वाशीत आंब्याची आवक वाढली

By Admin | Published: February 2, 2016 11:44 PM2016-02-02T23:44:16+5:302016-02-02T23:44:16+5:30

दर घसरले : बागायतदारांना दरवाढीची अपेक्षा

Vashi mangoes increased inward | वाशीत आंब्याची आवक वाढली

वाशीत आंब्याची आवक वाढली

googlenewsNext

रत्नागिरी : पावसाअभावी पहिल्या टप्प्यात आलेल्या मोहोराचा आंबा वाढत्या उष्म्यामुळे हंगामापेक्षाही लवकर तयार झाला असून, बाजारात त्याची आवक वाढू लागली आहे. गेल्या आठवड्यापासून वाशी बाजारात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतून आंब्याची आवक वाढली आहे. दररोज ८०० ते ९०० आंबा पेट्या वाशी बाजारामध्ये विक्रीसाठी दाखल होत असून, ५०० ते १००० रुपये डझन दराने आंब्याची विक्री सुरू असल्याची माहिती मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय पानसरे यांनी दिली.
पावसाचे प्रमाण सुरुवातीपासून कमी राहिल्याने यावर्षी सरासरीपेक्षा निम्माच पाऊस झाला. कमी पावसामुळे झाडाला पालवी मोठ्या प्रमाणात आली. थंडी उशिरा सुरू झाल्यामुळे पालवी कडक होऊन मोहोर प्रक्रिया लांबली; परंतु समुद्रकिनाऱ्यालगतच्या ४ ते ५ किलोमीटर परिसरात आंब्याला मोहोर लवकर आला. पाऊस नसल्यामुळे मोहोर टिकला. शिवाय त्याला झालेल्या फळधारणेवरही कोणताच परिणाम झाला नाही. वास्तविक दरवर्षी फेब्रुवारीच्या मध्यानंतर आंबा विक्री सुरू होते. मात्र, यावर्षी हंगामापूर्वीच अर्थात जानेवारीलाच आंबा बाजारात आला आहे. वाशी बाजाराबरोबर अहमदाबाद, कोल्हापूर, पुणे, सांगली बाजारामध्ये आंब्याची आवक सुरू झाली आहे.
अन्य शहरांतील बाजारांपेक्षा मुंबई बाजारकडे बागायतदारांचा ओढा अधिक आहे. रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतून जास्त आंबा मुंबईकडेच पाठविला जात आहे. हजाराच्या घरात आंबा पेट्या बाजारामध्ये विक्रीसाठी दाखल होत आहेत. आंबा चांगल्या प्रमाणात विक्रीसाठी आला असला तरी दर मात्र घसरले आहेत. ५०० ते १००० रुपये डझन दराने आंब्याची विक्री सुरू आहे. पेटीला २५०० ते ४००० रुपये इतकाच दर मिळणार आहे. स्थानिक बाजारपेठेतही आंबा गेल्या आठवड्यापासून विक्रीस आला आहे. कच्चा आंबा ५०० ते १००० रुपये डझन, तर पिकलेले आंबे ८०० ते १२०० रुपये डझन दराने विकण्यात येत आहेत. कैरी २०० रुपये किलो दराने विकण्यात
येत आहे. वाशी बाजारमध्ये कैरीचे करंडे अथवा पोते विक्रीस पाठविण्यात येत आहे. २०० रुपये किलो इतक्या अल्प दराने कैरी विकली जात आहे.
आंबा पिकासाठी लागणारी खते, मोहोर, फळे संरक्षणार्थ वापरण्यात येणारी कीटकनाशके, मजुरी, पॅकिंग, इंधन खर्च, वाहतूक, हमाली, दलाली शिवाय महागाईमुळे वाढलेले दर वजा जाता शेतकऱ्यांच्या हातात मिळणारी रक्कम निश्चितच तुटपुंजी आहे. उन्हामुळे आंबा लवकर तयार होत असला तरी काही शेतकरी आंबा तोडण्याची घाई करीत आहेत. त्याचा परिणाम दरावर होत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Vashi mangoes increased inward

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.