उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्त्वाची वाट लावली, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप

By मनोज मुळ्ये | Published: October 19, 2023 02:21 PM2023-10-19T14:21:34+5:302023-10-19T14:22:20+5:30

कोणत्याच मतदार संघावर भाजपने दावा केलेला नाही

BJP state president Chandrashekhar Bawankule accused Uddhav Thackeray from Hindutva | उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्त्वाची वाट लावली, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप

उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्त्वाची वाट लावली, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप

रत्नागिरी : इंडीया आघाडी जर सत्तेत आली तर सनातन हिंदू धर्म संपवू, अशी घोषणा उदयनिधी यांनी केली आहे आणि त्यांच्याचबरोबर उद्धव ठाकरे यांची आघाडी आहे. ठाकरे यांनीच हिंदुत्त्वाची वाट लावली आहे आणि आता लोकांनाही ते कळले आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

रत्नागिरीत प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. महाविकास आघाडी सत्तेत असताना केंद्र सरकारने निधी दिला नाही. मात्र महायुती सत्तेत आल्यानंतर मोठ्या प्रमाणात राज्यात निधी येत असल्याचा आरोप केला जात आहे. मात्र अडीच वर्षात केवळ दोनदाच मंत्रालयात गेलेले फेसबुक लाईव्ह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राच्या योजनांसाठी किती प्रस्ताव पाठवले? त्याचा कितीवेळा पाठपुरावा केला, असा प्रश्न बावनकुळे यांनी केला. 

उद्धव ठाकरे अडीच वर्षे झोपून राहीले

महाराष्ट्राचे आताचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. त्यांनी विविध कार्यक्रमांच्यानिमित्ताने पंतप्रधानांना तीन-चारवेळा महाराष्ट्रात आणले. त्यामुळे महाराष्ट्राला निधी मिळत आहे. उद्धव ठाकरे अडीच वर्षे झोपून राहीले. महाराष्ट्राला अडीच वर्षे मागे टाकण्याचे काम त्यांनी केले. ते जर प्रस्ताव घेऊन गेलेच नाहीत, तर निधी कसा मिळणार, असा प्रश्न बावनकुळे यांनी केला. उद्धव ठाकरे यांना मोदी चालत नव्हते. ते शरद पवार यांच्या घरी जाऊन बसले. त्यामुळे ठाकरे आणि शरद पवार यांच्यामुळे महाराष्ट्राचा विकास थांबल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला.

दावा कोठेच नाही

कोणत्याच मतदार संघावर भाजपने दावा केलेला नाही. केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार तसेच देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील, महायुतीच्या ११ घटक पक्षामधील जो उमेदवार देतील, त्या उमेदवारासाठी भाजपचे वॉरियर्स प्रामाणिकपणे काम करतील, असे बावनकुळे यांनी सांगितले.

Web Title: BJP state president Chandrashekhar Bawankule accused Uddhav Thackeray from Hindutva

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.