पंचायत राज समितीचे रिकाम्या हंड्यांनी स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 12:14 AM2018-04-28T00:14:08+5:302018-04-28T00:14:08+5:30

Welcome to the empty wings of Panchayat Raj Samiti | पंचायत राज समितीचे रिकाम्या हंड्यांनी स्वागत

पंचायत राज समितीचे रिकाम्या हंड्यांनी स्वागत

Next


चिपळूण : येथील पंचायत समितीच्या आवारात ओवळी, कळकवणे व वालोटी येथील प्रादेशिक नळपाणी योजना बंद असल्याच्या कारणावरून ग्रामस्थांनी शुक्रवारी उपोषण केले. पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावर पंचायत राज समितीचे आगमन होताच उपोषणाला बसलेल्या ग्रामस्थांनी रिकामे हंडे, प्लास्टिकच्या कॅनने समितीचे स्वागत केले.
महावितरणच्या आडमुठेपणामुळे व बिलातील फरकामुळे ओवळी, कळकवणे व वालोटी येथील प्रादेशिक नळपाणी योजना गेले तीन महिने बंद आहे. येथील ग्रामस्थ दर महिन्याला आपली नियोजित पाणीपट्टी भरतात. परंतु, फरकाची रक्कम तशीच राहिली आहे. याबाबत महावितरणने ग्रामस्थांना वेठीस धरले असून, सध्या पाणी बंद आहे. म्हणून शुक्रवारपासून कळकवणेचे सरपंच कविता आंबेडे, उपसरपंच सतीश सुर्वे, वालोटीचे सरपंच संदीप गोटल, ओवळीचे दिनेश शिंदे व स्थानिक ग्रामस्थांनी शुक्रवारी उपोषण सुरू केले.
पंचायत समितीच्या सभापती पूजा निकम, माजी सभापती शौकत मुकादम, जिल्हा परिषद माजी विरोधी पक्षनेते अशोकराव कदम, सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष शेखर निकम, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष चित्रा चव्हाण, दशरथ दाभोळकर, जिल्हा परिषद सदस्य दिशा दाभोळकर, पंचायत समिती सदस्य नितीन ठसाळे, बाबू साळवी, पांडुरंग माळी, अ‍ॅड. अमित कदम, आदींनी त्यांची भेट दिली.
पंचायत राज समितीचे आमदार बाळाराम पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपोषणाला बसलेल्या ग्रामस्थांशी चर्चा केली. त्यांचा प्रश्न जाणून घेतला व आज, शनिवारी जिल्हा परिषद येथे सांगता समारंभाच्यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन केले. यावेळी टेरव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच किशोर कदम व त्यांच्या सहकाºयांनी तिवरे, आकले, रिक्टोली, कादवड, गाणे, वालोटी, खडपोली, ओवळी, करंबवणे, नांदिवसे, स्वयंदेव, तळसर, पिंपळी बुद्रुक, मुंढे, चिपळूण सती, कान्हे, अडरे, अनारी, टेरव, चिंचघरी या गावांना ग्रॅव्हिटीने पाणी योजना करण्याची शिफारस करावी, अशी मागणी केली. रिक्टोली नळपाणी योजना मंजूर असून, त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. तरी कार्यवाही व्हावी, अशी मागणी रिक्टोली ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आली. नायशी राष्ट्रीय पेयजल योजनेतील ३६ लाख रुपये खर्चाबाबत योग्य ती कार्यवाही व्हावी, याबाबत सरपंच किशोर घाग यांनी मागणी केली. पंचायत समिती सदस्य अनुजा चव्हाण, माजी सदस्य व राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्ष जागृती शिंदे यांनीही आपल्या मागण्यांबाबत निवेदन दिले आहे.

Web Title: Welcome to the empty wings of Panchayat Raj Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.