शहरी भागात भूमिगत वाहिन्या

By admin | Published: August 16, 2016 10:01 PM2016-08-16T22:01:13+5:302016-08-16T23:39:26+5:30

कांचन आजनाळकर : वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी प्रयत्न

Underground vessels in urban areas | शहरी भागात भूमिगत वाहिन्या

शहरी भागात भूमिगत वाहिन्या

Next

एकात्मिक ऊर्जा विकास योजनेंतर्गत शहरांमधील वर्दळीच्या भागातील वाहिन्या भूमिगत करण्यात येणार आहेत. रत्नागिरी, चिपळूण, राजापूर, खेड व दापोली शहरातील उच्चदाबाच्या ११७ किलोमीटर तर लघुदाबाच्या १२९ किलोमीटर वाहिन्या भूमिगत करण्यात येणार आहेत. त्यासाठी १७ कोटी ९९ लाख ६८ हजार रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. ‘दिनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजनें’तर्गत जिल्ह्याला ५६ कोटी ५८ लाखांचा निधी मंजूर झाल्याची माहिती महावितरणचे मुख्य अभियंता कांचन आजनाळकर यांनी दिली.


गणेशोत्सवासाठी सज्ज
गणेशोत्सव तोंडावर असून, ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा देण्यासाठी महावितरण सज्ज झाले आहे. नूतन कोतवडे व पानवल उपकेंद्र सुरू झाले आहे. उत्सव कालावधीसाठी खास रत्नागिरी जिल्ह्यात २५ व सिंधुदुर्ग येथे ३७ नवीन ट्रान्सफॉर्मर चार्ज करण्यात आले आहेत. याशिवाय शहरी व ग्रामीण भागातील यंत्रणाही कार्यरत आहे.
प्रलंबित यादी शून्यावर
जिल्ह्यात घरगुती ४ हजार ४६३, वाणिज्यिक ५४५, औद्योगिक ७९, इतर ४४५ तसेच शेतीपंपाच्या ९८८ वीजजोडण्या प्रलंबित आहेत. वीजजोडण्या शून्यावर आणण्यात येणार असून, कामाच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. पावसाळ्यानंतर या कामाला प्रारंभ होणार आहे. त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यातील सौरकृषी पंपासाठी २२ शेतकऱ्यांचे प्रस्ताव मान्यतेसाठी पाठविण्यात आले आहेत. त्याला मान्यता मिळाल्यानंतर काम सुरू होणार आहे.

प्रश्न : रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागासाठी ९५ कोटी ५५ लाखांचा निधी मंजूर आहे. मात्र, या योजनेंतर्गत कामांना प्रत्यक्षात प्रारंभ केव्हा होणार आहे?
उत्तर : दिनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना ही ग्रामीण भागासाठी असून, त्यासाठी ५६ कोटी ५८ लाख तर शहरी भागासाठी एकात्मिक ऊर्जा विकास योजनेंतर्गत ३८ कोटी ९७ लाखांचा निधी मंजूर आहे. या योजनेच्या निविदा प्रकाशगड येथील मुख्य कार्यालयाकडून काढण्यात आल्या आहेत. पावसाळ्यानंतर या कामाला प्रत्यक्षात प्रारंभ होणार आहे. नवीन वाहिन्या, उपकेंद्र, रोहित्र, रोहित्र क्षमता वाढविणे, भूमिगत वाहिन्या, घरगुती जोडण्यांची कामे यामध्ये प्राधान्याने केली जाणार आहेत. भूमिगत वाहिन्या मात्र शहरी भागात वर्दळीच्या ठिकाणी बसविल्या जाणार आहेत.
प्रश्न : रत्नागिरी विभागाचे विभाजन रखडले आहे, याबाबत लवकर निर्णय होईल का?
उत्तर : चिपळूण विभागाचे २००९ साली विभाजन होऊन नवीन खेड विभाग निर्माण केला गेला. रत्नागिरी शहर व ग्रामीण १, २, संगमेश्वर मिळून रत्नागिरी विभाग तर देवरूख, लांजा, राजापूर १ व २ मिळून लांजा विभागात विभाजन करण्यात येणार आहे. रत्नागिरी विभाग विभाजनाला ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सहमती दर्शविली आहे. तरीही रत्नागिरी विभागाचे हे विभाजन प्रस्तावित असून, अद्याप याबाबतचा निर्णय झालेला नाही.
प्रश्न : कामाचे विकेंद्रीकरण करताना बेरोजगार अभियंत्यांकडून आऊटसोर्सिंग पध्दतीने काम करून घेण्यात येणार आहे का?
उत्तर : जिल्ह््यातील बेरोजगार अभियंत्यांचा नुकताच मेळावा घेण्यात आला. कामासाठी नोंदणी व परवाना मिळविण्याबाबत त्यांना यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. स्थानिकांना प्रोत्साहन तसेच कामे देण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे.
प्रश्न : सौर कृषीपंपाचे वितरण रखडले आहे का?
उत्तर : शेतकऱ्यांना ३ अश्वशक्तीचे सौर कृषीपंप वितरीत करण्यात येणार आहेत. जिल्ह््यातील शेतकऱ्यांना आवाहन केल्याप्रमाणे ५२ प्रस्ताव शेतकऱ्यांकडून पाठविण्यात आले होते. पैकी संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता असलेल्या शेतकऱ्यांचे २२ प्रस्ताव मान्यतेसाठी पाठविण्यात आले आहेत. राज्यातील सौरकृषी पंपांबरोबरच जिल्ह््यातील सौर कृषीपंपांचेही वितरण केले जाणार आहे.
प्रश्न : शॉकविरहित वाहिन्यांचा वापर केला जाणार आहे का?
उत्तर : ग्रामीण भागासाठी दिनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती तर शहरी भागासाठी एकात्मिक ऊर्जा विकास योजना राबवित असताना शॉकविरहित वाहिन्यांचा वापर केला जाणार आहे. अनेक ठिकाणी नागरिक झाडे, झाडाच्या फांद्या तोडू देत नाहीत. घर्षणामुळे शॉर्टसर्किट होण्याचा धोका असतो. खबरदारी म्हणून लघुदाबाची पाच किलोमीटर व उच्चदाबाची ७०.४ किलोमीटर शॉकविरहित नूतन वाहिनी टाकण्यात येणार आहे.
प्रश्न : मोबाईल अ‍ॅपकडे ग्राहकांचा कल वाढत आहे का?
उत्तर : विजेसंबधी तक्रार, नवीन जोडण्या, सरासरी वीजबिल टाळण्यासाठी मीटरचा फोटो व रिडींग पाठविण्याची सुविधा असलेल्या मोबाईल अ‍ॅपद्वारे वीजबिल भरण्याकडे ग्राहकांचा कल वाढतच आहे. रांगेत उभे राहून वेळ वाया घालविण्यापेक्षा मोबाईल अ‍ॅपचा वापर ग्राहकांना सुलभ झाला आहे. महावितरणच्या सर्व कर्मचाऱ्यांना मोबाईल अ‍ॅपचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. मोबाईल अ‍ॅपमुळे भविष्यात लाईनस्टाफला ग्राहकांच्या दारात जावून पैसे भरले का? असे विचारण्याची आवश्यकता भासणार नाही.
प्रश्न : गणेशोत्सवासाठी खास नियोजन केले आहे का?
उत्तर : गणेशोत्सव कालावधीत उद्भवणाऱ्या वीज पुरवठ्याच्या समस्या सोडविण्यासाठी उपअभियंता कार्यालय स्तरावर विशेष पथक नेमण्यात येईल. गणेशोत्सवासाठी अधिकृत वीजपुरवठा घेण्यासाठी महावितरणकडे मंडळांनी संपर्क साधावा.
- मेहरून नाकाडे

Web Title: Underground vessels in urban areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.