पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. या मागणीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा निधी तत्काळ मंजूर करण्याचे आदेश दिले. ॲड. वैभव पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे खानापूर उपकेंद्रासाठी लवकरच १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे सुरू व्हावे, यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेत ॲड. पाटील यांनी ठराव मांडून मंजुरी घेतली होती. त्यानंतर खानापूर येथील जागेची पाहणी करून जागा निश्चिती व जागेचा मॅनेजमेंट कौन्सिलमध्ये ठराव मंजूर करून घेतला.

त्यानंतर गुरुवारी या उपकेंद्रासाठी १०० कोटींच्या आर्थिक तरतुदीसाठी मुंबई येथील मंत्रालयातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात माजी आमदार ॲड. सदाशिवराव पाटील, जिल्हाध्यक्ष ॲड. वैभव पाटील, अविनाश चोथे यांच्यासह संबंधित विभागाची बैठक झाली.

यावेळी ॲड. वैभव पाटील यांनी खानापूर उपकेंद्रासाठी विद्यापीठ स्तरावर सर्वप्रक्रिया पूर्ण झाली आहे. जागा निश्चितीही झाली असून, त्यासाठी आता १०० कोटींची तातडीने तरतूद करण्याची मागणी अजित पवार यांच्याकडे केली. त्यावेळी अजित पवार यांनी याबाबत सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी खानापूर उपकेंद्रासाठी तत्काळ १०० कोटींचा निधी मंजूर करण्याचे आदेश दिले. त्यामुळे खानापूर येथे नव्याने होणाऱ्या शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

Web Title: 100 crore fund for Shivaji University Khanapur sub centre, Deputy Chief Minister order for action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.