श्री भैरीबुवाच्या शिमगोत्सवास आजपासून धडाक्यात प्रारंभ

By Admin | Published: March 11, 2017 09:20 PM2017-03-11T21:20:07+5:302017-03-11T21:20:07+5:30

होलियो रेऽऽऽ होलिओ : भैरी जोगेश्वरी, नवलाई-पावणाई, तृणबिंदूकेश्वर ट्रस्टतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन

Starting from today's Shiggotsav of Shri Bhairibuwa, | श्री भैरीबुवाच्या शिमगोत्सवास आजपासून धडाक्यात प्रारंभ

श्री भैरीबुवाच्या शिमगोत्सवास आजपासून धडाक्यात प्रारंभ

googlenewsNext

रत्नागिरी : बारा वाड्यांचे ग्रामदैवत श्री देव भैरी जोगेश्वरी, नवलाई पावणाई, तृणबिंदूकेश्वर ट्रस्टतर्फे शिमगोत्सवाला १२ मार्चपासून प्रारंभ होणार आहे. शिमगोत्सवामुळे आसपासच्या गावातील अनेक पालख्या श्री भैरी भेटीला येत आहेत. उत्सवामुळे मंदिराची रंगरंगोटी करून फुलांनी मंदिर सुशोभित करण्यात आले आहे.
फाल्गुन पौर्णिमेला मध्यरात्री बारा वाजता श्री देव भैरीची पालखी श्री देवी जोगेश्वरी भेटीसाठी बाहेर पडणार आहे. खालचीआळी, महालक्ष्मी शेतातून मध्यरात्रीनंतर दीड वाजता जोगेश्वरीची होळी उभी करण्यासाठी पालखी जोगेश्वरी मंदिरात जाईल. दि. १३ रोजी पहाटे तीन वाजता श्री देवी जोगेश्वरी मंदिरातून पालखी ग्रामप्रदक्षिणेसाठी बाहेर पडेल. झाडगाव सहाणेवरून झाडगावनाका, टिळक आळी, काँग्रेस भवन, मुरलीधर मंदिर, बंदररोडमार्गे मांडवी भडंगनाका, मांडवी, घुडेवठार, विलणकरवाडी, चवंडेवठार, खडपे वठार, तेलीआळी, रामनाका, राम मंदिर, राधाकृष्णनाका, गोखलेनाका, विठ्ठल मंदिरकडून होळी घेण्यासाठी जाईल. होळीचा शेंडा घेऊन दुपारी झाडगाव येथे सहाणेवर जाऊन होळी उभारण्यात येईल.
दि. १३ रोजी रात्री ९ वाजता धुळवड साजरी करण्यासाठी निशाण निघणार आहे. निशाण झाडगावात फिरून, श्री देवी जोगेश्वरी मंदिरात जाईल, तेथून सहाणेच्या मागील बाजूने झाडगावकर कंपाऊंड, कुंभारवाडा, परटवणे, फगरवठार, वरचीआळी, लक्ष्मीचौक, गोखले नाक्यातून ढमालणीच्या पारावर येईल. रात्री ११.३० वाजता पारावरून निशाणाचे तीन भाग करण्यात येणार आहेत. एक निशाण घेऊन गुरव मंडळी भैरी मंदिरात, दुसरा भाग गोखलेनाका, राधाकृष्णनाका, मच्छीमार्केट येथे जाईल. पुन्हा फिरून झारणी रोड, राम नाका, तेलीआळी, रसाळ यांच्या तिठ्यावर येईल.
ढमालणीच्या पारावरून तिसरा भाग पऱ्याचीआळी, मारूतीआळी, तेलीआळीतून रसाळ यांच्या तिठ्यावर येईल. गोडीबाव नाका, खडपेवठार व तेथून निशाण राजिवड्यातील श्री काशीविश्वेश्वर मंदिरात येईल. त्यानंतर धुळवड साजरी होणार आहे. तेथून निशाण खडपेवठार, चवंडेवठार, विलणकर वाडी, श्री दत्तमंदिर नाका, घुडेवठार मांडवी येथील वारंग यांच्या घरी थांबेल.
दि. १४ रोजी चौगुलेवाडी, कुरणवाडी, पेठकिल्ला राम मंदिर, सांब मंदिर, जोतिबा मंदिर येथे धुळवडीचे दोन भाग होऊन एक भाग राम मंदिराच्या मागील बाजूने जाऊन दुसरा भाग राम मंदिराच्या पुढील बाजूने मिरकरवाडा पोलीस चौकीजवळ धुळवडीचे दोन भाग एकत्र येतील. पुढे भैरी मंदिर, खालची आळी, दांडा फिशरीज जवळून मुरूगवाडा विठ्ठलादेवी, पंधरामाड, मुरूगवाडा हद्दीजवळ जाऊन गाऱ्हाणे होऊन धुळवड परत मागे फिरून झाडगाव सहाणेजवळील झाडगावकर यांच्या आवारात आल्यानंतर धुळवडीचा कार्यक्रम संपेल.
दि. १५ ते १७ मार्चपर्यंत दुपारी एक वाजेपर्यंत श्री देव भैरीची पालखी झाडगाव सहाणेवर भाविकांच्या दर्शनासाठी थांबणार आहे. दि. १४ ते १६ मार्च रोजी रात्री १० नंतर प्रत्येक वाडीतर्फे पारंपरिक पद्धतीत पालखी नाचविण्यात येणार आहे.
दि. १६ रोजी भैरीची पालखी मुरूगवाड्यात ग्रामप्रदक्षिणा करणार आहे. झाडगावमार्गे जोगेश्वरी मंदिर, खालचीआळी, भैरी मंदिरमार्गे दांडा फॅक्टरी, पंधरा माडपर्यंत जाऊन परत सहाणेवर येईल. त्यानंतर पालखी नाचविण्याचा कार्यक्रम होईल. दि. १७ रोजी श्री भैरीची पालखी रंग खेळण्यासाठी सहाणेवरून निघेल. पोलीस कर्मचाऱ्यांची शस्त्रसलामी घेऊन जोगेश्वरी मंदिरातून गाडीतळ , नवलाई-पावणाई मंदिर, शहर पोलीस ठाणे, धनजीनाका, राधाकृष्णनाका, रामनाका, राम मंदिर, मारुतीआळी, गोखलेनाका, ढमालणीचा पार, विठ्ठल मंदिर, काँग्रेस भवन, मुरलीधर मंदिर, खालचीआळीमार्गे भैरी मंदिराच्या प्रांगणात ११.३० वाजता नेण्यात येईल. (प्रतिनिधी)


रात्री बारा वाजता पालखी स्थानापन्न होऊन धुपारत, गावाचे गाऱ्हाणे होऊन शिमगोत्सवाची सांगता होणार आहे. या शिमगोत्सवानिमित्ताने रत्नागिरी शहर सजले आहे. ज्या ज्या ठिकाणी भैरीची पालखी जाणार आहे, त्याठिकाणी मंडप उभारण्यात आला आहे. तसेच रस्त्यांवर रांगोळ्याही काढण्यात येणार आहे. पाहुण्यांच्या स्वागतासारखीच या ग्रामदेवतेच्या स्वागताची तयारी सध्या रत्नागिरी शहरात सुरु आहे.


सडामिऱ्या व जाकीमिऱ्या येथील नवलाई-पावणाई-म्हसोबा या पालख्यांची भैरी मंदिराच्या प्रांगणात होळी पौर्णिमेला भेट होते.

Web Title: Starting from today's Shiggotsav of Shri Bhairibuwa,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.