बनावट सोने तारण ठेवून लाखो रुपयांचा गैरव्यवहार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 05:41 AM2018-08-22T05:41:10+5:302018-08-22T05:41:44+5:30

बँक आॅफ इंडियाच्या कडवई शाखेत महाघोटाळा

Lakhs of rupees deal with fake gold plating | बनावट सोने तारण ठेवून लाखो रुपयांचा गैरव्यवहार

बनावट सोने तारण ठेवून लाखो रुपयांचा गैरव्यवहार

Next

देवरूख/आरवली : संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील बँक आॅफ इंडियाच्या शाखेत बनावट सोने तारण प्रकरणी बँकेच्या सोनारासह १४ ग्राहकांवर मंगळवारी संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट सोनेतारण ठेवून सुमारे ५१ लाख २६ हजार रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
दिलीप रामचंद्र्र पंडित (चिखली) हे प्राधिकृत सुवर्णकार आहेत. यांसह ग्राहक अस्लम युनुस फणसोपकर (तुरळ), अरुण प्रभाकर पंडित (चिखली), मानसी महेंद्र्र पंडित (चिखली), रामचंद्र सदाशिव आणेराव (शिंदे आंबेरी), रूपाली दिलीप ब्रीद (मासरंग), सखाराम गंगाराम कानाल (चिखली), संजय यशवंत पवार (चिखली), सरिता रमेश सागवेकर (कडवई), शालिनी रामचंद्र आणेराव (शिंदे आंबेरी), सुजाता चंद्र्रकांत क रजेकर (रांगव), सूर्यकांत सीताराम पंडित (चिखली), वंदना संजय पवार (चिखली), विजय वसंत कडवईकर (कडवई) व सतीश शांताराम चाळके (तांबेडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या ग्राहकांची नावे आहेत.
सोने तारण कर्जाकरिता बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून १४ ग्राहकांनी सुवर्णकाराच्या संगनमताने, फसवणुकीच्या हेतूने आपल्या ताब्यातील सोने खोटे असल्याचे माहिती असतानाही, जाणीवपूर्वक बँकेत खरे दागिने असल्याचे भासवून कर्ज उकळले. यातूनच हा गैरव्यवहार घडला आहे. या ग्राहकांनी एकूण ३६२३.६६ ग्रॅम खोटे सोन्याचे दागिने बँकेत तारण ठेवून त्यापोटी ५१ लाख २५ हजार ८२० रक्कम कर्ज म्हणून अपहार केला आहे.
संगमेश्वरमध्ये यापूर्वीदेखील अशाच प्रकारचा बनावट सोने तारणाचा व्यवहार उघडकीस आला होता. हा गैरव्यवहार कोकण मर्कंटाईल या को-आॅप बँकेत घडला होता. यावरून बँकेचे शाखा व्यवस्थापक, अधिकारी, सोनार यांबरोबर बनावट सोने तारण ठेवणाऱ्या ग्राहकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण ताजे असतानाच आता चक्क राष्टÑीयकृत बँकेमध्येच अशा प्रकारचा गैरव्यवहार झाल्यामुळे तालुक्यात बँकेतील अफरातफरीच्या प्रकरणांच्या चर्चेला उधाण आले आहे.
संगमेश्वर तालुका गेली ३-४ वर्षे आर्थिक अफरातफरीमुळे चर्चेत आहे. यामध्ये कमोडिटी मार्केट, रकमेवर कमी कालावधीत दुप्पट, तिप्पट व्याज देणाºया कंपन्या, खासगी सावकार, पतसंस्था व सहकारी बँक यांचा समावेश आहे. या प्रकरणांमुळे अनेक ठेवीदार आर्थिक संकटात सापडले आहेत.

चार महिने प्रकरण प्रलंबित
बँक आॅफ इंडिया शाखेतील बनावट सोन्यावर कर्ज उकळण्याचा प्रकार चार महिन्यांपूर्वीच उघडकीस आला होता. मात्र, प्रत्यक्षात मंगळवारी हे प्रकरण पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आले. यामुळे गेले चार महिने हे प्रकरण कोणी दाबून ठेवले, याची उलटसुलट चर्चा तालुक्यात सुरू असून, पोलिसांच्या तपासातूनच या संपूर्ण प्रकरणाची उकल होणार आहे.

Web Title: Lakhs of rupees deal with fake gold plating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.